काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी गोरगरीब, दलित, मुस्लिम आणि आदिवासींबद्दल कणव बाळगण्यात आणि त्यांच्यावर अत्याचार झाल्यास धावून जाण्यात पुढे असतात. भाजपला मात्र हे मान्य नसावं. या पक्षाच्या नेत्यांना काँग्रेस पक्षापेक्षा नेहरू-गांधी घराण्याचा आत्यंतिक तिरस्कार आहे. त्यामुळेच पोलिसांनी गळा पकडून धक्काबुक्की केल्याचा प्रियांका यांनी केलेला आरोप दुर्लक्षिला गेलाच पण पोलिसी दंडेलशाहीही पाहायला मिळाली.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यात इंदिरा गांधींची आक्रमकता आणि नेतृत्वगुण आहेत, हे कोणीही नाकारणार नाही. गोरगरीब आणि दलित, मुस्लिम आणि आदिवासींबद्दलची कणव बाळगण्यात आणि त्यांच्यावर अत्याचार झाल्यास धावून जाण्यात त्या नेहमीच पुढे असतात. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात लखनौमध्येही आंदोलन झाले. त्यात सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस.आर. दारापुरी यांना अटक करण्यात आली. त्यांना भेटण्यासाठी प्रियांका दिल्लीहून तेथे जात होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. अशा वेळी प्रियांका यांनी स्कूटरवरून त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि तसा तो राबवला. परंतु, त्यावेळी पोलिसांनी आपला गळा पकडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रियांका यांनी केला आहे. देशातल्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या महिला नेत्याचाच हा अनुभव असेल तर सर्वसामान्य माणसाची सुरक्षितता कितपत असेल, असा प्रश्‍न यामुळे उपस्थित झाला. तुम्ही मला रस्त्याच्या मधोमध कसे अडवू शकता? यामुळे अपघात होऊ शकला असता, असे उद्गार प्रियांका यांनी काढले. स्कूटरवरुन जात असताना पोलिसांनी त्यांना घेरले. त्यामुळे त्या तिथून उतरून चालत गेल्या. 

उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आनंदी आनंद आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपशासित राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण बिलकुल कमी झालेलं नाही. परंतु, आपल्या अन्य कामात चुकारपणा करणार्‍या पोलिसांनी प्रियांका यांना विनाहेल्मेट स्कूटरवरून नेणार्‍या चालकास व स्कूटरच्या मालकास आर्थिक दंड केला. वास्तविक, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. अशा वेळी प्रियांका वड्रा यांची भीती बाळगण्याचं कारण काय? मात्र, भाजपला काँग्रेस पक्षापेक्षा नेहरू-गांधी घराण्याचा आत्यंतिक तिरस्कार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणजे ‘दंगा करो पार्टी’ आहे आणि प्रियांका यांची नौटंकी मतं मिळवून देणार नाही, अशी शेरेबाजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केली आहे. वास्तविक, पोलिसांनी गळा पकडून धक्काबुक्की केल्याचा जो आरोप प्रियांका यांनी केला आहे त्याची आम्ही चौकशी करू, असं त्यांनी म्हणणं आवश्यक होतं. उत्तर प्रदेश हे हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे, अशी भावनात्मक भाषाही मौर्य यांनी केली आहे. 

वास्तविक, राम मंदिर आंदोलनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात संघपरिवार आणि भाजपने हिंसक धिंगाणा घातला होता, हे लोक विसरलेले नाहीत. प्रियांका या मुसलमनांचं लांगूलचालन करत असून, दंगेखोरांचं समर्थन करत आहेत, असे तारे राज्याचे दुसरे एक उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी तोडले आहेत. नागरिकत्व कायदाविरोधी आंदोलकांचा सूड घ्या, असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. म्हणजे, भडकाऊ भाषा केली, ती त्यांनी. उलट, योगीजींच्या भगव्या वस्त्रांचा उल्लेख करून, तुम्ही खर्‍या हिंदू धर्माप्रमाणे आचरण करा, हिंदू धर्मात सूड आणि हिंसेला जागा नाही, असं आवाहन प्रियांका यांनी केलं. मात्र, शर्मा यांनी प्रियांका यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. भगवा रंग हा हिंसक प्रवृत्तींना चालना देऊन देशात अशांतता माजवतो, असं प्रियांकाना म्हणायचं आहे, असा पूर्णपणे चुकीचा अर्थ शर्मा यांनी लावला. सोनिया गांधी, राहुल गाधी आणि प्रियांका गांधी यांची सुरक्षा मोदी सरकारने कमी केली आहे. परंतु, व्यक्तिशः याचा बाऊ न करता आणि आपल्याला पोलिसांनी दिलेली वागणूक बाजूला ठेवून प्रियांका यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशमधल्या सामान्य माणसाच्या सुरक्षिततेच्या मागणीवर प्रियांका यांनी भर दिला आहे. 

