पेण :

रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेले पेण एसटी स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असुन राजकीय उदासीनता व शासकीय वेळकाढूपणा या दोन गोष्टींच्यामध्ये या स्थानकाचा विकास होत नसल्याने प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

लॉकडाउनच्या काळात राज्यातील एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. लॉकडाऊननंतर काही भागात एसटी सेवा सुरु करण्यात आली. परंतु पेणमधील एसटी स्थानकाची अवस्था ही बिकट झाली असून एसटी प्रशासनाचे या स्थानकाकडे साफ दुर्लक्ष झाले असुन यामध्ये अधिकारीवर्गाचा कानाडोळा होत असल्याचे निदर्शनास येते. तसेच कोणीही राजकीय मंडळी या स्थानकाच्या बाबतीत पुढाकार घेत नसल्याने प्रवाशाच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी प्रशासनाचे पेणकरांच्या बाबतीत मात्र स्वप्नवत ठरत आहे.  

गेल्या महिन्यात निसर्ग चक्रीवादळात एसटी कार्यालयाच्या बाजुला पडलेले झाड अजूनही उचलण्यात आले नसून यामुळे  पाणी साचुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांना जे थांबे दिले आहेत. त्या शेड कमकुवत झाल्या आहेत. यामुळे कधीही दुर्घटना होऊ शकते. स्थानकातील अनेक होर्डिंग तुटलेल्या अवस्थेत असून पावसामुळे व वार्‍यामुळे त्या कधीही कोसळू शकतात. अलिबागकडे ज्या गाड्या जातात त्या थांब्यात घाणीचे साम्राज्य असुन कोणीहि प्रवासी तेथे न थांबता एसटी कार्यालयाच्या बाजूला किंवा कर्जतकडे जाणार्‍या स्थानकाचा आसरा घेत असतात. लॉकडाऊन पूर्वी काही प्रमाणात एसटी स्थानकाला मुलामा देण्याचे तात्पुरत्या स्वरूपातील काम झाले होते. परंतु पावसाळ्यात या कामावर पाणी फिरले असून स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात छोटी छोटी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. परंतु प्रशासनाला या स्थानकाच्या दुरवस्थेकडे पाहण्यास वेळ नसुन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.