Monday, March 08, 2021 | 09:23 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

नव्या वर्षातली गुंतवणूकवाट
रायगड
24-Jan-2021 07:43 PM

रायगड

नवं वर्ष सुरू होत असताना बरेचजण काही ना काही संकल्प करतात. या संकल्पांमध्ये आर्थिक नियोजनाला अग्रस्थान असतं. नव्या वर्षात आर्थिक गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. आपत्कालीन परिस्थितीत किंवा कठीण काळात पैसाच आपल्याला तारत असतो. 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे अर्थ नियोजनाचं, आपत्कालीन निधी संचयाचं महत्त्व अनेकांच्या लक्षात आलं. सरत्या वर्षातल्या ङ्गन भूतो न भविष्यतीफ अशा कोरोना संकटकाळातही गुंतवणूकदारांनी भरपूर नफा कमावला. सोन्याने गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा मिळवून दिला तर शेअर बाजारानेही जवळपास 15 टक्के लाभ दिला. गेल्या वर्षी मार्चनंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांना दुप्पट लाभ मिळाला. म्युच्युअल फंडांमधूनही लोकांनी बराच नफा कमावला. म्युच्युअल फंडातल्या काही इक्विटी योजनांनी मार्चनंतर 80 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला.  त्यामुळे नव्या वर्षातही गुंतवणुकीच्या पारंपरिक आणि सुरक्षित पर्यायांसह शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला हरकत नाही. अत्यंत वाईट काळ अनुभवल्यानंतरही जगभरातले शेअर बाजार उसळी घेऊ लागले आहेत. कोरोना लसीची उपलब्धता, ही लस लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरू असणारे प्रयत्न, अर्थव्यवस्थेची रूळावर येणारी गाडी, सकारात्मक आर्थिक धोरणं अशा अनेक कारणांमुळे आर्थिक क्षेत्रात सध्या आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. गुंतवणूकदारांनी या सगळ्या सकारात्मक  परिस्थितीचा लाभ उठवणं आवश्यक आहे.

शेअर बाजाराचा आढावा घ्यायचा झाला तर सरत्या वर्षात इक्विटीची कामगिरी सर्वात चांगली राहिली. याच कारणामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीतला मोठा हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवायला हरकत नाही. गुंतवणूकदार थेट इक्विटीमध्ये पैसे गुंतवू शकतात किंवा अन्य मार्गांनी इक्विटीचा पर्याय निवडू शकतात. आर्थिक मंदीतून अर्थव्यवस्था सावरत असताना गुंतवणूकदारांनी बँकिंग, ऊर्जा, व्यावसायिक उत्पादनं आदी क्षेत्रांकडे लक्ष केंद्रित करायला हरकत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2021 मध्ये या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणार्‍या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. जागतिक अर्थव्यवस्था सावरत असताना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची वाढ वेगाने होणं अपेक्षित आहे. कोविड-19 चा जोर ओसरल्यानंतर तसंच लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर ग्राहकोपयोगी तसंच अन्य उंची वस्तूंच्या मागणीत वाढ होणार, यात काही शंका नाही. गुंतवणूकदार, सिमेंट, बांधकाम साहित्याची निर्मिती करणार्‍या कंपन्या, इंडस्ट्रिअल आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रांचा विचार करू शकतात. मोठ्या प्रमाणावर औषधांची निर्यात करणार्‍या औषधनिर्मिती कंपन्याही चांगली कामगिरी करू शकतात. 

नव्या वर्षात इक्विटीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असली तरी गुंतवणूकदारांना यातल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणूनच त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये कमी जोखमीच्या शेअर्सचाही समावेश करायला हवा.  अन्न आणि पेयं, औषधनिर्मिती, सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तूंची निर्मिती करणार्‍या कंपन्यांचे शेअर्स तुलनने कमी जोखमीचे असतात. इक्विटी आणि कमी जोखमीच्या शेअर्सचं संतुलन साधून गुंतवणूकदार चांगला परतावा मिळवू शकतात. यासोबतच लघु आणि मध्यम उद्योगांकडूनही यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यंदा बँकिंग आणि टेलिकॉम या दोन क्षेत्रांकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. बँकांव्यतिरिक्त अन्य वित्तपुरवठादार कंपन्याही चांगला परतावा देऊ शकतील. अभियांत्रिकी कंपन्यांकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणूनच गुंतवणूकदार यंदा शेअर बाजाराचा पर्याय निवडून उत्तम नफा कमवू शकतात. 

