दिनांक 15 जानेवारी 2020 

इतर दिनविशेष :

  भूसेना दिन

* 1780 - मुंबईचे राज्यपाल, द ग्रँट मेडिकल कॉलेजचे संस्थापक रॉबर्ट ग्रँट यांचा जन्म.

* 1905 - लेखक, पत्रकार आणि ‘नवाकाळ’ या वृत्तपत्राचे संपादक स्व. यशवंत कृष्णाजी खाडिलकर यांचा जन्म. 

* 1919 - शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था कोल्हापूर संस्थानात केली.

* 1923 - ऑलिम्पिक वीर, कुस्तीसम्राट खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म.

* 1934 - बिहारमध्ये भूकंप होऊन दहा हजार लोक मृत्युमुखी.

 * 1944 - पृथ्वीराज कपूर याने ‘पृथ्वी थिएटर्स’ ही नाट्यसंस्था स्थापली.

जवळपास 100 वर्षांचे लाभलेले दीर्घायुष्य, स्वातंत्र्य संग्रामात गांधी, नेहरुंइतकाच सहभाग, स्वतंत्र भारतात तब्बल 20 वर्षे खासदार, गृहमंत्री आणि देशाचे दोन वेळा हंगामी पंतप्रधानपद भूषवणारी ही हस्ती भाड्याच्या घरात राहात होती. भाडे चुकते न केल्याने घरमालकाने त्यांना घराबाहेर काढले. एक तत्त्वनिष्ठ  गांधीवादी. सत्ता व पैसा यांचा अजिबात मोह नसलेल्या एका सदाबहार व्यक्तिमत्त्वाची दखल रामकालीनांनी घेतली तर नाही, शिवाय अलीकडच्या पिढीलाही ते तसे अनोखेच. अशा या अनोख्या व्यक्तिमत्त्वाचे नाव गुलझारीलाल नंदा.

नंदाजींचा जन्म 4 जुलै 1897 रोजी पंजाबातील सिखालकोट येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. नंदाजींनी एम.ए.ची पदवी अलाहाबाद विद्यापीठातून संपादन केल्यानंतर मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. मुंबईत असताना त्यांच्यावर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. परंतु, असहकार आंदोलनाच्या सुमारास, 1920-21 च्या काळात त्यांना गांधीजींचा सहवास लाभला आणि पुढचे आयुष्य त्यांचे पूर्णत:च गांधीमय झाले. त्यांच्याकडे असणार्‍या अर्थशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी करण्यात यावा, असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी नंदाजींना अहमदाबादमध्ये कामगारांची संघटना बळकट करण्यासाठी पाठविले. 1937 साली मुंबईच्या प्रांतिक असेंब्लीत ते निवडून आल्यावर मुंबईत औद्योगिक संबंधाबाबत कायदे बनविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची या क्षेत्रातील कामगिरी म्हणजे कामगारांसाठी  त्यांनी भारतीयस्तरावर इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इंटकची स्थापन केली. त्याचबरोबर सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह. 1942 ची चलेजाव चळवळ या आंदोलनात सहभागी होऊन कारावासही भोगला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्थापन झालेल्या नियोजन मंडळाचे ते प्रमुख होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे तेही एक शिल्पकार आहेत. 1952 ते 70 या काळात झालेल्या लोकसभेच्या चारही निवडणुकांत ते निवडून आले होते. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या तीनही पंतप्रधानांच्या काळात ते विविध जबाबदार्‍या सांभाळत होते. इतकेच नव्हे तर, पंडितजींच्या मृत्यूनंतर ते हंगामी पंतप्रधान होते. शास्त्रीजींच्या अकाली मृत्यूनंतरही ते हंगामी पंतप्रधान होते. परंतु, 1966 नंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागले. ते गृहमंत्री असताना संसद भवनावर मोर्चा नेऊन गोहत्येविरुद्ध हिंदुत्ववाद्यांनी  निदर्शने सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. त्याचे खापर नंदाजींवर फोडण्यात आले. त्यांच्यावर बरीच टीका झाली. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून (1972) त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली व पुन्हा कधीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय  घेतला.

सत्ता, संपत्ती, मान, सन्मान, प्रसिद्धी इत्यादीपासून कायम दूर राहिल्याने राजकारणातून निवृत्त झाल्यावर भाड्याच्या घरात राहण्याची पाळी त्यांच्यावर आली. घरमालकाने त्यांना सामानासह बाहेर काढले तरीही सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत राहिले. श्रीकृष्णाने जेथे भगवद्गीता सांगितली त्या कुरुक्षेत्राचा परिसर विकसित करण्यासाठी त्यांनी कुरुक्षेत्र विकास बोर्ड स्थापन केले. वयाच्या 91व्या वर्षापर्यंत कुरुक्षेत्र विकास बोर्डाचे ते काम करत होते. वाढत्या वयामुळे सार्वजनिक काम केवळ अशक्य झाल्यावर आपल्या मुलीच्या घरी राहू लागले.

आयुष्याच्या अगदी अखेरच्या क्षणी त्यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेतली. दि. 24 एप्रिल 1997 रोजी सर्वोच्च समजला जाणारा नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना अर्पण करण्यात आला. तेव्हा  त्यांनी  वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण केले होते. आणि, देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. तथापि, या घटनेचा ते आनंदही व्यक्त करू शकले नाहीत. कारण, ते कोमात होते. अखेर 11 जानेवारी 1998 रोजी अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

     

अवश्य वाचा