पुणे

छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात पुणे येथे ङ्गसारथीफ संस्थेच्या बचावासाठी उपोषण सुरू झाले होते. यावेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मात्र, संस्थेसंदर्भात असलेल्या विविध मागण्या सरकारच्या वतीने मान्य करण्यात आल्याचे आश्‍वासन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाल्यानंतर हे उपोषण थांबवण्यात आले. यानंतर माध्यमांना मंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देत, उपोषण मागे घेण्यात आले असल्याची तसेच, सारथी संस्थेची स्वायत्ता अबाधित राहणार असल्याची माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात सारथीसंदर्भात उपोषण आंदोलन सुरू होते. सारथी या संस्थेबाबत जी स्वायत्तता आहे, ती कायम राहिली पाहिजे. जे.पी.गुप्ता या अधिकार्‍याने सारथी संस्थेत हस्तक्षेप करता कामा नये, संस्थेला कुठेही निधीमध्ये किंबहूना जे काही अधिकार स्वायत्ततेचे आहेत ते कायम राहिले पाहिजे, परिहार यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला जाऊ नये अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर मी मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोललो आहे, छत्रपती संभाजी राजे व समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या, त्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदय सकारात्मक होते. सारथीची स्वायत्तता अबाधित राहील, यामध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाही, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. तसेच, जेपी गुप्ता यांना सारथीच्या कामकाजातून बाजूला करण्यात येत आहे, असा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. तर, परिहार यांचा राजीनामा सरकारने स्वीकारलेला नाही, ते पूर्वाप्रमाणे काम सुरू ठेवतील.

सारथी संस्थेला कसलीच कमी पडणार नाही. कारण, या संस्थेच्या माध्यमातून यूपीएससीसारखे अनेक जे काही अभ्यासक्रम आहेत, त्यामध्ये समाजाचे जे काही विद्यार्थी आहेत. या विद्यार्थांना जो फायदा होत आहे, त्यापासून कोणी वंचित राहणार नाही. यासाठी सरकार कटाक्षाने लक्ष ठेवेन याचबरोबर अन्यदेखील ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारने पूर्ण केलेल्या आहेत. म्हणूनच छत्रपती संभाजी राजेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

तसेच, यापुढेदेखील समाजासाठी सर्वोच्च न्यायालयात आपली जी लढाई सुरू आहे, त्यामध्ये कायदेतज्ज्ञांची कमतरता भासणर नाही. ज्या तरुणांवर आंदोलनाच्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत, त्या मागे घेण्यासंदर्भातदेखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. जे काही प्रश्‍न असतील ते नक्कीच सोडवले जातील, असे आश्‍वासनही मंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.