जागतिक हास्य दिन 

इतर दिनविशेष :

1) 1840 - इंग्लंड येथे पेनी पोस्ट सेवा सुरु झाली.

2) 1901 - इतिहास संशोधक गणेश हरी खरे यांचा जन्म.

3) 1946 - लंडन येथे युनोचे पहिले अधिवेशन भरले.

4) 2003 - चर्चगेट स्टेशन स्थापून 133 वर्षे पूर्ण झाली.

5) 2016 - मेक्सिकोत युवा फुटबॉलपटूना घेऊन जाणारी 

  बस नदीत कोसळून 20 ठार.

पहिल्या बाजीरावाची 1720 मध्ये पेशवेपदावर नियुक्ती  झाल्यावर आपल्याला अनुकूल अशा कर्तृत्ववान मराठी सरदारांची फळी त्याने निर्माण केली. त्या वेळेस दुसर्‍या फळीतील ही कर्तृत्ववान मंडळी लवकरच मराठी दौलतीचे खांब बनली. त्यामध्ये राणोजी शिंदेचे कर्तृत्व हेरून बाजीरावाने त्यास उत्तरेस सरदार म्हणून नेमले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जयाप्पा, दत्ताजी व महादजी या तीन मुलांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यात दत्ताजी शिंदे आपल्या बलिदानाने मराठ्यांच्याच नव्हे, तर अफगाणांच्या इतिहासातही अजरामर झाला. मराठ्यांच्या दिवसेंदिवस वाढत चालणार्‍या उत्तरेकडील वर्चस्वाला रोहिल्यांचा सरदार नजिबखानाने धर्मयुद्धाचे स्वरुप दिले. हे असेच चालले तर एक दिवस ‘इस्लाम’ हिंदुस्थानातून उखडून बाहेर फेकला जाईल, अशी आवई त्याने आपल्या धर्मबांधवांना केली. परिणामी, उत्तरेकडील सारे मुसलमान मराठ्यांविरुद्ध एक झाले. नजिबच्या बंदोबस्तासाठी पेशव्यांनी राघोबास पाठवले. राघोबाने मोठ्या धैर्याने नजिबास पकडून कैद केले. तथापि, नजिबाला मल्हाररावाने धर्मपुत्र मानल्याने राघोबास त्याला ठार मारता आले नाही. त्याला कैदेत ठेवले. पण, तो तेथून शिताफीने निसटला. पुढे नजिबने मराठ्यांशी गोड गोड बोलून, त्यांना बेसावध ठेवून अब्दालीला इस्लामच्या रक्षणासाठी हिंदुस्थानात आणले, ही वार्ता दत्ताजीला अब्दाली पंजाबात आल्यावर समजली.

त्याला प्रतिकार करण्यासाठी दत्ताजी सज्ज झाला. अब्दाली व रोहिले दिल्लीपासून अवघ्या सात मैलांवर असणार्‍या लुनी येथे येऊन ठेपले, तेव्हा अब्दालीने यमुना पार करण्याचा धाडसी बेत आखला. गुरुवार, दि. 10 जानेवारी 1760 रोजी अब्दालीने एकाच वेळी चार ठिकाणांहून यमुना ओलांडलीही. इकडे मराठ्यांच्या छावणीत संक्रांतीचा सण साजरा होत होता. तिळगूळ खात मराठे निवांत बसले असताना ‘गनीम गिलचे आले आले’ अशा बोंबा रावतांनी मारल्या. सावध होऊन मराठ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