गेल्या वर्षी 23 मार्चला गाठलेल्या नीचांकी पातळीनंतर शेअर बाजार 77 टक्क्यांनी वधारला. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडातल्या मिड कॅप योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतल्यास या योजनांनी जवळपास 84 टक्क्यांपर्यंत परतावा दिल्याचं आपल्या लक्षात येईल. 23 मार्च 2020 ते 14 डिसेंबर 2020 दरम्यान आयसीआयसीआय प्रूडेन्शियल मिड कॅपने 83.98 टक्के लाभ दिला असून यूटीआय मिड कॅपने याच काळात 82.96 टक्के लाभ मिळवून दिला. देशातल्या सर्वात मोठ्या फंड हाऊसने म्हणजेच एसबीआय मॅग्नम मिड कॅपने याच अवधीत गुंतवणूकदारांना 81 टक्के परतावा दिला आहे. दरम्यानच्या काळात मिड कॅप आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांनी चांगली कामगिरी केली होती. भविष्यात मिड कॅपसह स्मॉल कॅपमध्ये तेजी येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. त्यामुळे येत्या काळात गुंतवणूकदारांनी स्मॉल आणि मिड कॅप फंड योजनांवर लक्ष केंद्रित करायला हवं. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर तसंच लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर मिड आणि स्मॉल कॅप अधिक चांगली कामगिरी करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांच्या आर्थिक उद्दिष्टांच्या अनुषंगाने गुंतवणूक करणार्‍यांनी मिड तसंच स्मॉल कॅप योजनांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे सिपच्या माध्यमातून गुंतवणूक करायला हवी. 

शेअर बाजार, म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीच्या दृष्टीने जोखमीचे पर्याय मानले जातात. सर्वसामान्य गुंतवणूकदार अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला सहज धजावत नाहीत. शेअर्समधली गुंतवणूक म्हटली की मनात शंकेची पाल चुकचुकते. अशा वेळी बँकेतल्या मुदत ठेवींचा पर्याय निवडला जातो. या मुदत ठेवींच्या व्याजदरांवर नजर टाकली तर या व्याजदरांनी नीचांकी पातळी गाठल्याचं आपल्या लक्षात येईल. सध्या बँकांच्या मुदत ठेवींवर पाच ते सात टक्के दराने व्याज मिळतं. मोठ्या बँकांमधल्या मुदत ठेवींचे व्याजदर सहा टक्क्यांहूनही कमी आहेत. त्यामुळे सध्या तरी या मुदत ठेवींमधून फार परताव्याची अपेक्षा करता येणार नाही. मुदत ठेवींमध्ये तुमचा पैसा सुरक्षित राहील. मात्र त्यात अपेक्षित वाढ होणार नाही. मुदत ठेवींव्यतिरिक्त आणखी एक सुरक्षित पर्याय म्हणजे लघु बचत योजना अर्थात स्मॉल सेव्हिंग स्कीम्स. या योजनांवर सध्या चार ते 7.4 टक्के दराने व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांचे दर निश्‍चित असून त्यावर 7.4 टक्के दराने व्याज मिळतं. भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)मधल्या गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने तर किसान विकासपत्रातल्या गुंतवणुकीवर 6.9 टक्के दराने व्याज मिळेल.  सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या कोणत्या सुरक्षित पर्यायाची निवड करायची हे गुंतवणूकदारांनीच ठरवायला हवं. 

गुंतवणूकदारांकडे सोन्या-चांदीतल्या गुंतवणुकीचाही पर्याय आहे. भविष्यात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी 65 हजार रुपयांवर जाऊ शकतो, असं आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजेच आज सोन्यात गुंतवणूक केल्यास येत्या काळात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत लाभ मिळू शकतो. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेेंबरदरम्यान सोन्याच्या किंमती ऐतिहासिक स्तरावर जाऊन पोहोचल्या होत्या. सोन्याला प्रति दहा ग्रॅम 56 हजार रुपये इतका दर मिळाला होता. या काळात सोन्यातल्या गुंतवणुकीने 28 टक्के परतावा दिला. ही सोन्यातल्या गुंतवणुकीची गेल्या दहा वर्षातली  सर्वोत्तम कामगिरी ठरली. तिकडे चांदीचा दरही प्र्रतिकिलो 90 हजार रुपयांवर जाऊ शकतो. गेल्या वर्षी चांदीतल्या गुंतवणुकीने जवळपास 48 टक्के लाभ मिळवून दिला. गेल्या वर्षी चांदीचे दर प्रति किलो 77,949 एवढ्या विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचले. कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. त्यातच कोरोना विषाणूचा नवा प्रकार ब्रिटनसह इतर काही देशांमध्ये पसरल्यामुळे अनिश्‍चितता कायम असल्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये वाढ अपेक्षित आहे. सोनं आणि चांदी हे गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय मानले जात असल्यामुळे मुदत ठेवी किंवा अन्य पर्यायांऐवजी या धातूंमध्ये पैसे गुंतवता येतील. मालमत्ता क्षेत्रालाही गेल्या वर्षी चढ-उतारांना सामोरं जावं लागलं. त्यातच कोरोना विषाणूने बरंच काही बदललं. नव्या वर्षात मालमत्ता क्षेत्रातही हे बदल पहायला मिळणार आहेत. गेल्या वर्षातली मरगळ झटकून मालमत्ता क्षेत्रही उभारी घेण्यासाठी सज्ज झालं आहे. अर्थव्यवस्थेच्या सर्वांगिण विकासात मालमत्ता क्षेत्राचाही महत्त्वाचा वाटा असेल. त्यामुळे या वर्षात स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न साकार करता येईल. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top