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधल्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून दहा दलितांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्यातील सरंजामदार वर्गाची दहशत वाढली आहे. त्यावेळी दलितांच्या बाजूने उभे राहण्यासाठी प्रियांका त्यांच्या कुटंबियांना भेटण्यासाठी जात होत्या. परंतु, त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. त्या विरुद्ध सर्वत्र ओरड सुरू झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि योगी सरकार बचावात्मक पावित्र्यात आले. जामिया मिलिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, ग्रंथालयात नासधूस केली, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याची प्रतिक्रिया देशभर उमटली. विरोधक, विद्यार्थी, पत्रकार या सर्वांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. परंतु कितीही हुकूमशाही पद्धतीने शासन केले तरी आवाज दाबता येणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रियांका यांनी व्यक्त केली होती. 

देशातल्या वाहन उद्योगातली प्रचंड मंदी दूर करण्यासाठी सरकारने त्वरेने उपाययोजना करावी; अन्यथा उत्पादन कपातीचं आणि बेरोजगारीचं संकट अधिकाधिक गहिरं होत जाईल, असा इशाराही प्रियांका यांनी दिला होता. प्रख्यात अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यावर जगभर अभिनंदन करण्यात आलं. बॅनर्जी यांनी ‘न्याय’ योजनेच्या आखणीत मदत केली होती. परंतु, काँग्रेसचाच पराभव झाला आणि बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे असल्याबद्दल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी टीका केली होती. तेव्हा बॅनर्जी यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांवर टीका करण्याऐवजी आणि एकूण कॉमेडी करण्याऐवजी गोयल यांनी देशाची अर्थव्यवस्था रूळावर येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा शब्दांमध्ये प्रियांका यांनी हल्ला चढवला होता.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होतील तेव्हा पक्षाची जबाबदारी प्रियांका गांधींवर असेल यात शंका नाही. त्या दृष्टीने त्या उत्तर प्रदेशमध्ये सातत्यानं भेटी देत आहेत आणि आंदोलनंही करत आहेत. योगी सरकारच्या कारभारावर तेथील जनता नाराज आहे. परंतु समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवरदेखील जनता खूष नाही. अशा वेळी काँगे्रससाठी तिथे जागा निर्मण करण्याची धडपड प्रियांका गांधी करत आहेत. योगी आणि मोदी सरकारच्या डोळ्यात हे सलत आहे.     

देशात विरोधी पक्षांना आपलं म्हणणं मांडण्याचा, आंदोलन करण्याचा आणि पीडितांना भेटण्याचा अधिकार नाही का? ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍यांनाच देशात स्थान आहे, असे उद्गार पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काढले आहेत. कोणालाही, कधीही आणि कुठेही ‘भारतमाता की जय’ म्हणायला सांगायचं आणि प्रतिसाद न दिल्यास हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मारहाण करायची, हा अनुभव गेली पाच वर्षं देश घेत आहे. राष्ट्रभक्तीची सर्टिफिकिटं वाटण्याचा सपाटा भाजपच्या नेत्यांनी लावा आहे. ऊठसूट कोणालाही देशद्रोही वा शहरी नक्षलवादी संबोधलं जात आहे. नागरिकत्व कायद्यासंदर्भातल्या आंदोलकांना ‘तुम्ही पाकिस्तानात चालते व्हा’, असा ‘आदेश’ मेरठचे पोलीस अधीक्षक अखिलेश नारायण सिंग यांनी दिला. सध्याच्या वातावरणात जनतेत या कायद्याबद्दल विश्‍वास निर्माण करण्याची गरज असताना, अखिलेश सिंग यांनी केलेलं हे वक्तव्य लोकांच्या विश्‍वासाला तडा देणारं आहे. त्यांच्या या उद्गाराबद्दलचा व्हिडिओ खरा असल्याचं निष्पन्न झाल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असं केंद्रीय अल्पसंख्य कामकाज खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचं हे आश्‍वासन दिलासादायक आहे. एवढाच काय तो या संदर्भातल्या प्रतिक्रियांमधला आश्‍वासक भाग आहे. 

नागरिकत्व कायद्याविरुद्धच्या लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘खेलो इंडिया’चं उद्घाटन करण्यासाठी दहा जानेवारीला गुवाहाटीत आल्यास, तीव्र निदर्शनं करण्याचा इशारा ‘आसू’ संघटनेने दिला आहे. ‘युवक व्यवस्थेवर विश्‍वास ठेवतात. व्यवस्थेला प्रश्‍नही करतात. परंतु, युवकांना अराजकता, अव्यवस्था नापसंत आहे’, असं प्रतिपादन मोदींनी नुकतंच ‘मन की बात’मध्ये केलं आहे. परंतु, त्यांच्या पक्षातच काही अराजकतावादी प्रवृत्ती आहेत. मोदींनी आधी त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा या संदर्भात साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी प्रज्ञासिंह अशी अनेक नावं पुढे येऊ शकतात. सामान्यजनांनी अशी कितीजणांची नावं घ्यायची?

 

 

अवश्य वाचा