Monday, January 25, 2021 | 03:48 PM

संपादकीय

नव्या वर्षातली गुंतवणूकवाट

नवं वर्ष सुरू होत असताना बरेचजण काही ना काही संकल्प करतात

सर्वत्र रिलायन्सच
रायगड
03-Sep-2020 05:56 PM

रायगड

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स उद्योगसमूहाने बिग बझार हा रिटेल उद्योगसमूहातील नामवंत ब्रँड असलेला फ्युचर समूह सुमारे 25 हजार कोटी रुपयांना ताब्यात घेतला आहे. किशोर बियाणी यांच्या मालकीचा हा समूह म्हणजे देशातील रिटेल उद्योगातील पितामह म्हणून ओळखला जातो. देशात सर्वात प्रथम संघटित क्षेत्रातील रिटेल उद्योगाची मुहूर्तमेढ याच बियाणी यांनी रचली आणि सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी देशातील ही रिटेलची बाजारपेठ विकसित केली. त्यामुळेच बियाणींना रिटेलचा बादशहा म्हणून उद्योगजगत ओळखते. आज देशातील एकूण रिटेल उद्योगाची बाजारपेठ ही 850 अब्ज डॉलर्सची आहे. तर, त्यातील 85 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ ही संघटित म्हणून ओळखली जाते. म्हणजे, देशातील मोठ्या रिटेल कंपन्यांचा त्यावर ताबा आहे. सध्या त्यातील रिलायन्स ही सर्वात मोठी कंपनी असून, तिची वार्षिक उलाढाल ही सुमारे एक लाख 65 हजार कोटी रुपये इतकी आहे. तर, फ्युचर उद्योगसमूहाची उलाढाल ही सुमारे 40 हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे रिटेल क्षेत्रातील ही कंपनी ताब्यात घेतल्याने रिलायन्स रिटेलची वार्षिक उलाढाल दोन लाख कोटी रुपयांवर जाईल. त्यांच्याखालोखाल या उद्योगात टाटा व बिर्ला समूहाच्या कंपन्या आहेत. परंतु, रिलायन्सने आता या उद्योगावर आपली आघाडीची मोहोर उमटविली आहे, हे मात्र नक्की. सध्या रिलायन्स रिटेलची देशभरात मोठ्या व मध्यम शहरात एकूण मिळून एक हजारच्यावर स्टोअर्स आहेत. तर, बिग बझारचे 295 स्टोअर्स, इझी डेचे 800 स्टोअर्स व 2017 साली ताब्यात घेतलेल्या हायपर सिटीचे 20 स्टोअर्स जे सध्या फ्युचर समूहाच्या ताब्यात आहेत, ते आता रिलायन्स रिटेलच्या ताब्यात आले आहेत. सध्या रिलायन्सची 621 फ्रेश सुपर मार्केट, 670 फॅशन स्टोअर्स व 50 कॅश अँड कॅरी स्टोअर्स आहेत. आता रिलायन्सची रिटेल उद्योगातील ताकद जबरदस्त वाढणार आहे. त्याखालोखाल डिमार्ट ही सुपरमार्केटची चेन आहे. त्याखालोखाल मोर ही बिर्ला समूहाची सुपर मार्केटची साखळी आहे. त्यानंतर टाटा समूहाची सुपर मार्केट्स आहेत. किशोर बियाणी यांच्या फ्युचर समूहाची आर्थिक स्थिती उत्तम होती. परंतु, कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले. एक तर, त्यांच्यावर सुमारे 13 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्या कर्जाची परतफेड करणे फ्युचर समूहास सध्याच्या परिस्थितीत कठीण जाऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी शेवटी आपली स्पर्धक कंपनी असलेल्या रिलायन्सला हा समूह विकण्याचे ठरविले. गेले दोन महिने त्यासंबंधी उभयतांच्या वाटाघाटी सुरु असल्याच्या अफवा होत्या. परंतु, याची शनिवारी रिलायन्सकडून घोषणा करण्यात आली. फ्युचर उद्योगसमूहाचे संस्थापक किशोर बियाणी हे रिटेलमधील बादशहा म्हणून ओळखले जातात. कारण, त्यांनी शून्यातून त्यांचे हे विश्‍व उभे केले होते. 