कल्याण  

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात मीटर रीडिंगनंतर लॉकडाऊन व त्यांनंतरच्या तीन महिन्यांच्या कालावधीचे एकत्रित वीजबिल देण्यास सुरुवात केल्यानंतर कल्याण परिमंडळात वाढीव वीजबिलाच्या तक्रारींची संख्या वाढली आहे. या तक्रारी व ग्राहकांच्या शंकांचे निवारण करण्यासाठी विविध स्तरांवर ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय तक्रारदार ग्राहकांशी मोबाईल अथवा प्रत्यक्ष संवाद साधून तक्रारी सोडविण्याच्या कर्मचार्‍यांना सूचना व वीजबिलांची पडताळणी करूनच तक्रारी नोंदविण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य अभियंता अग्रवाल यांनी 19 ते 23 जून दरम्यान प्रत्यक्ष भेट देऊन पालघर, वसई, कल्याण एक आणि दोन मंडल कार्यालयांतर्गत अधिकार्‍यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. तक्रार निवारणासाठी ग्राहक मेळावे घेण्याचे निर्देश त्यांनी या बैठकांमध्ये दिले आहेत. याशिवाय शहरी भागात सोसायट्यांचे पदाधिकारी व तक्रारी असणार्‍या ग्राहकांची प्रत्यक्ष भेट घेऊन अथवा नोंदणीकृत मोबाईलवर संपर्क साधून त्यांना बिलाचे सविस्तर विवेचन समजून सांगण्याचे निर्देश शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता व कर्मचार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार परिमंडलात वाढीव वीजबिलांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी ग्राहक मेळावे घेण्यात येत असून सोसायट्यांना भेट देऊन व मोबाईलवर संपर्क साधून वीजबिल कसे योग्य आहे, यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. 

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद