अखेर निर्भयाच्या मारेकर्‍यांना फाशी होत आहे. या घटनेने अनेकांचं मन शांत होईल, पण सामाजिक पातळीवर विचार करता आपण कुठे पोहोचत आहोत, असा प्रश्‍न पडतो. 1990 नंतरच्या जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणामुळे माणसाची हाव खूप वाढली. कुठे थांबायचं हे कळेनासं झालं. एका वर्गाला शिक्षण मिळत नाही, तर दुसर्‍या वर्गाकडे शिक्षण असूनही नोकरी नाही. पैशासाठी किती, कुठवर धावत राहायचं, हा गंभीर प्रश्‍न बनला आहे. आजचा सामान्य माणूस, तरुण चंगळवादाच्या गर्तेत अडकत आहे....

कोणत्याही देशाचं भविष्य त्या देशातल्या तरुण पिढीवर अवलंबून असतं. हे चित्र जगभरातच पाहायला मिळतं. भारताबद्दल बोलायचं तर देशाच्या एकूण लोकसंख्येत तरुणांची संख्या खूप जास्त आहे.त्यामुळे लोकसंख्येचा एवढा मोठा हिस्सा असणार्‍या  तरुणांचा विचार होणं, ही खूप महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. पण, कोणत्याही समस्येचा वेध घेताना फक्त एकाच प्रश्‍नाचा विचार करता येत नाही, तर त्यात त्या भोवतीच्या सगळ्या परिस्थितीचे धागेदोरे गुंतलेले असतात आणि  त्याच्या परिणामांमुळे आज आपल्याला दिसणारी परिस्थिती निर्माण होते. आजच्या तरुणाईवर असणार्‍या ताणामागे, दडपणामागे खरं तर अनेक कारणं आहेत. पण, एक महत्त्वाचं कारण इथे नमूद करावंसं वाटतं ते 1990 नंतर भारताने स्वीकारलेल्या आर्थिक धोरणाचं. त्यात जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण या तीन महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. त्यामुळे यानंतरच्या काळात आपली सगळी मूल्यव्यवस्था झपाट्याने बदलून गेली, असं मला वाटतं. 

प्रत्येकाच्याच आयुष्यात पैशाला महत्त्व असतं. पण, हे महत्त्व किती असावं याचाही विचार व्हायला हवा. आज माणसाला पैसा हेच सर्वस्व वाटू लागलं आहे. म्हणजे पैशांसाठी ते काहीही करायला तयार आहेत. आपण फक्त सुपारी घेऊन खून करणार्‍यांनाच यात मोजू शकतो. काही हजार किंवा लाख रुपये मिळतात म्हणून ते खून करतात. पण, खून ही खूप ढळढळीत दिसणारी गोष्ट आहे. पण याही पलीकडे न दिसणार्‍या पण तितक्याच हानिकारक ठरणार्‍या गोष्टी माणसं पैशांच्या मागे लागून करतात. उदाहरणार्थ माझं दोन खोल्याचं घर आहे, माझं कुटुंब चार माणसांचं आहे तर मला तीन किंवा चार खोल्यांचा फ्लॅट योग्य ठरेल. आता मी हे शहरी मध्यमवर्गीयांविषयी बोलतेय. एवढंही न मिळणारा खूप मोठा वर्ग आहे याची मला जाणीव आहे. शहरातल्या शिकलेल्या, नोकरी करणार्‍या माणसांना याच्याहून थोडं जास्त हवंसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. 

मी गांधींचा विचार मानत असले तरी त्यांच्याइतकं साधेपणाने राहाण्याची कुवत माझ्यात नाहीत. त्यामुळे मीसुद्धा सर्वसामान्य माणसांपैकीच एक आहे आणि त्या सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षांचा विचार करताना मला नेहमी असं वाटतं, की आधी म्हटल्याप्रमाणे दोन खोल्यांऐवजी चार खोल्यांचं घर हवं इथपर्यंत ठिक आहे. इथे आपल्याला थांबता यायला हवं. पण मग मला वाटतं की, त्यापेक्षा मोठा बंगलाच असावा. तिथेही मला थांबता येत नाही. मग मला वाटतं की माझं एक सेकंड होमही असावं. अपेक्षांचं हे असं वाढत जाणं माणसाला कधीही थांबायला न शिकवणारं आहे. इथे मी टॉलस्टॉयची एक गोष्ट सांगेन. त्याने एकदा एका गावात पैज लावली होती. त्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत माणसं जेवढ्या जमिनीवर पळतील तेवढी जमीन त्यांच्या मालकीची होईल, अशी अट घालण्यात आली होती. या स्पर्धेत अनेकजण सहभागी झाले होते. काही लवकर तर काही उशीरा परत आले. एक माणूस खूप लांबवर गेला. परत आला आणि आल्यावर धापा टाकत मरून गेला. आपल्यालाही असेच मरून जायचंय का यापेक्षा थोडं कमी असलं तरी चालेल. पण, सुखा-समाधानाने राहायचं आहे याचा हिशेब प्रत्येक माणसाने करायला हवा. 1990 नंतरच्या जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणामुळे माणसाची हाव खूप वाढली. समोर मोहमयी असं भयानक दुष्ट जग त्याला दिसू लागलं. सतत जाहिरातींचा मारा होऊ लागला. तरुणांपासून म्हातार्‍या माणसांपर्यंत प्रत्येकासाठी इथे काही ना काही उपलब्ध झालं. तरुणांच्या सौंदर्यवर्धनासाठी काही उत्पादनं आहेत, तर वयस्करांना सुरकुत्या कमी करण्यासाठी काय करायला हवं हे सांगितलं जात आहे. ही यादी खूप मोठी आहे. आपल्याला मिळालेलं शरीर आरोग्यपूर्ण असणं ठीक आहे. पण, ते सुंदर करण्यासाठी सतत प्रयत्न करत बसण्याला काही अर्थ नाही. स्त्रीयाच नाही तर आता पुरुषांसाठीही बरीच सौंदर्यप्रसाधनं आहेत. या सगळ्यात आपण आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट हरवत चाललो आहोत की काय, याचा विचार व्हायला हवा. 

