अमेरिकेनं इराकमध्ये इराणच्या सैन्याचे विशेषाधिकारी कासीम सुलेनानी यांच्यासह आठजणांची हत्या केल्यानंतर जगभर गंभीर परिणाम उमटायला सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. इराणनं अमेरिकेला दिलेली धमकी पाहता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं आताच हा हल्ला का केला, याचाही खोलात जाऊन विचार करायला हवा. या हल्ल्याचे पडसाद कसे अनुभवायला मिळणार?

अमेरिकेनं इराकमध्ये इराणच्या सैन्याचे विशेषाधिकारी कासीम सुलेनानी यांच्यासह आठजणांची हत्या केल्यानंतर गंभीर परिणाम उमटायला सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. इराणनं अमेरिकेला दिलेली धमकी पाहता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं आताच हा हल्ला का केला, याचाही खोलात जाऊन विचार करायला हवा. इस्त्राईलची बाजू घेताना अमेरिका कायम इराणचा दुस्वास करत आली आहे. इराण-इराक युद्धाच्या वेळी अमेरिका पूर्वी इराकची बाजू घेत असे. इराण अण्वस्त्र बनवत असल्याचा आरोप करत अमेरिकेनं अनेकदा इराणविरोधात बहिष्काराचं अस्त्र उगारलं. आखाती राष्ट्रातल्या तेलावर डोळा ठेवून अमेरिका इथल्या राष्ट्रांना परस्परांविरोधात झुंजवत आली. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात इराणवरील निर्बंध हटवण्यात आले; परंतु, ओबामा यांचा दुस्वास करणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ओबामा यांचा हा निर्णय रद्द केला गेला. इराणबरोबर सुरू केलेला संघर्ष हा त्याच धोरणाचा भाग आहे. आताही त्यातूनच इराणच्या लष्करी अधिकार्‍याची हत्या करण्यात आली.

गेल्या वर्षापासून इराण आणि अमेरिकादरम्यानचा तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेनं सुलेमानी यांना ठार केल्यानं मध्य पूर्वेतील तणाव वाढणार असल्याचा इशारा रशियानं दिला आहे. सुलेमानी यांना ठार करण्याचं साहसी पाऊल उचलण्यात आल्यानं या प्रदेशातला तणाव कमालीचा वाढण्याची भीती फ्रान्सने व्यक्त केली आहे. चीननं अमेरिकेला संयम पाळण्याची विनंती केली आहे. अमेरिकेच्या पहिल्या हल्ल्यात आठजणांचा मृत्यू झाला असून, हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहदी अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती समोर आली. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे. त्यातच ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग कनिष्ठ सभागृहानं मंजूर केला आहे. त्यावर वरिष्ठ सभागृहात चर्चा व्हायची आहे. त्यांच्या नेतृत्त्वाला त्यांच्याच पक्षातून आव्हान दिलं जात आहे. नेमकं याच काळात इराणसमर्थक मिलिशियाकडून अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला. ट्रम्प यांना निमित्त हवंच होतं. ते या निमित्तानं मिळालं. सुलेमानी यांना ट्रम्प यांचं विरोधक मानलं जायचं. त्यांनी अनेक वेळा अमेरिकेला धमकी दिली होती. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी इशारा देत इराणला नुकसान सहन करावं लागेल, असं म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या या इशार्‍यानंतरच अमेरिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

इराणमधल्या काही संघटनांवरही अमेरिका डूख धरुन होती. त्यापैकी एक असलेली कुड्स सेना ही इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सची एक शाखा आहे. या सेनेच्या माध्यमातून इराणबाहेरील कारवाया केल्या जातात. आता मारले गेलेले कासिम सुलेमानी या सेनेचे प्रमुख होतेच, पण इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात. भविष्यातले सर्वोच्च नेते म्हणूनही सुलेमानींकडे पाहिलं जात होतं. 2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्त्वातल्या सैन्याकडून इराकमध्ये सद्दाम हुसैनची सत्ता संपवण्यात आली. त्यानंतर मध्य-पूर्व आशियात कुड्स सेनेनं आपल्या मोहिमा वेगवान केल्या. इराणचं समर्थन करणार्‍या इतर देशांच्या सरकारविरोधी गटांना कुड्स सेनेनं शस्त्र पुरवली, आर्थिक मदत केली आणि प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी रिव्हॉल्युशनरी गार्डसह कुर्द सेनेला ‘परदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केलं. अशीच दुसरी एक संघटना असलेली ‘कताइब हिजबुल्लाह’ आपल्या इराकस्थित लष्करी चौक्यांवर सातत्यानं हल्ला करत असल्याचा दावा अमेरिका करत आली. 2009 पासूनच अमेरिकेनं कताइब हिजबुल्लाहला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केलं आहे. इराकच्या स्थैर्याला आणि शांततेला कताइब हिजबुल्लाह संघटना घातक असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. कताइब हिजबुल्लाहचा संबंध इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्सच्या आंतरराष्ट्रीय कारवाया सांभाळणार्‍या कुर्द सेनेशी आहे. या संघटनेला इराणकडून विविध प्रकारची मदत मिळते, असं अमेरिकेच्या संरक्षण खात्याचं म्हणणं आहे.