पण, दत्ताजी हा मल्हारराव होळकरांची वाट पाहात होता. तथापि, होळकर काही आले नाहीत. अब्दाली तर समोर. तेव्हा दत्ताजीने बयाजी शिंदेला पुढे पाठवले, पण गोळी लागून तो ठार झाला ही वार्ता दत्ताजीला समजताच तो आपल्या फौजेसह घोड्यावर स्वार झाला. त्याच्यापाठोपाठ जनकोजी शिंदेही चालू लागला. नजिब आणि त्याचा गुरु कुतुबशहा मराठ्यांच्या विरोधात सुडाने पेटले होते. घशाला कोरड येईपर्यंत ‘हाणा, मारा, काफरांना तोडा, झोडा, मोडा’  असे ओरडत होते. इकडे मराठ्यांचे भाले रोहिल्यांच्या पोटात तर तलवारी माना कापू लागल्या. ‘या अल्लाह, या अल्लाह, या खुदा’ असे करून रोहिले किंकाळू लागले. परंतु, मराठ्यांकडे बंदुका नव्हत्या आणि तोफखानाही छावणीवर. याचा फायदा अब्दालीच्या सैन्याने घेतला. गनिमांच्या बंदुकीपुढे निधड्या छातीचे मराठे धडाधड कोसळू लागले. अशाही स्थितीत दत्ताजी धीराने पुढे सरकत होता. तोच मालोजी शिंदे गोळी लागून ठार झाल्याचे त्याला समजले. हे कळताच दत्ताजी चवताळला. हरहर महादेवच्या घोषणा देत शत्रूवर तुटून पडला. तथापि, बंदुकांपुढे मराठ्यांच्या तलवारीची धार कमी पडली. मराठी फौजेची दाणादाण उडाली; चोहीकडे मराठ्यांच्या प्रेतांच्या राशीच राशी दिसू लागल्या. तोच जनकोजी शिंदे ठार झाला, हा शब्द कानी पडताच वीर अभिमन्यूप्रमाणे दत्ताजी अब्दालीच्या फौजेत घुसला. आता माघार नाही. ‘मारू किंवा मरू’ हा एकच निर्धार त्याने केला. बेधुंद होऊन एकेकाला आपल्या तलवारीने कंठस्नान घालत असता घात झाला. गोळी लागून दत्ताजी पडला. सर्वत्र हलकल्लोळ माजला. नजिबाने अंबारीतून टुणकन उडी मारली. त्याचा गुरू कुतुबशहा दात विचकत दत्ताजीला म्हणाला, ‘क्यूं पाटील और लढेंगे?’ अशाही अवस्थेत दत्ताजी म्हणाला, ‘क्यूं नही? बचेंगे तो और भी लढेंगे’! क्षणार्धात नजिबाने दत्ताजीची मान कापली आणि अब्दालीला भेट म्हणून दिली.

दत्ताजीच्या वधाचे हे हृदयद्रावक वर्णन राजवाडे, सरकार, शेजवलकरांसह अनेक इतिहासकारांना काल्पनिक वाटते. रोहिल्यांच्या शिपायांनी दत्ताजीचे शीर कापून नजिबाने ते ओळखून अब्दालीस भेट दिले, असे अलीकडचे संशोधन आहे. लढाईच्या या धुमश्‍चक्रीत असे संवाद घडणे अशक्यच! तथापि, इतिहासावर साहित्यिकांची हुकूमत असल्याने हीच गोष्ट शाळा-महाविद्यालयांतून अजून शिकवली जाते. म्हणून दत्ताजीच्या बलिदानाला कमीपणा येत नाही. होळकरांची साथ नसताना तसेच उत्तरेत रजपूत, जाट यांची मदत न घेता दत्ताजी एकटाच अब्दालीवर चालून गेला आणि वीरगतीला प्राप्त झाला. पेशव्यांचा तर सर्व सरदारांमध्ये दत्ताजीवर जास्त विश्‍वास होता. पेशवे त्यांच्याबद्दल बोलत, दत्त तो ईश्‍वराचे घरचे शिपाई! त्यास अब्दालीची तमा काय? जाऊन गाठ घातली ते त्यास सोडतील ऐसे नाही. यावरूनच दत्ताजीची थोरवी समजते.(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

 

अवश्य वाचा