म्हसळा :

रायगड, रत्नागिरी जिल्ह्याना जोडणारा कमी अंतराच्या आंबेत येथील सावित्री नदीवरील पूल गेल्या काही वर्षांपासून अवजड वाहतुकीने कमकुवत झाला होता. अवजड वाहतुकीला कायमस्वरूपी मनाई घालण्यासाठी खबरदारीचा उपाययोजना म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे दोन्ही बाजुच्या प्रवेशद्वारांवर 3.5 मीटर उंचीचे लोखंडी बॅरिगेटची उभारणी करून कायम स्वरूपात रोख लावला आहे.

दक्ष नागरिक आणि प्रसार माध्यमाने सातत्याने पुलाच्या सुरक्षिततेकरिता सार्वजनिक बांधकाम प्रशासन आणि रायगड जिल्हा खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांचे निदर्शनात आणून देत पुलाच्या दुरुस्तीकरिता निधीची मागणी केली होती. खासदार व मंत्री महोदयांनी पुलाची प्रत्यक्ष पहाणी केली होती. लोकप्रतिनिधी आणि   शासनाने वेळीच दखल घेऊन पुलाचे बांधकाम दुरुस्ती करिता आवश्यक निधीची उपलब्धता केली आहे. नव्याने बांधकाम विभागा मार्फत पुलाची दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे असे असले तरी पुलावरील होणार्‍या अवजड वाहतुकीने पुलाच्या बांधकामास मोठा धोका होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावर होणार्‍या अवजड वाहतुकीला आळा बसविण्यात आला आहे. सां.बां.विभागानेे पुलावर स्वरुपी लोखंडी बॅरिगेट्स उभारले असल्याने या पुढे पुलावरील अवजड वाहतुकीला आळा बसणार आहे.