भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकाची कायम चेष्टा व्हायची. अस्वच्छ रेल्वे स्टेशन्स, दुर्गंधी, अस्वच्छ डबे असं एक चित्र कायम समोर असायचं. आता मात्र रेल्वेचं हे चित्र बदलायला लागलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आता रेल्वेत आमुलाग्र सुधारणा व्हायला लागल्या आहेत. रेल्वे स्टेशन्स आता विमानतळासारखी चकाचक व्हायला लागली आहेत. रेल्वेची ही प्रतिमा निश्‍चित चांगली आहे. कसं घडतंय हे स्थित्यंतर?

आज सर्वच क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यातून अचूकता, गतिमानता येते. भारतीय रेल्वेही त्याला अपवाद नाही. पूर्वी नवं तंत्रज्ञान अंगीकारण्यास वर्षामागून वर्षे जायची. आता मात्र दर वर्षी तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे आणि त्याचा अंगीकारही लगेच होत आहे. भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षभरात बरंच नवं तंत्रज्ञान स्वीकारलं आहे. इंजिनाशिवाय रेल्वेगाड्या धावायला लागल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या गाड्या इको-फ्रेंडली व्हायला लागल्या आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय प्रवाशांना जागतिक दर्जाचा रेल्वेप्रवास अनुभवायला मिळण्याचा अवधी फार दूर राहिलेला नाही. आता भारतीय रेल्वेकडे डब्यांची अजिबात कमतरता नाही. आता वाय-फाय सुविधा असलेल्या, सीसीटीव्हींची व्यवस्था असलेल्या अधिक आरामदायी डब्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यात प्रवाशांची अधिक सुरक्षितता लक्षात घेण्यात आली आहे. या डब्यांचे दरवाजे स्वयंचलित असतील. दरवाजाजवळ बसून किंवा दरवाजा उघडा ठेवून प्रवास करण्याचा आनंद मात्र प्रवाशांना लुटता येणार नाही! अतिवेगवान असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवाशांचा अनुभव चांगला आहे. गेल्या वर्षभरात प्रवाशांकडून मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून जागतिक दर्जाची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आता आणखी आरामदायी बैठक व्यवस्था करण्याचं नियोजन केलं जात आहे. भारतीय रेल्वे आता आरामदायी डबे निर्यात करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय रेल्वेनं कधी नव्हे एवढ्या डब्यांची निर्मिती केली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये जेवढ्या डब्यांची निर्मिती केली नव्हती, तेवढी निर्मिती अलीकडच्या काळात करण्यात आली आहे. 2018-19 या वर्षात 5836 डब्यांची निर्मिती करण्यात आली. मॉडर्न कोच फॅक्टरीनं डब्यांचं उत्पादन दुप्पट केलं आहे. आता रायबरेलीला रेल्वेच्या डब्यांची निर्मिती सुरू झाली आहे. पुढच्या वर्षात डब्यांच्या निर्मितीचं उद्दिष्ट तिप्पट ठेवण्यात आलं आहे.

