दापोली 

मोडी लिपी शिकण्याची इच्छा असलेल्या दापोलीतील नागरीकांसाठी मोडीलिपी शिकण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मोडीलिपी अभ्यास वर्गाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

दापोली तालुक्यामध्ये तेजोनिध आरती या युवकाने मोडीलिपीचे संवर्धन आणि प्रसार हे जीवनाचे ध्येय स्विकारुन अनेक वर्ष मोडीलिपीच्या जाणकारांसोबत राहून त्या लिपीचा अभ्यास करुन त्यात नैपुण्य मिळविले आहे. महाराष्ट्राचा इतिहास समजून घेताना त्यातील बारकावे अभ्यासताना एकूणच इतिहासातील माहिती असलेल्या किंवा माहिती नसलेल्या घटनाक्रमांचे संदर्भ शोधताना मोडीभाषेतील दस्तऐवज महत्वपूर्ण ठरतात. महसूलातील नोंदी काही घराण्यांच्या वंशपरांपरा तसेच गुढ घटनांचे संदर्भ मोडीभाषेत दडलेले आहेत. दापोली तालुक्यातील विद्यार्थी, गृहिणी, निवृत्त तसेच अन्य इच्छुकांना मोडीभाषा शिकण्याची संधी तेजोनिध आरती, दाविक्षे प्रेस फाऊंडेशन आणि वराडकर बेलोसे महाविद्यालय दापोली यांनी उपलब्ध करुन दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्राचार्य डॉ.सुरेश निंबाळकर, आरती रहाटे, दाविक्षे प्रेस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सोनल तेंडूलकर, अ‍ॅड.नाना मोरे आणि पत्रकार शिवाजी गोरे यांच्या उपस्थितीत संचारबंदीचे नियम पाळून मोडीलिपी अभ्यासवर्गाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पुस्तिकेचे प्रकाशन जाहीर करताना डॉ.निंबाळकर यांनी वराडकर बेलोसे महाविद्यालयात सुरु होत असलेल्या मोडीलिपी प्रशिक्षण वर्गात बहुसंख्येने प्रवेश घेऊन ही भाषा शिकून घेण्याचे आवाहन केले आहे.