2012 साली त्यांनी उभारलेली पॅन्टलून्स ही फॅशन डिझाइन्सची चेन आदित्य बिर्लांना 1600 कोटी रुपयांना विकली त्यावेळी अनेकांना आश्‍चर्य वाटले होते. आतादेखील त्यांनी रिलायन्सशी केलेला हा सौदा बाजारासाठी अनपेक्षित असाच होता. त्यांच्यासाठी कंपनीवर वाढत चाललेला कर्जाचा बोजा ही सर्वात मोठी चिंता होती. त्यातून त्यांनी बाहेर पडण्यासाठी हा निर्णय घेतला. रिलायन्ससाठी हा सौदा फायदेशीरच ठरणार आहे. कारण, त्यांना रिटेल उद्योगात आपले स्थान यातून बळकट करता येणार आहे. त्याचबरोबर फ्युचर रिटेल लि. या शेअर बाजारात नोंदणीकृत असल्याने रिलायन्सला भविष्यात रिटेल विभाग वेगळा काढून त्यांची नोंदणी करण्याचा जो विचार होता, ती प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. अशा प्रकारे रिलायन्सने आपले देशातील अस्तित्व आता आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यंदा रिलायन्स ही शून्य कर्ज असलेली कंपनी झाली आहे. रिलायन्सच्या एकूण उलाढालीत पेट्रोकेमिकल्स विभागाचा वाटा आता कमी असला तरी पेट्रोल-डिझेल व पेट्रोलियम पदार्थांच्या बाजारपेठेत त्यांनी आपले स्थान बळकट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम ही गडगंज नफा देणारी कंपनी बहुधा रिलायन्सच ताब्यात घेईल, अशी चिन्हे दिसत आहेत. रिलायन्स जिओ ही दूरसंचार क्षेत्रातील त्यांची कंपनी ही देशातील प्रथम क्रमांकाचे ग्राहक असलेली कंपनी ठरली आहे. येत्या काळात याच उद्योगातील भारत संचार व महानगर टेलिफोन या दोन्ही सरकारी कंपन्या बहुधा सरकार रिलायन्सच्याच दावणीला बांधेल, अशी चिन्हे दिसत आहेत. तसे झाल्यास रिलायन्सचे टेलिकॉम उद्योगावर निर्विवाद वर्चस्व स्थापन होईल. त्याचबरोबर त्यांच्या जिओ प्लॅटफॉर्मवर फेसबुकपासून अनेक नामवंत कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. जिओ प्लॅटफॉर्म हा भविष्यात लोकांच्या घरोघरी पोहोचणार असून, त्यातून करमणूक उद्योगात मोठी क्रांती केली जाणार आहे. त्यामुळे टेलिकॉमच्या जोडीने करमणूक क्षेत्र हे रिलायन्सला भविष्यात व्यवसायवृद्धीसाठी खुणावत आहे. त्याचबरोबर त्यांनी रिटेल उद्योगात आघाडीचे स्थान निर्माण केले होतेच. आता फ्युचर समूहाला आपल्या खिशात घालून रिटेलमधील आपले स्थान बळकट केले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या रिटेल स्टोअर्सचा विस्तार करताना लहान किराणा दुकानदारांना आपल्यासोबत घेऊन जाण्याची योजना आखली आहे. त्यामुळे देशातील किराणा माल विक्रेत्यांमध्ये एक मोठा क्रांतिकारी बदल होऊ घातला आहे. अर्थात, ही त्यांची योजना कितपत यशस्वी होते, ते आत्ताच सांगता येणार नाही. एकूणच पाहता, देशात सर्वत्र रिलायन्सच असे चित्र असेल.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top