रोहा :

निसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिना होऊनही रायगड जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी अद्याप नुकसान भरपाईपासून वंचित असून शासकीय पातळीवर अजूनही कागदपत्रे तयार करणे, याद्या करणे हीच कामे सुरू असल्याचे चित्र कृषी विभागात फेरफटका मारला असता दिसून येत आहे.

कृषिमंत्र्यांसह राज्यातील विविध मंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते यांनी श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग या तालुक्यातील नारळ, सुपारी बागायतदारांना भरघोस मदतीचे आश्‍वासन दिले. हेक्टरी 50 हजार मदत जाहीर झाली. शासनाने जाहीर केलेली मदत स्थानिकांना न रुचल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टिका देखील झाली. मदतीचे शासकीय निकष व जिल्ह्यातील वास्तविक परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे स्पष्ट झाले. यावर तोडगा म्हणून किनारपट्टी भागातील बागायतदार शेतकर्‍यांसाठी प्रती झाड नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने पुन्हा पाहणी, पुन्हा शासनाला आकडेवारी सादर करणे ही कामेच अजून सुरू आहेत. नारळाच्या झाडाला प्रती झाड 200 तर सुपारीच्या झाडासारखी प्रती झाड 50 रुपये भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. अर्थातच किनारपट्टी भागातील नारळी पोफळीच्या बागेत असणार्‍या मसाल्याच्या झाडांना, आंब्याच्या, केळीच्या झाडांना वेगळी भरपाई मिळणार का याचा खुलासा होऊ शकलेला नाही. किनारपट्टी सोडून असणार्‍या अन्य भागात मात्र प्रती हेक्टरी 50 हजार या प्रमाणेच भरपाई मिळणार आहे. कोकणात सर्व घरांच्या परसदारी आंबा, फणस, चिकू, नारळ, सुपारी, केळी, जाम, पेरू, पपनस, चिंच यापैकी पाच दहा झाडे तरी असतात. या झाडांच्या उत्पनातून काही कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो. पण परसदारी असणार्‍या झाडांच्या नुकसानीबाबत अद्याप शासनाने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.

निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेल्या बागांची साफसफाई करणे हे बागायतदारांसमोर मोठे आव्हान आहे. या बागांची साफसफाई करण्यासाठी मनरेगामधून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु या बाबतचा शासननिर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. पडलेल्या झाडांच्या पाल्यापाचोळ्यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारी दुर्गंधी व चिखल, प्राण्यांची भिती यामुळे बागायतदार, शेतकरीवर्गाने आपले कुटुंबिय, आप्तेष्ट यांच्या सहकार्याने बागांची सफाई केली आहे. पुढील दोन महिने जोरदार पावसाचे असल्याने या बागांची साफसफाई करणे अधिकच अवघड होणार आहे. पण अद्याप साफसफाईबाबत शासननिर्णय झालेला नाही.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद