ठाणे 

 कोरोना रुग्णांच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने ठाणे महापालिका प्रशासनाने दहा टीएमटी बसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस रुग्णवाहिकेतून एकाच वेळी दोन रुग्णांची वाहतूक करता येणार आहे.ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या तीन व खासगी 13 रुग्णवाहिकेमार्फत करोना रुग्णांची रुग्णालयांपर्यंत वाहतूक केली जात आहे. मात्र वाढत्या रुग्णांच्या तुलनेत या रुग्णवाहिका अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका उशिराने येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी ङ्गटीएमटीफच्या बसगाडया रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. एका बसमध्ये दोन खाटांचे नियोजन असणार आहे. चालकाच्या दालनापासून रुग्णवाहिकेचा भाग पूर्णत: स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. या बस रुग्णवाहिका तीन पाळ्यांमध्ये सेवा देणार आहेत. या सेवेसाठी 022 25399828 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पनवेल येथील इंडिया बुलमधील विलगिकरण कक्षासाठी अत्यावश्यक वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पालिकेने प्रत्येक कोविड रुग्णालयाला एक किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णवाहिकेची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमातील चार बसेस या रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्यात आलेल्या आहेत.नवी मुंबई पालिकेने वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड रुग्णालय अशी त्री स्तरीय रुग्ण सुविधा उभारली आहे. पनवेल येथील विलगीकरण कक्षात अत्यवस्थ झाल्यास एखाद्या रुग्णाला वाशीवरून रुग्णवाहिका बोलविल्यानंतर येण्याची सुविधा होती. त्या ठिकाणी पूर्णवेळ रुग्णवाहिका नसल्याने गैरसोय होत होती. पालिकेकडे स्वतच्या 12 रुग्णवाहिका असून पाच रुग्णवाहिका या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रादेशिक विभागाने दिलेल्या आहेत. त्यामळे 17 रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने पालिकेने एनएमएमटीच्या छोटया बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेकडे आता 21 रुग्णवाहिका झाल्या असून यातील कोविड व सर्वसाधारण रुग्णासाठी वेगवेगळ्या रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आलेल्या आहेत.