हिंदू संस्कृतीत मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. भारतभर हा सण उत्साहात साजरा होतो. काही ठिकाणी तो विविध प्रकारे साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील येवला शहरात तीन दिवस पतंग उडविण्याचा खेळ करुन संक्रांत साजरी करण्यात येते. येवला हे सर्वच सण रसरशीतपणे साजरा करणारं शहर. रंगपचंमी असो की दसरा येवला शहरात त्याचा उत्साह ठरलेला. अलीकडे येवल्याचं नाव पतंग उडविण्यासाठी विशेष प्रसिद्ध झालं आहे. येवलेकर कुठंही असला, तरी मकर संक्रांतीला येवल्यात परततो. देशातून लोक पतंग उत्सवासाठी येवल्यात येतात. विदेशी पर्यटकांनाही याचं आकर्षण वाटत असल्याने तेही येवल्यात हजेरी लावतात.

पैठणी पैठणची, पण आता येवल्याची, अशी तिची ओळख बनली आहे. सांस्कृतिकदृष्ट्या येवला शहर संपन्न शहर मानलं जातं. रघुजी बाबांनी येवला शहर वसवलं. येवला शहर प्रथम वाडी एवढं होतं. आजूबाजूला जंगल  होतं. रघुजी बाबांनी पैठणहून पैठणी कारागिर, विणकर आणले. पैठणी विकण्यासाठी त्यांनी गुजराती व्यापारी आणले. आकाशाच्या दिशेला उडविण्यात येणारा पतंगाच्या खेळातील पतंग हा गुजरातचा सांस्कृतिक भाग व्यापार्‍यांच्या स्थलांतराबरोबर त्यांची संस्कृतीही आली अन् इथं स्थिरावली. पुढच्या काळात गंगाराम छबिलदास हे नगरशेठ होते. त्यांची येवल्यात पेढी होती. शहरातल्या गरजा या पेढीतून ते भागवित असत. पेशवाईच्या कारकीर्दीत अगदी पेशव्यांना कर्ज दिल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. पुढच्या काळात या पेढीतून अंमळनेरच्या प्रताप मिलच्या मालकांनीही या पेढीतून कर्ज घेतल्याचे सांगतात. त्यांची मुंबईतल्या फोर्ट भागातही पेढी होती.ते रसिकवृत्तीचे होते. त्यांनी पतंगाच्या खेळाला महत्त्व दिल्याचं सांगितलं जातं.

कोणतीही संस्कृती एकदम विकसित होत नाही. ती लोकसंस्कृती होण्यासाठी लोक सहभाग वाढवावा लागतो. येवल्यातील पतंगबाजीला सुरुवातीला या आसामींनी उत्तर दिलं. गुजराती व्यापारी हा खेळ खेळत हळूहळू लोकसहभाग वाढत गेला आणि आता मकर संक्रांतीला खेळला जाणारा हा खेळ सर्वांचा होऊन बसला आहे. गुजरातमध्ये पतंग महोत्सव भरविला जातो, त्याला राजाश्रयही लाभला आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पतंग महोत्सवाला स्वतः हजेरी लावत. त्यानंतर ते इस्त्रायलच्या पंतप्रधानांनाच अहमहदाबादमध्ये घेऊन आले आणि पतंग उडविण्याचे कौशल्य दाखवत राहिले. येवल्यातही छगन भुजबळ यांनी या पतंग उत्सवात सहभागी होऊन मजा घेतली आहे. 2018 सालच्या पतंग उत्सवात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन  पतंग उडविण्यासाठी येवल्यात आले होते. राजसत्तेत असणार्‍या या बड्या आसामींचे पतंग सामान्य येवलेकर्‍यांनी कापले आहेत. 

भोगी, मकर संक्रांत आणि कर असे तीन दिवस येवल्यात हा पतंग उत्सव चालतो. त्यांची तयारी त्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून सुरु होते. मांज्यासाठी लागणारे सरस, काचा जमा करण्यात येतात. आसरी बनविण्याचे काम सुरु होते. पतंगासाठी कागद आणले जातात. गेली दोन-तीन वर्षे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची छबी असलेले, तसेच अभिनेते यांचे फोटो असलेले पतंग त्याचप्रमाणे सामाजिक संदेशही असतात.