सुलेमानी यांची हत्या म्हणजे अमेरिकेनं इराणविरोधात युद्ध पुकारल्यासारखंच आहे. परदेशात लष्करी कारवाई करण्यासाठी इराणच्या सुरक्षा दलानं कुड्स फोर्स ही शाखा तयार केली आहे. लेबेनॉन असो, इराक असो, सीरिया असो किंवा इतर देश असो; इराणच्या प्रभावाचा विस्तार करण्यासाठी हल्ल्यांची योजना आखण्यात किंवा मित्रराष्ट्रांचं बळ वाढवण्यात सुलेमानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेसाठी सुलेमानी हे दहशतवादी होते. त्यांचे हात अमेरिकन नागरिकांच्या रक्तानं माखले होते, असं अमेरिकेचं म्हणणं होतं; मात्र, इराणमध्ये त्यांची लोकप्रियता अफाट होती. इराणविरोधी दबावतंत्र आणि अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांविरोधात उभारलेल्या लढ्याचं त्यांनीच खर्‍या अर्थानं नेतृत्व केलं. ट्रम्प यांना सुलेमानी खटकत होते, हे सार्‍यांना माहिती होतं; मात्र, अमेरिकेनं त्यांना ठार करण्यासाठी हीच वेळ का निवडली, याचं सर्वांना आश्‍चर्य वाटत आहे. अलीकडे इराकमधल्या अमेरिकी सैनिकांवर सौम्य स्वरुपाचे रॉकेट हल्ले केल्याचे आरोप इराणवर करण्यात आले. यात अमेरिकेच्या एका काँट्रॅक्टरचा मृत्यू झाला होता. इराणनं यापूर्वी अनेक गंभीर हल्ले केले आहेत. आखातातल्या तेल टँकर्सवर केलेला हल्ला, अमेरिकेचं मानवरहित विमान पाडणं, सौदीच्या इंधन पुरवठ्यावर केलेला मोठा हल्ला हे सर्व हल्ले गंभीर होते; मात्र, त्या वेळी अमेरिकेनं थेट कुठलीही कारवाई केली नव्हती. 

सुलेमानी इराकमधलं अमेरिकी सैन्य आणि अमेरिकी नागरिकांवर तसेच संपूर्ण प्रदेशात हल्ले करण्याची योजना आखत होते. त्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेने आघात केला. या एका कारवाईतून आपण दोन उद्देश साध्य केल्याचं ट्रम्प यांना वाटू शकतं. एक म्हणजे इराणला धडा शिकवला आणि दुसरं म्हणजे इस्राईल, सौदी अरेबिया यासारख्या आखातातल्या अस्वस्थ मित्रराष्ट्रांना अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा अजूनही सर्वात खमकी आहे, हे दाखवून दिलं. अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणनं तातडीनं प्रत्युत्तर दिलं नसलं तरी नजीकच्या भविष्यात काही तरी मोठी कारवाई नक्कीच करणार. इराकमध्ये असलेले अमेरिकेचे पाच हजार सैनिक संभाव्य लक्ष्य ठरू शकतात. यापूर्वीही इराण किंवा इराणच्या मित्रराष्ट्रांकडून असे हल्ले झाले आहेत. दुसरं म्हणजे आखातात तणाव वाढू शकतो. सर्वात आधी परिणाम होईल तो तेलाच्या दरावर. तेलाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. इराण वेगळ्या प्रकारे प्रत्युत्तर देण्याचीही शक्यता आहे. म्हणजे हल्ल्याचं उत्तर हल्ल्यानं न देता आखातात इराणला असलेल्या पाठिंब्याचाही वापर केला जाऊ शकतो. 

इराण-अमेरिकेतल्या तणावाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला आहे. जागतिक बाजारात तीन-चार टक्क्यांनी कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. भारतासारख्या कच्चं तेल मोठ्या प्रमाणात आयात करणार्‍या देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारतात गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती वाढत आहेत. युद्ध पेटल्यास पश्‍चिम आशियात वास्तव्याला असलेल्या सुमारे 80 लाख भारतीयांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल. इराणमध्ये भारताने उभ्या केलेल्या चाबहार बंदर प्रकल्पावरही परिणाम होणार आहे. तसं झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर नवं संकट येऊ शकतं.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग