Saturday, December 05, 2020 | 11:37 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

ही तर जबाबदारीच
रायगड
20-Oct-2020 11:27 PM

रायगड

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी भागाचा दौरा करुन सरकार तुमची काळजी घेईल अशा आश्‍वासनपूर्व भाषेत दिलासा दिला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते व महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करुन सरकारच्यावतीने शेतकर्‍यांना आश्‍वस्त केले आहे व सरकारनेही सध्याच्या काळात पैसे नसतील तर कर्ज काढावे लागले तरी चालेल परंतु शेतकर्‍यांना मदत ही दिलीच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र मदत करेलच परंतु राज्यानेही नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचलावीत, असे म्हटले आहे. राज्य सरकारने खरोखरीच या अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. खरे तर अशी मदत सरकार करते,हे काही उपकार नाहीत तर त्यांची ती जबाबदारीच आहे. परंतु सरकारने आता केवळ गप्पा न मारता तातडीने पंचनामे करुन मदत दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात पोहोचावी यादृष्टीने पावले उचलली पाहिजेत. तसे शक्य नसेल तर प्रत्येकाच्या नुकसानीचा हंगामी अंदाज घेऊन काही ठराविक रक्कम खात्यात तातडीने टाकणे आवश्यक ठरले आहे. केवळ मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोकणातीलही शेतकर्‍यांना ही मदत मिळणे गरजेचे आहे. कोकणातील शेतकर्‍यांना मदत देऊ असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहे. परंतु त्याची तातडीने कार्यवाही सुरु केली पाहिजे. सरकार केवळ आश्‍वासन देते असे चित्र आघाडी सरकारबाबत होत चालले आहे. कारण कोकणात चक्रीवादळ आले त्याच सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्याला बसला. मात्र सरकारने त्यासाठी केवळ 100 कोटी दिले. त्यानंतर केंद्राचे पथक फक्त येऊन गेले, त्यांनी अजून काही मदत केलेली नाही. राज्य सरकारकडे हेक्टरनिहाय नव्हे तर झाड निहाय मदतीची मागणी आमदार  जयंत पाटील यांनी सर्वप्रथम केली. सरकारने त्यांची ही मागणी मान्य केली असली तरीही झाडनिहाय मदत जाहीर करताना शेतकर्‍यांची थट्टाच केली. त्यामुळे कोकणातील शेतकरी नाराज झाला आहे. मात्र आता तरी सरकारने अतिवृष्टीची मदत जाहीर करताना हात आखडता घेऊ नये अशी इच्छा आहे. कोकणाचे कंबरडे पार मोडूनच गेले आहे. सुरुवातीला चक्रीवादळ, त्यानंतर कोरोना व आता हाताशी आलेले पीक गेले. त्यातच पर्यटन सहा महिने पूर्णपणे थंडावल्याने अनेक शेतकरी, बागायतदारांचे फारच हाल झाले आहेत. त्यामुळे आता सरकारने उदारहस्ते कोकणातील शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला पाहिजे. तरच हे सरकार काही वेगळे करुन दाखवते हो पटेल. अन्यथा यापूर्वीचे भाजपाचे सरकार व आताचे सरकार यात काही फरक राहाणार नाही. सध्या सरकारची आर्थिक स्थिती कोरोनामुळे नाजूक झालेली आहे याची सर्वांना कल्पना आहे. त्यातच केंद्र सरकारने त्यांचा हक्काचा येणारा कराचा परतावा 22 हजार कोटी रुपयांचा दिलेला नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तरी राज्य सरकारला आपल्या जबाबदार्‍या पार पाडाव्याच लागणार आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करणे ही त्यांची महत्वाची जबाबदारीच आहे असे समजून मदत केली पाहिजे. शरद पवार यांनी गरज भासल्यास कर्ज काढण्याचा सल्ला दिला आहे तो योग्यच आहे. त्यासाठी केंद्र सरकारनेही मदत केली पाहिजे. पंतप्रधानांच्या खास विमानासाठी केंद्र सरकार कोरोनासारख्या संकट काळातही आठ हजार कोटी रुपये खर्च करते तर त्यांना शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पैसे नाहीत असे म्हणणे काही पटत नाही. किंवा त्यांची शेतकर्‍यांना भरपाई देण्याची मानसिकता नाही असेच वाटते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांची खोटे बोलून सरकार चालविण्याची मानसिकता नाही. जे काही आहे ते खरे सांगतात व केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ते घोषणा करीत नाही. त्यांची ही प्रतिमा कायम रहावी असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी शेतकर्‍यांना नुकसानभरपाईचे दिलेले आश्‍वासन पाळले पाहिजे. विरोधी पक्षनेते फडणवीस हे देखील शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आले. त्यांनी देखील राज्य सरकारला पंचनाम्यात वेळ काढू नका,असा सल्ला दिला आहे. त्यांचा सल्ला चांगलाच आहे. परंतु त्यांनी कोल्हापूर, सांगली येथे ते मुख्यमंत्री असताना ज्या पूरग्रस्ताना आश्‍वासने दिली होती ती पूर्ण केली का ते अगोदर तपासावे व त्यानंतरच त्यांना विद्यमान सरकारला सल्ला देण्याचा अधिकार राहिल. पंतप्रधान मोदी सध्या बाहेर पडत नाहीत हे वास्तव जसे आहे तसेच ठाकरे देखील कार्यालयात बसूनच काम कीरत आहेत. पण त्याबाबत टीका मात्र  ठाकरेंवर व मोदींवर काही बोलायचे नाही हे फडणवीसांचे धोरण काही जनतेला समजत नाही असे त्यांना वाटत असेल तर त्यांची ती गैरसमजूत आहे. फडणवीसांचे सोडून द्या,  ते  फक्त घोषणा करायचे व त्याची जाहिरातबाजी करायचे. आता ठाकरे सरकारने असे करता कामा नये. ठाकरे सरकारने आता शेतकर्‍यांना संकटाच्या काळात मदत करण्याची नितांत आवश्यकता आहे. अशाच वेळी त्यांची कसोटी लागणार आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top