पंढरपूरच्या वारीला जायचं निमंत्रण वारकर्‍याला द्यावं लागत नाही, तसं पतंग उत्सवाचं निमत्रंण येवलेकर्‍यांना द्यावं लागत नाही. भाऊबीजेला दिवाळीला सासूरवाशीण माहेरपणाला येते. येवल्यात तिला संक्रांतीलाच यावंसं वाटतं. तीन दिवस सारं शहर पतंग उडविण्यासाठी घराच्या गच्चीवरच असतं. खाणं-पिणं आणि पतंग उडविण्यात येवलेकर दंग झालेला असतो. ढोल-ताशे, हलगी कडे, लाऊड स्पीकरच्या संगीत ध्वनीत आबालवृद्ध बेहोष झालेले असतात. भांगे कंपनी आपली हौस आणि शौक गच्चीवरच भागवतात. तीन दिवस शहराच्या रस्त्यावर माणसं दिसत नाहीत.शहरातील शाळा-महाविद्यलयाला अघोषित सुट्टी असते. येवल्यातल्या प्रगत व्यापारी वर्गाला आराम असतो. दुकाने, व्यापारी पेठ, मार्केट कमिटी सगळीकडे सामसूम असते. पतंग पकडणारी गरीब दुबळी मुलं हातातल्या काठीला बोरीबाभळीचे काटे लावून पतंग पकडण्यासाठी धावपळ करीत असतात. आकाशात पतंगाचं इंद्रधनुष्य फुललेलं असतं. ढिल दे, पेचटाक काटली रे काटली, अशी या खेळाची भाषा या काळात प्रत्येकाच्या ओठावर असते. मकर संक्रांत हा हिंदूंचा सण, पण येवल्यात धर्म, पंथ, जात विसरुन सर्वजण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. येथील मुस्लिम मुलं-मुलीही पतंग उडवित असतात आणि त्यांचे आब्बा त्यांना प्रोत्साहन देत असतात. 

पतंग हा मुलांचा खेळ मुली, स्त्रिया अन्यत्र पतंग उडविताना दिसणार नाहीत. पण ‘पतंग उडवित होते, गं बाई मी पतंग उडवित...’ या गाण्याचं प्रात्यक्षिक येवल्यात पाहायला मिळतं. कितीतरी मुली, सुना कुटुंबातल्या व्यक्तीबरोबर पतंग उडविताना दिसतात. काटाकाटीची ईर्ष्या त्यांच्यातही असते. स्त्री-पुरुष भेदाभेद निदान येवल्यात तरी गळून पडलेला दिसतो. पतंग हा येवलेकरांचा सण झालेला आहे. करीच्या सायंकाळी आकाशात जेव्हा पतंग सोडले जातात, तेव्हा आतषबाजी चालते. पतंगाची काटाकाटी संपून आकाशात पतंगाबरोबर लाईटचा प्रकाशही दिसतो. काही विशिष्ट फटाके पतंगाबरोबर सोडले जातात आणि विशिष्ट वेळानं पतंगाची जागा ही आतषबाजी घेते. ते दृश्य नयनरम्य असतं. या खेळामध्ये काही अपघातही होण्याची शक्यता असते. पतंगाने एका दुचाकीस्वाराचं नाक कापण्याची बातमी वाचनात आली. येवलेकर हे संवेदनक्षम आहेत. पतंग उडविण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरु नका म्हणून स्वयंसेवी संस्था प्रबोधनही करतात. पतंगाच्या दोरानं गळा कापण्याची, पतंगानं मोठा अपघात झाल्याची उदाहरणही आहेत. त्याबाबतीतही जनजागरण केलं जातं. पतंगाच्या धाग्याला अडकून पक्षी जखमी होतात. येवल्यातील काही संवेदनशील लोक अशा पक्ष्यांवर उपचारासाठी सज्ज असतात. पौराणिक काळापासूनचा हा उत्सव महाराष्ट्रभर साजरा होतो. पण, तो येवल्यात अधिक उत्साहात साजरा केला जातो. पैठणची पैठणी येवल्याची ग्लोबल ओळख झाली, तरी येवल्याचं पतंग मोकळ्या आकाशात झेपावले आहे. गुजराती लोकसंस्कृतीचा पतंग  उद्योग आता थेट येवल्यातून अहमदाबादला पतंग पाठवू लागला आहे. पर्यटकांसाठी तीन दिवस येवला हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. ते पतंग उत्सवात सहभागी होतात आणि जाताना उच्च दर्जाची कलात्मक पैठणी घेऊन जातात.

 

अवश्य वाचा