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे अधोरेखित करावासा वाटतो. आज सर्वांना शिक्षण मिळावं असा विचार असला, तरी आपल्याकडे तशी काही सोय नाही. सगळ्यांना दहावीपर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळावं असा अहवाल शिक्षणतज्ज्ञांनी कधी तरी दिला होता. पण, आजतागायत असं काही घडलेलं नाही. पण माणसांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं आहे. अशा प्रकारे निराश झालेली, पोटापाण्यापुरतं का होईना पण शिकावं लागणार याची जाणीव झालेली बरीच मुलं आहेत. (प्रत्यक्षात माणसासारखं जगता यावं आणि विचार करता यावा यासाठी शिक्षण आहे.) अर्थातच पोटासाठी पैसा लागतोच म्हणून मिळवायला तर हवा. पण, मग पुन्हा आधीचंच किती मिळवत राहायचं, कुठवर धावत राहायचं आणि केव्हा मरून जायचं, हे प्रश्‍न उपस्थित होतात. आजचा तरुण या सगळ्या विचारांच्या आहारी गेला आहे. या सगळ्याचा ताण त्याच्यावर आहे. दुसरं म्हणजे तो तंत्रज्ञानाचा बळी आहे. तंत्रज्ञान खूप चांगलं आहे, खूप आवश्यक आहे यात काहीच वाद नाही. तंत्रज्ञानामुळे हजारो मैलांवरच्या माणसाशी आपण क्षणात संपर्क करू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण, या एकाच साधनामुळे घरातला संवाद संपत चालला आहे. घरात नवर्‍याशी, बायकोशी, वडिलांशी, आईशी संवाद तुटल्याचं आपण बघतो. कारण आपण सतत दूरच्या माणसांशीच बोलतो. या तंत्रज्ञानाची ताकद आपण योग्य प्रकारे वापरू शकलेलो नाही. आपण त्याच्या आहारी गेलो आहोत. एखाद्या व्यसनाच्या आहारी जावं त्याचप्रमाणे आपण तंत्रज्ञानाचे बळी ठरलो आहोत. हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही तर आपल्या हातातल्या मोबाइलमध्ये काय नाही, असा प्रश्‍न पडावा इतकी ताकद त्याच्यात आहे. या मोबाइलवर तरुण मंडळी हवी ती माहिती मिळवू शकतात. लैंगिकतेबद्दलही आज बरंच काही उपलब्ध आहे. पण तंत्रज्ञानाने तरुणाईवर फक्त माहितीचा पाऊस पाडला आहे. त्यांना शहाणपण दिलेलं नाही. या पावसापासून बचाव करून आपण स्वत:ला सुरक्षित कसं ठेवू हे मुलांना कळत नाही. त्यामुळे एकीकडे बेकारी आहे, एकीकडे स्त्री-पुरुष मिलनाची स्वाभाविक ऊर्मी खूप जोरात उफाळून येतेय. माहिती आहे पण ती कशी वापरावी, हे कळत नाही. यामुळे अत्याचार घडण्याकडे प्रवृत्ती वाढली आहे. त्यातूनच निर्भयासारखी पाशवी, घृणास्पद प्रकरणं घडत आहेत. 

आजच्या तरुणाईला पैसा मिळवण्याचं शिक्षण मिळालं आहे, पण जगण्याचं शिक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे माणसासारखं जगणं म्हणजे काय, हे त्यांना कळलेलं नाही. याचे खरं तर दोन निकष आहेत. प्रत्येक माणसाला माणसासारखं जगायचं असेल तर आपल्याला मिळालेला मानवेतर प्राण्यांपेक्षा प्रगल्भ असलेला मेंदू (जो इतर प्राण्यांपेक्षा खूप अधिक विचार करू शकतो) त्याने डोळे उघडे ठेवून वापरायला हवा. हे माणूसपणाचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे माणुसकी. माणुसकी म्हणजे काय तर, या जगातल्या सगळ्या माणसांकडे सहानुभूतीने, करूणेने, त्यांचे प्रश्‍न समजून घेऊन बघण्याची दृष्टी विकसित करणं, संवेदनशीलता असणं. मेंदू आणि माणुसकी या दोन गोष्टी सांभाळून, त्याचं जतन करून जगतो तो माणूस. हे माणसासारखं जगणं ना शिक्षणाने मुलांना दिलं ना घरातून मिळालं. अर्थात, सगळा दोष शिक्षणाचा नाही. 

शिक्षणाच्या दृष्टीने अडाणी असलेल्या काही घरांमधले आई-वडील आणि मुलं खूप शहाणी असू शकतात. त्याचं श्रेय त्या विचार करणार्‍या माणसांचं आहे. तो विचारच सध्या कमी आहे. माणसं विचार करत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. ती फक्त धावत सुटली आहेत. आपण मरू का जिंकू, मिळवू का मिळवणार नाही, याचा विचार न करता माणसं फक्त धावत सुटली आहेत. त्यामुळे ती कुठे पोहोचतील आणि काय मिळवतील, हे सांगता येत नाही. म्हणूनच थोडं थांबायला हवं. थोडा विचार करायला हवा. थोडा संवाद करायला हवा. या सगळ्यामुळे तरुणाईवरचं दडपण कमी व्हायला नक्कीच मदत होईल.