भारतीय रेल्वेनं आता पर्यावरणपूरक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. 2010 मध्ये प्रथमच 31 डब्यांमध्ये 57 जैविक स्वच्छतागृहं उभारण्यात आली. त्यानंतर रेल्वेनं या कामाला गती दिल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये 61 हजार पाचशे डब्यांमध्ये दोन लाख वीस हजार जैविक स्वच्छतागृहं बांधण्यात आली आहेत. देशातल्या साडेनऊशे रेल्वे स्टेशन्समध्ये एकात्मिक स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली आहे. 13 स्टेशन्सना हरित प्रमाणपत्रं मिळाली आहेत. गेल्या वर्षी रेल्वेद्वारे होणार्‍या मालवाहतुकीत घट झाली असली, तरी रेल्वेनं आता मालवाहतुकीतही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रेल्वेद्वारे सत्तर लाख टन मालाची वाहतूक होत होती. ती आता एक अब्ज टन करण्याचं नियोजन केलं जात आहे. मालवाहतुकीच्या वॅगनची रचना बदलण्यात येत आहे. सिमेंट, राख, पोलादासह अन्य मालवाहतुकीसाठी डब्यांची रचना केली जात आहे. ‘स्मार्टन यार्ड’ची संकल्पना राबवली जात आहे. भारतीय रेल्वेनं रेल्वे स्टेशनच्या बांधणीसाठी एका महामंडळाची निर्मिती केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची स्टेशन्स बांधली जात आहेत. त्यातल्या आनंद विहार, बिजस्वान आणि चंदीगड या तीन स्टेशन्सची कामं पूर्ण झाली आहेत. या रेल्वे स्टेशन्सचा लूक विमानतळांसारखा असून, स्टेशन्स ही केवळ रेल्वे थांब्यापुरती मर्यादित असणार नाहीत तर व्यापारी दृष्टीनं वापर करता यावा, अशी रचना करण्यात आली आहे. आनंद विहार रेल्वे स्टेशमधलं प्रतीक्षालय अत्याधुनिक धाटणीचं असेल. या रेल्वे स्टेशनमध्ये चार प्रतीक्षालयं असतील. त्यातली दोन वातानुकुलित तर दोन साधी आहेत. त्यात उत्तम दर्जाची आसन व्यवस्था आहे. या प्रतीक्षालयात चहा, बर्गर, स्नॅक्स तसेच अन्य खाद्यपदार्थांचा समावेश असेल. तिथे ब्रँडेड ज्युस मिळेल. हबीबगंज आणि गांधीनगर या दोन स्टेशन्सची नवनिर्मिती यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. हबीबगंज रेल्वे स्टेशनचं काम आगामी तीन महिन्यांमध्ये पूर्ण होईल, तर गांधीनगर स्टेशनचं काम या वर्षअखेर पूर्ण होईल. हबीबगंज हे देशातलं जागतिक दर्जाचं पहिलं स्टेशन असून, त्याची रचना जर्मनीतल्या हेडनबर्ग स्टेशनसारखी आहे. बन्सल गु्रपसोबत सार्वजनिक-खासगी भागीदारीत या स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनसाठी शंभर कोटी रुपये तर स्टेशनभोवतीच्या व्यापारी संकुलाच्या विकासासाठी साडेतीनशे कोटी रुपये खर्च आला आहे. ग्लास डोमच्या आकाराच्या या रेल्वे स्टेशनमध्ये प्रतीक्षालय, संग्रहालय, गेमिंग झोन, हरित इमारत, एलईडी लाईट, मॉड्युलर टॉयलेट आदींची व्यवस्था असेल. गांधीनगर स्टेशनचा विकासही अशाच प्रकारे केला जात आहे. त्यात सहाशे प्रवाशांची बसण्याची व्यवस्था, फूड स्टॉल्स, दुकानं, पंचतारांकित हॉटेल्स आदींचा समावेश आहे. रेल्वे स्टेशन्स विकास महामंडळ नागपूर, ग्वाल्हेर, अमृतसर, शिवाजीनगर, सुरत, जयपूर, साबरमती, कानपूर, ठाकुर्ली आदी स्टेशन्सचा विकास करणार आहे. या वर्षात ही कामं पूर्ण करण्याचं नियोजन आहे.

दिल्ली-मेरठ हा प्रवास 55 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यासाठी वेगवान कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे. दिल्ली-गाझियाबाद-मीरत हा 82 किलोमीरचा रेल्वे कॉरिडॉर असेल. दिल्ली-गुरगाव-अल्वार हा कॉरिडॉर 164 किलोमीटरचा असेल. हा प्रवास चार तासांचा असेल. दिल्ली-सोनिपत-पानिपत या कॉरिडॉरचा कर्नालपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. 103 किलोमीटरच्या या प्रवासात 17 स्टेशन्सचा समावेश आहे. पाच हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे. केरळमध्ये सेमी हायस्पीड ट्रेनसाठी हवाई सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. तिरुअनंतपूरम ते कासारगोड या लोहमार्गाचा पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा लोहमार्ग पूर्ण झाला आहे. हा लोहमार्ग पूर्ण झाल्यानंतर तिरुअनंतपूरमपासून चार तासांमध्ये कासारगोडला जाता येणार आहे. हे 532 किलोमीटरचं अंतर आहे. सिल्व्हर लाईन असं या प्रकल्पाचं नाव आहे. हा केरळ सरकार आणि रेल्वेचा संयुक्त प्रकल्प आहे. नवा लोहमार्ग सध्याच्या तिरुर ते कासारगोड या लोहमार्गाला समांतर असेल. तिरुर ते तिरुअनंतपूरमचा लोहमार्ग मात्र स्वतंत्र असेल. तिरुअनंतपूरम-कासारगोड हायस्पीड लोहमार्ग तिरुअनंतपूरम आणि कोची विमानतळांना जोडणारा असेल. या हायस्पीड प्रकल्पात दहा स्टेशन्सचा समावेश आहे. हा हायस्पीड लोहमार्ग 11 जिल्ह्यांमधून जातो. रेल्वे गाड्या या लोहमार्गावरून दोनशे किलोमीटर वेगानं धावू शकतील.

एकंदरीत, भारतीय रेल्वे वेगाने रूप पालटत आहे. तिला आधुनिकीकरणाचे वेध मागेच लागले. आता वेगाने राबवल्या जात असलेल्या अत्याधुनिक सेवा-सुविधांमुळे नवं स्थित्यंतर जवळून अनुभवायला मिळत आहे.