भूगोल दिन

दिनांक 14 जानेवारी 2020 

इतर दिनविशेष :

* भूगोल दिन/मूकबधीर दिन.

* या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करुन संक्रमणाला सुरुवात करतो. हिंदू लोक हा दिवस ‘मकर संक्रांत’ म्हणून साजरा करतात.

* 1882- संततीनियमन, लैंगिक शिक्षण यांसारख्या वेगळ्या विषयांवर चिंतन करणारे कृतीशील विचारवंत, समाजस्वास्थ्यकार रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म.

 * 1896 - रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, अर्थमंत्री आणि ख्यातनाम अर्थतज्ज्ञ चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचा जन्म. ‘द कोर्स ऑफ माय लाईफ’ हे त्यांचे आत्मचरित्र गाजले.

* 1908 - ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वृत्तपत्राचे माजी संपादक द्वारकानाथ भगवंत कर्णिक यांचा जन्म.

* 1918 - गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान जाहीर.

 

काही दिनविशेषांचे दिन अबाधित आहेत. इंग्रजी महिना असो की मराठी, 14 जानेवारी हा दिवस भारतायांसाठी गोड दिवस. आपण भारतीय आपले सारे धार्मिक सणच हे मराठी महिन्यांप्रमाणे (चैत्र, वैशाख...) साजरे करतो. तथापि, संक्रांत हा त्याला अपवाद आहे. संक्रांत हा सण आपण इंग्रजी महिन्याप्रमाणे 14 जानेवारीलाच साजरा करतो. यामागे भौगोलिक कारण आहे. 21 डिसेंबरला सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेला 23 अंशांवर असणार्‍या मकरवृत्तावर असतो. त्या दिवसापासून तो हळूहळू उत्तरेकडे (विषुववृत्ताकडे) सरकायला लागतो.  यालाच उत्तरायण सुरु झाले असे म्हणतात. भारत उत्तर गोलार्धात असल्यामुळे तिळातिळाने मोठा होणारा दिवस आपल्याला 14 जानेवारीपासून जाणवू लागतो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रेवश करतो. मकर राशीतून सूर्याच्या संक्रमणाला सुरुवात होते. म्हणून या दिवशी आपण ‘मकरसंक्रांत’ साजरी करतो. तसेच हे दिवस थंडीचे आाणि तीळ हे उष्ण असल्याने त्यात गूळ घालून त्याचा तिळगूळ आपण एकमेकांना भरवतो व ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असा प्रेमाचा संदेश भारतीय जगाला देतात, हे या तिळगूळाचे रहस्य.

पण 14 जानेवारी हा दिवस ‘भूगोल दिन’ म्हणून का साजरा करतात? वर दिलेले एक भौगोलिक कारण आहे. शिवाय, 14 जानेवारी 1736 हा दिवस प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा मृत्यूदिन, 76 वर्षांनी प्रकटणारा धूमकेतू इ.स.1682 रोजी पाहिल्यावर हॅले यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या सन्मानार्थ या धूमकेतूला ‘हॅलेचा धूमकेतू’ असे नाव देण्यात आले. तत्पूर्वी, धूमकेतूबद्दल असलेले अनेक गैरसमज, अंधश्रद्धा हॅले यांच्या संशोधनामुळे दूर झाल्या. त्याची कृतज्ञता म्हणून 14 जानेवारी हा दिवस भारतात नव्हे तर, जगात ‘भूगोल दिन’ म्हणून साजरा व्हावा यासाठी खडतर परिश्रम डॉ. सुरेश गडसोळे यांनी केले. कोण हे सुरेश गडसोळे?

चित्र आणि भूगोल ही तर रामलक्ष्मणाची जोडी, चित्रे, नकाशे याशिवाय भूगोलाचे पुस्तक पूर्ण होणारच नाही. शालेय भूगोलाच्या पाठ्यपुस्तकावर सुंदर मुखपृष्ठे आहेत, त्यावर असलेली अप्रतिम सुंदर चित्रे त्यांनी जगभर भ्रमंती करुन मिळवली आहेत. उदा. सातवीच्या भूगोल पुस्तकातील कांगारुचे चित्र, त्यांच्या  प्रयत्नांनीच 14  जानेवारी व हा ‘भूगोल दिन’ साजरा केला जातो.

तसे पाहिले तर, भूगोल हे नैसर्गिक शास्त्र. भौतिकशास्त्राच्या तोडीचे असणारे हे भूगोलशास्त्र. पण, या शास्राची अवस्था राखीव खेळाडूसारखी शालेय विषयात केलेली आहे. विज्ञानाच्या दर्जाचा हा विषय इतिहास, नागरिक शास्त्र या सामाजिक शास्त्राच्या दावणीला अवघ्या 40-50 मार्कांनी बांधून त्याचे महत्त्व कमी केले. परिणामी, एक दुय्यम विषय समजून विद्यार्थी त्याची हेळसांड करतात. 14 जानेवारीचे औचित्य साधून या विषयाची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्याकरिता भूगोल दिन शाळा, कॉलेजात प्रश्‍नमंजुषा, प्रयोग, मेळावे, चर्चासत्रे, भौगोलिक सहली, भूगोलतज्ज्ञांची व्याख्याने, घोषवाक्ये इ. कार्यक्रमांद्वारे साजरा करतात. या विषयाची आवड शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे.

दरवर्षी 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते, पण दर चार वर्षांनी लिप वर्ष येते. तेव्हा ज्या वर्षी लिप वर्ष येते, त्या वर्षी 15 जानेवारीला मकरसंक्रांत येते. याचे कारण असे आहे, की सूर्याचा मकर राशीत प्रवेश दरवर्षी सुमारे सहा तासांनी उशिरा होतो. दरवर्षी सहा तास याप्रमाणे 24 तास चार वर्षांना लागतात म्हणून पुढचा दिवस 15 जानेवारी हा लिप वर्षात मकरसंक्रांत साजरा करण्याचा दिवस.

संक्रांत जरी 15 जानेवारीला साजरी केली तरी ‘भूगोल दिन’ हा 14 जानेवारीलाच साजरा करावा, कारण हॅलेचा सम्मृतिदिन.