माणगाव 

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीद्वारा माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने विविध मागण्यांसंदर्भात दि. 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान लोणेरे विद्यापीठ येथे राज्यव्यापी लेखणी व अवजार बंदसह ठिय्या आंदोलन केले.

यावेळी लोणेरे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेधाला रामा शास्त्री यांना शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या वतीने दि. 30 रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष सुरेश लाड, उपाध्यक्ष प्रविण वारे, भानुदास बैरागी, सरचिटणीस विकास मगर, खजिनदार विनायक तवसाळकर, कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक प्रसाद पेंडसे, कर्मचारी अजय पालकर, महेश कोळी, प्रमिला पडवळ आदी उपस्थित होते.

लोणेरे विद्यापीठास सातवा वेतन आयोग लागू झाला असला तरी सेवांतर्गत आश्रवासित योजनेचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दि. 28 डिसेंबर 2010 व दि.15 फेब्रुवारी 2011 रोजी रद्द झालेले शासन निर्णय वित्त विभागाची कार्योत्तर मान्यता घेवून पुनर्जीवित करून ते पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे. दहा, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभाची  योजना महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनाही लागू करावी. अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर पदांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित  लागू करावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

दि. एक ऑक्टोबरपासून कर्मचारी विद्यापीठ व महाविद्यालयात काम बंद आंदोलन पुकारणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा यापुढेही सुरूच राहील, असा इशारा शासनाला  लोणेरे शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुरेश लाड व सहकारी सर्व कर्मचार्‍यांनी दिला आहे.

 

अवश्य वाचा