सांगली
सांगोला :
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोला तालुक्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला असून सदरचा पुरस्कार हा स्वातंत्र्यसेनानी किसनवीर भोसले यांच्या स्मरणार्थ किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना, भूईज ता. वाई जिल्हा. सातारा यांच्या वतीने देण्यात आला.
काल दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी,सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.मदन प्रतापराव भोसले यांच्यासह उपस्थित संपूर्ण संचालक मंडळ यांच्या हस्ते भाई गणपतराव देशमुख व सौ.रत्नबाई गणपतराव देशमुख यांना सन्मानचिन्ह व एक लाख रुपये रोख असा सन्मान व सत्कार करून पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बोलत असताना चेअरमन मदन भोसले म्हणाले की,महाराष्ट्राच्या विधिमंडळात संसदीय कार्यप्रणालीचा आदर्श म्हणजे भाई गणपतराव देशमुख आहेत.एक साधी राहणी व उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणारे आणि सर्वसामान्य गरीब लोकांसाठी आयुष्य वेचणार्या आबासाहेबांना पुरस्कार देणे म्हणजे पुरस्काराची उंची वाढवणे आहे.आबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजकीय वाटचाल सुरू करून तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा अनोखा राजकीय विक्रम केला.भाई गणपतराव देशमुख यांची खरी ओळखची माजी आमदार म्हणून नसून आबासाहेब हे नावच त्यांची खरी ओळख आहे.विधीमंडळातील प्रभावी वक्ता ,कार्यकुशल आमदार होण्यासाठी आपल्या नजरेसमोर फक्त भाई गणपतराव देशमुख हेच आदर्श लोकप्रतिनिधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सत्कार व पुरस्कार सोहळ्यास उत्तर देतात भाई गणपतराव देशमुख म्हणाले की, एका स्वातंत्र्यवीर सेनानीच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझा पुरस्कार नसून आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी व गोरगरीब जनतेने मला निवडून दिले त्याच सांगोला तालुक्यातील नागरिकांचा हा सन्मान आहे.स्वातंत्र्य चळवळीत ज्या व्यक्तीने अनेक महत्त्वाच्या चळवळीत सहभाग घेतला आणि स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्रातील विकासात मोठे योगदान दिले अशा किसनवीर भोसले यांच्या नावाने मला जो पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मला मिळालेल्या याअगोदरच्या सर्व पुरस्कारापेक्षा आगळावेगळा पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी युवा नेते चंद्रकांत देशमुख,चेअरमन नानासाहेब लिगडे, शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस विठ्ठलराव शिंदे ,पंचायत समिती सभापती राणीताई कोळवले,जि.प.समाजकल्याण सभापती धांडोरे, मारुती(आबा) बनकर,बाळासाहेब एरंडे, पी.डी जाधव,जि.प.सदस्य सचिन देशमुख,दादशेठ बाबर यांच्यासह,पंचायत समिती सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ,पत्रकार नविद पठाण उपस्थित होते.