माणगाव 

   रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग चक्री वादळामुळे अनुदानित व विनाअनुदानित शाळा व कॉलेजचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळामुळे बहुतेक शाळांचे पत्रे उडून छप्पर नाहीसे झाले आहेत. त्यामुळे अनेक शाळांना अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या शाळांना मदतीचा हात म्हणून या दोनही जिल्ह्यातील शाळा व कॉलेज यांना  सुमारे 5,000 पत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे असे आमदार अनिकेत तटकरे यांनी माणगाव येथील अशोकदादा साबळे विद्यालयाला पत्रे भेट देताना सांगितले.

 दोन्ही जिल्ह्यातील लोकांच्या घरांच्या नुकसानीबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळांचे नुकसान झाले आहे. लोकांना तातडीने मदत तर मिळत आहे. त्याचबरोबरीने शाळांनाही शासनाकडून मदत मिळणार आहे. बहुतेक शाळांतील फर्निचर, संगणक कक्ष, वीज, कागदपत्रे, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वर्ग खोल्या आदी वस्तू यांचे वादळामुळे खूप नुकसान झाले आहे. हि नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रस्ताव देऊन शिफारस केली आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन या शाळांना नुकसान भरपाई मिळणार आहे अशी माहिती आ. अनिकेत तटकरे यांनी दिली.

 याचबरोबर अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे नुकसानग्रस्त शाळांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये मिळावेत यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी शिफारस करून मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी मान्य केली असून काही दिवसातच मंजूर होऊन सर्व शाळांना अर्थिक मदत मिळू शकणार आहे. वादळग्रस्तांना आणि नुकसान झालेल्या शाळांना जास्तीत जास्त तातडीने अर्थिक मदत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्‍वासन त्यांनी दिले.

 यावेळी आमदार अनिकेत तटकरे, माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजीव साबळे, माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुभाष केकाणे, उणेगाव सरपंच राजु शिर्के, सेक्रेटरी क्रुष्णाभाई गांधी, स्कूल कमिटी चेअरमन राजनभाई मेथा, संचालक, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.