Monday, January 25, 2021 | 03:34 PM

संपादकीय

नव्या वर्षातली गुंतवणूकवाट

नवं वर्ष सुरू होत असताना बरेचजण काही ना काही संकल्प करतात

संरक्षणाची मोहोर
रायगड
08-Sep-2020 07:35 PM

रायगड

सध्या देशात सुशांतसिंग, रिया चक्रवर्ती आणि कंगना रणावत यांच्याभोवती राजकारण व बातम्या केंद्रित झाल्याने देशाला संरक्षणात स्वयंपूर्णतेकडे नेणार्‍या एका महत्त्वाच्या बातमीकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले. ही बातमी म्हणजे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी.आर.डी.ओ.) ने ध्वनीपेक्षा सहा पट वेगाने जाणार्‍या स्वदेशी बनावटीच्या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वीरित्या केली. आपल्याकडे नेहमी सीमेवर हल्ला झाली, की संरक्षणाची आठवण होते. परंतु, संरक्षण ही निरंतर बाब आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. संरक्षणासाठी केवळ विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहून चालणार नाही, तर आपल्याला देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे, ही पंडित नेहरुंची असेली दृष्टी आज आपल्या कामी येत आहे. आपल्याकडील मीडियाने कंगना व सुशांतसिंगला जेवढे महत्त्व दिले आहे, त्याच्या एक टक्केही महत्त्व या घटनेला दिले नाही, ही आपल्याकडील शोकांतिकाच म्हटली पाहिजे. सोमवारी ओडिशातील व्हीलर बेटावर असणार्‍या अब्दुल कलाम प्रक्षेपण स्थळावरुन हे प्रक्षेपण करण्यात आले आणि कोरोनाने सर्वत्र निराशाजनक वातावरण असताना, देशाला अभिमान वाटावा अशी एक सुखद बातमी मिळाली. अमेरिका, रशिया व चीन याच देशांकडे हे प्रगत तंत्रज्ञान आहे. आता त्या तीन देशांच्या पंक्तीत भारतही जाऊन बसला आहे. या प्रक्षेपणामुळे भविष्यात कमी खर्चात हलके उपग्रह अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी मोठा उपयोग होईल. तसेच ध्वनीच्या सहा पट वेगाने जाणार्‍या या तंत्रज्ञानाचा दीर्घ पल्ल्याच्या क्रुझ मिसाईलमध्ये याचा वापर करता येईल. यातूनच देशात अत्याधुनिक हायपरसॉनिक यान तयार करण्याचा पाया रचला गेला आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्य शोभावे असेच हे प्रक्षेपण होते. शास्त्रज्ञांनी हे प्रक्षेपण शंभर टक्के यशस्वी झाल्याचे सांगितल्यावर अनेकांचा जीव भांड्यात पडला. यात स्वदेशी स्क्रॅमजेट इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. या इंजिनाने आपल्या प्रवासात वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेऊन त्या ऑक्सिजनचा इंजिनात ऑक्सिडायझर म्हणून वापर केला. ऑक्सिडायझर जमिनीवरुन न नेल्याने यान अतिशय हलके झाले व त्याच्या खर्चातही कपात झाली. त्यामुळे यात जास्त प्रमाणात स्फोटके पाठविता येतील. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठी याने बनवून त्यांच्या सहाय्याने कमी वजनाचे हलके उपग्रह पृथ्वीपासून नजीकच्या वातावरणात सोडता येतील. आता एकदा हे प्रक्षेपण यशस्वी झाल्यावर नजीकच्या काळात त्याचा वेग अजूनही वाढविण्यासाठी देशी तंत्रज्ञान विकसित केले जाऊ शकते. अन्य साध्या प्रकारची क्षेपणास्त्रे डागताना शत्रूला त्याच्या मार्गावर लक्ष ठेवता येते. मात्र, हायपरसॉनिक शस्त्राचा कुठलाच मार्ग निश्‍चित नसल्याने शत्रूला त्याच्या मार्गाचा अंदाज घेता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे, त्याचा वेग एवढा जास्त असतो, की त्याचा वेध शत्रूकडून घेण्याच्या अगोदरच प्रहार झालेला असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे शत्रू पक्षाचे संरक्षण कवच भेदता येऊ शकते. यापूर्वी केलेल्या अशाच प्रकारच्या चाचणीत शंभर टक्के यश मिळाले नव्हते. आता मात्र शंभर टक्के यश मिळाले आहे. त्यामुळे भारताने आता स्वदेशी संरक्षणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अर्थात, या यशाचे संपूर्ण दान देशातील शास्त्रज्ञांच्या पदरात घालावयास हवे. तसेच जी.आर.डी.ओ. या 1958 साली स्थापन झालेल्या संरक्षणविषयक संशोधन संस्थेला श्रेय दिले गेले पाहिजे. डी.आर.डी.ओ. ही संस्था त्याकाळी संरक्षणातील संशोधनाची गरज लक्षात घेऊन स्थापन करण्यात आली होती. आज मागे वळून पाहता, गेल्या 62 वर्षांत डी.आर.डी.ओ.ने संशोधनाचे अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. त्यामुळे ही संस्था त्याकाळी स्थापन करणार्‍या त्यावेळच्या काँग्रेस सरकारला व तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे ही संस्था स्थापन करण्यात आली व त्यातून अनेक देशांच्या हितासाठी संशोधन झाले. गेल्या 70 वर्षांत काँग्रेस सरकारने काय केले, असा सवाल विचारणार्‍या सत्ताधार्‍यांना दिलेले हे एक सणसणीत उत्तर आहे. संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असलेली ही संस्था म्हणजे देशाला संरक्षणात स्वयंपूर्णतेकडे नेणारा एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे. अग्नी, पृथ्वी या प्रक्षेपण क्षेपणास्त्रांची मालिका, देशी बनावटीचे एअरक्राफ्ट तेजस, बहुउद्देशीय रॉकेट लॉँचर पिनाका, हवाई संरक्षण पद्धती आकाश, विविध प्रकारचे रडार व इलेक्ट्रिक्स संशोधन उपकरणे, ही या संस्थेमार्फत गेल्या काही वर्षांत विकसित केली आहेत. डी.आर.डी.ओ.ने 62 वर्षांपूर्वी सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या देशभरात दहा प्रयोगशाळा होत्या. आता ती संख्या 50 वर पोहोचली आहे. त्यामुळे डी.आर.डी.ओ.चा कारभार किती झपाट्याने वाढला हे दिसते. तसेच त्याची असलेली आवश्यकता आपल्याला समजते. देशातील संरक्षण संशोधनासाठी ही खास संस्था स्थापन करणार्‍या पंडित नेहरुंचा यात काडीचाही वाटा नाही असे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. त्यांच्याच दूरदृष्टीतून ही संस्था जन्माला आली व त्याची फळे गेल्या काही वर्षात आपल्याला मिळत आहेत. त्यावेळी जर ही संस्था स्थापन झाली नसती, तर आत्ताच्या मोदी सरकारला स्थापन करावी लागली असती व त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागली असती. त्यामुळे अशा संस्थांच्या स्थापनेमागची असलेली पंडित नेहरुंची दूरदृष्टी आपल्याला विसरुन चालणार नाही. या देदीप्यमान यशाबद्दल शास्त्रज्ञ व डी.आर.डी.ओ.चे अभिनंदन.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top