कल्याण

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून बंद करण्यात आलेले ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंग आणि वीजबिल वाटप महावितरणकडून पुन्हा सुरु करण्यात आले आहे. कल्याण परिमंडलात प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून इतर ठिकाणी योग्य दक्षता बाळगण्याच्या हमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार मीटर रीडिंग व वीजबिल वाटपास सुरुवात करण्यात आली असून या कामात कर्मचार्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

 लॉकडाऊनमुळे महावितरणच्या कल्याण परिमंडळात मीटर रिडींग, वीजबिलांचे वाटप व वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आले होते. या कालावधीत ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात आले व केवळ डिजिटल माध्यमातून वीजबिल भरणा सुरु होता. परिणामी वीजबिलाचा भरणा सातत्याने घसरून महसूल घटला. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी जूनच्या सुरुवातीपासून वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तर आता ग्राहकांना वीज वापरानुसार अचूक बिल मिळावे व ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने व अटी-शर्थीचे पालन करून मीटर रीडिंग व बिल वाटप सुरु करण्यात आले आहे. संबंधित काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर व शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.  वीज ग्राहकांनी या कर्मचार्‍यांना सहकार्य करावे व वीजबिल भरणा केंद्रात प्रत्यक्ष अथवा ुुु.ारहरवळीलेा.ळप हे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट अँपच्या माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.