पेण 

    पेण तालुक्यातील बळवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय डंगर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळवली ग्रामस्थांनी पेण येथे  इंग्रजी व मराठी माध्यमात शिकणार्या 35 विद्यार्थ्यांना आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत  दाखल केले आहे. त्यामुळे नेहमी पन्नासच्या आसपास असणारी शाळेची पटसंख्या थेट 90 पर्यंत पोहचली आहे.

    एकीकडे पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना बळवली गावातील ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून बळवलीचे सरपंच संजय डंगर ,शिक्षक वर्ग  तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सहा महीने अगोदर गावातील सर्व पालकांमध्ये जनजागृती केली.पालकांची सभा घेवून जिल्हा परिषद शाळेचे महत्व समजावून सांगितले.खाजगी शाळांवर होणारा खर्च निदर्शनास आणून दिला.गावातील शाळेमध्ये आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल का?अशी शंंका पालकांनी व्यक्त केली असता,संजय डंगर यांनी विद्यार्थ्यांना व शाळेला लागणार्या सर्व भौतीकसुविधा आपण पुरवणार असून मुलांच्या शैक्षणीक प्रगतीकडे आपले व्यक्तीशः लक्ष असणार आहे त्यामूळे आपण निश्‍चिंत रहा व आपल्या शिक्षकांना एकदा संधी देवू या असा विश्‍वास दिला त्यामूळे सर्व ग्रामस्थांनी होकार दिला.

     दरम्यान सर्व ग्रामस्थांनी मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून स्वेच्छेने दोन लाख रुपये तात्काळ शाळेसाठी दिले तसेच ग्रामपंचायतीने देखील एक लाख रुपये दिले,त्याचप्रमाणे गडब येथील जॉन्सन कंपनीने देखील सर्व  शाळेला टाईल्स दिली.

      शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी शैक्षणीक नुकसान होवू नये म्हणून स्वखर्चाने दोन खाजगी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णयही यावेळी शाळा व्यवस्थापन समितीने घेतला.यावेळी बळवली शाळा संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिटर ठरेल असा विश्‍वास सरपंच संजय डंगर यांनी व्यक्त केला.

     बळवली ग्रामस्थांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पेण पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अविनाश घरत म्हणाले कि, एकीकडे पटसंख्येअभावी शाळा बंद पडत असताना बळवली गावातील ग्रामस्थांनी जो विश्‍वास दाखवला त्याचे मी स्वागतच करतो.हा निर्णय यशस्वी होण्यासाठी प्रशासकिय पातळीवर सर्व ती मदत पुरवली जाईल.