वर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला पिके घेतली जातात. महाराष्ट्रामध्ये हरितगृहातील भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही शेडनेटमध्ये ढोबळी मिरची अनेक ठिकाणी केली जाते. 

आवश्यक वातावरण : 

रंगीत ढोबळी मिरची लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान 18 अंश सेल्सिअस व कमाल 35 अंश सेल्सिअस आवश्यक असते. या पिकासाठी योग्य सापेक्ष आर्द्रता 50 ते 75 टक्क्यांपर्यंत असली पाहिजे. हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगृहामध्ये उत्पादन केलेल्या मिरचीचा दर्जा चांगला राहतो.  तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी झाल्यास व धुके पडल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळे पोसत नाहीत.  शेतामध्ये ढोबळी मिरचीची लागवड ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांत करावी.

 जमीन :  जमीन चांगली कसदार व सुपीक लागते. पाण्याचा चांगला निचरा होणारी. सामू सहा ते सात. साधारणपणे जमिनीची खोली एक-दीड मीटर असावी. म्हणून मध्यम ते भारी काळ्या जमिनी या पिकास उत्तम मानवतात, तसेच पोयट्याच्या सुपीक जमिनीसुद्धा चालू शकतात.

ढोबळी मिरचीच्या जाती : 

हरितगृहामध्ये लाल, पिवळ्या आणि नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरच्यांची लागवड केली जाते. आपले गाव शहराच्या जवळ असल्यास लाल आणि पिवळ्या रंगांच्या ढोबळी मिरचीला अधिक उठाव मिळू शकतो, कारण या मिरच्यांची चव काहीशी गोडसर असल्याने त्यांचा वापर आपल्याकडे भाजी म्हणून होत नाही.

पंचतारांकित हॉटेल आणि मोठ्या शहरांमध्ये मात्र रंगीत ढोबळी मिरच्यांची मागणी अधिक असल्याचे दिसून आले आहे, त्यासाठी अधिक दर उपलब्ध होतो. शहरामध्ये काढणीनंतर आपला माल पाठवणे सोईचे नसल्यास नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरचीचा पर्याय शेतकर्‍यांनी निवडावा. दर्जेदार उत्पादनामुळे या मिरच्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो. आपल्या परिसरानुसार आणि बाजारपेठेतील स्वतःच्या अभ्यासानुसार मिरचीची जात निवडावी. 

रोप निवडीचे निकष : रंगीत ढोबळी मिरचीचा पर्याय निवडल्यास लाल व पिवळा या रंगांचे प्रमाण साधारणपणे - 65 टक्के लाल आणि 35 टक्के पिवळा असे ठेवावे. साधारणपणे लाल रंगाच्या मिरचीला अधिक मागणी असते. स्वतः रोपे तयार करणार असल्यास लागवडीपूर्वी साधारणपणे एक महिना आधी योग्य त्या आकाराच्या शेडनेटमध्ये रंगानुसार बियांची रोपे ट्रेमध्ये तयार करावीत. 

रोपे तयार करणे:  रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे.  

वाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा  सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात. त्यात प्रथम फोरेट (10 जी) हे  कीटकनाशक दहा ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकून नंतर बी पेरणी करावी.  प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्टर ढोबळी मिरची लागवडीसाठी सुमारे 400 ते 500 ग्रॅम  बियाण्याची गरज असते. जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.  रोपे सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर ती पुनर्लागवडीस तयार होतात.  लागवडीच्या वेळी रोपे खालीलप्रमाणे असावीत.  रोपांचे वय चार ते पाच आठवड्यांचे असावे. रोपांची उंची 16 ते 20 सें.मी. असावी. रोपांवरती चार ते सहा पाने असावीत.

लागवड : रंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी गादीवाफ्याचा वापर करावा.  गादीवाफा 90 ु 40 ु 50 सें.मी. आकाराचा असावा. या वाफ्यावर दोन ओळींत झिगझॅग पद्धतीने लागवड करावी. लागवडीचे अंतर : दोन रोपांतील अंतर - 45 सें.मी., दोन ओळींतील अंतर - 50 सें.मी., रोपांची घनता - 2.5 रोपे प्रति चौ.मी.

मशागतीच्या पद्धती :  

रंगीत ढोबळी मिरचीचे पीक हे दहा महिन्यांचे आहे. या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेऊ.

झाडाला आधार देणे : मिरची पिकाची उंची दहा फुटांपर्यंत जाते. हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते. एका गादीवाफ्यावर साधारणपणे तीन मीटर उंचीवर तीन गॅल्व्हनाइज्ड आयर्नच्या तारा (12 गेज जाडीच्या) वाफ्याला समांतरपणे बांधून घ्याव्यात. तारा बांधल्यानंतर लागवड करावी. लागवड झाल्यानंतर लवकरात लवकर एका झाडासाठी चार या संख्येत प्लॅस्टिक दोर्‍या तारेला बांधून खाली सोडाव्यात. नंतर त्या झाडाला बांधाव्यात.

रोपांचा शेंडा खुडणे : लागवडीनंतर 21 दिवसांनी रोपाचा शेंडा खुडावा. खुडण्यासाठी धारदार कात्रीचा वापर करावा. रोपावरती चार- पाच पाने ठेवून शेंडा खुडला जातो, त्यामुळे मिरचीला तीन ते चार फुटवे फुटतात, त्यांना आधारासाठी सोडलेल्या दोर्‍या बांधून घ्याव्यात.

काढणी : मिरचीची काढणी प्रामुख्याने जाती व रंगानुसार वेगवेगळ्या वेळी सुरू होते. हा कालावधी 90 ते 100 दिवस असा असतो. काढणी करताना दूरच्या बाजारपेठेत पाठविताना मिरचीला पाच टक्के रंग आल्यानंतर काढणी करावी, तर जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते.

 उत्पादन : मिरचीचे उत्पादन जातीपरत्वे वेगवेगळे दिसून येते. जुन्या किंवा पारंपरिक जातीमध्ये आठ कि.ग्रॅ. प्रति चौ.मी. आणि आयात केलेल्या काही जातींपासून 14- 18 कि.ग्रॅ. प्रति चौ.मी. उत्पादन मिळते.

प्रतवारी :  मिरचीच्या काढणीनंतर फळांचा आकार व वजनानुसार प्रतवारी करावी. 

साधारणतः अ दर्जा- 200 ते 250 ग्रॅम, ब दर्जा - 150 ते 199 ग्रॅम, क दर्जा - 150 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या मिरच्या अशा तीन प्रतींनुसार वर्गीकरण केले जाते.

 

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग