ठाणे

मुंबई, पुण्यानंतर सर्वाधिक करोनाबाधित असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या 24 तासांत तब्बल 39 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळं आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या 130 झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत सोमवारी 23 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं येथील करोनाबाधितांची संख्या 344 झाली आहे. त्यातील 130 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये 16 मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दिवसागणिक ही संख्या वाढत गेली. नव्या पॉझिटिव्ह आढळणार्‍या रुग्णांच्या तुलनेत बरे होणार्‍या रुग्णांचा आकडा खूपच कमी होता. सोमवारी प्रथमच डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपेक्षा अधिक होती, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये शास्त्री नगर रुग्णालयातील 5, होली क्रॉसमधील दोन, निऑन रुग्णालयातील 14 तर, टाटा आमंत्रा रुग्णालयातील पाच जणांचा समावेश आहे. त्यापैकी एक गर्भवती महिला असून दोन डायलिसीसवरील रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत पाच करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या 209 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत