अलिबाग :

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊन असतानाही जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणार्‍या 79 हजार 582 चालकांच्या वाहनांवर कारवाई  करीत 22 मार्च ते 7 जुलै या दरम्यान एक कोटी 3 लाख 4 हजार रुपयांची दंडवसूली केल्याचा विक्रम रायगड पोलिसांनी केला आहे.

  सरकार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घरातच रहा सुरक्षित राह, असे वारंवार ओरडून सांगत आहेत. मात्र, काही उनाडटप्पू, बिनकामाचे नागरिक आजही आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन सर्रास बाहेर पडतात. अशा चालकांवर आणि वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत नियमांचा भंग करुन तसेच विना कागदपत्रं फिरणार्‍या वाहनचालकांना चांगलीच अद्दल रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेने घडवली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून म्हणजेच 22 मार्च पासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत 7 जुलै  या काळात नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केली असून सुमारे 2 कोटी 3 लाख 4 हजार 800 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. पोलीस वाहने जप्त करून दंडही घेत असल्याने विनाकारण कागदपत्रांशिवाय नियमभंग करणार्‍या वाहनचालकांवर चांगलीच जरब बसली असून रस्त्यावर फिरणार्‍या वाहनांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या काळात अपघातांची संख्या देखील कमी झालेली पहायला मिळत आहे.

जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी भागात ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार केली आहेत. नियमांचे पालन न करणार्‍या मुजोर वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कोरोना युद्धात नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून अनलॉक प्रक्रिया सुरु असली तरी अनावश्यक असल्यास घरात राहूनच या शत्रूला हरविण्यासाठी शासनाला मदत करणे गरजेचे आहे.

 

बॉक्स

दिनांक 22/03/2020 ते दिनांक 07/07/2020 पर्यंत केलेली एकूण कारवाई

 

दुचाकी वाहने

केसेस 61,540

दंड 1,60,44,100

 

तीनचाकी वाहने

केसेस 3328

दंड 7,69,100

 

चारचाकी वाहने

केसेस 14,714

दंड 34,91,600

 

एकूण केसेस 79,582

एकूण दंड 2,03,04,800