Monday, January 25, 2021 | 03:42 PM

संपादकीय

नव्या वर्षातली गुंतवणूकवाट

नवं वर्ष सुरू होत असताना बरेचजण काही ना काही संकल्प करतात

शेतकरी कामगार चळवळीतील खंबीर नेतृत्व -दत्ता पाटील
रायगड
27-Aug-2020 10:40 AM

रायगड

शेतकरी कामगार पक्ष चळवळ आणि दत्ता पाटील हे समिकरण 1957 सालापासून 1972 ते 1977 चा कालखंड वगळता सलग 27 वर्षे अलिबाग मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार नव्हे, तर शेतकरी, कष्टकरी मजुरांचा लोकनेता म्हणून अ‍ॅड.दत्ता पाटील यांनी महाराष्ट्राची विधानसभा शेतकरी मजुरांच्या न्यायहक्कांसाठी आपल्या करारी बाण्याने दुमदुमत ठेवली. शेकापक्षाला जनमानसात खरी ओळख अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्यामुळे लाभली. हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. कारण शेतकरी कामगार पक्ष हा डाव्या विचारसरणीचा मानणारा म्हणजेच मार्क्स, लेनीन यांच्या कम्युनिस्ट विचारांचा पुरस्कर्ता होता.

 

 

परंतु 1957 च्या कालखंडाचा अभ्यास केला असता ग्रामीण भागांतील खेडोपाड्यात राहणार्‍या शेतकरी, कष्टकरी, भूमीहीन, मजूर जनतेला शेकापच्या कम्युनिस्ट विचारधारेशी सोयरसुतक नव्हतं. त्यांना एकच विचारधारा पटत होती. दत्ता पाटील आणि खटारा...!

क्रांतीसुर्य नारायण नागू पाटील यांनी उभ्या केलेल्या शेतकरी चळवळीचा दत्ता पाटील आणि त्यांचे बंधु प्रभाकर पाटील यांच्या जीवनावर चांगलाच प्रभाव पडला होता. प्रभाकर यांनी रायगड जिल्हा परिषद आणि अलिबाग पंचायत समितीवर खटार्‍याच्या माध्यमातून  शेकापचं वर्चस्व कायमच अबाधित ठेवलं.

स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देशात राजकीयदृष्ट्या सर्वच क्षेत्रात बलाढ्य असणार्‍या काँग्रेस पक्षाला विधानसभांच्या निवडणुकांमध्ये अलिबागच्या मतदारसंघात सपशेल हार पत्करावी लागत होती. कारण, आजच्या घडीला जे सर्वच पक्षांमध्ये नेते आहेत, ते निवडणुका तोंडावर आल्यावर मतदारांचे दरवाजे ठोठावत, तसे दत्ता पाटील यांना प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी ज्या प्रकारची मदत करता येईल, त्याप्रमाणे ते मदत करीत असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. ज्यांच्या नशिबामध्ये मरेपर्यंत कष्ट करूनच पोट भरणं होतं, तसेच आयुष्यात ज्यांनी कधीच शाळेच तोंड सुद्धा पाहिल नाही, अशा कष्टकर्‍यांना पोरांनाही तलाठी, तहसिलदार, कलेक्टर, शिक्षण, डॉक्टर, वकिल, इंजिनिअर होता येते, हे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशी फाजिल स्वप्न न दाखवता. दादांनी ती स्वप्न प्रत्यक्षात साकार करुन दाखविली. विद्यमान फुले, शाहू, आंबेडकरी चळवळींचा वारसा सांगणार्‍या कोणाही नेत्यास दत्ता पाटील यांच्यासारखे काम करता आले नाही.

विधिमंडळात प्रत्येक आमदाराला 10 मिनिटे बोलण्याची संधी असते. त्यावेळीदत्ता पाटील यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात चालू असणार्‍या भ्रष्टाचार्‍यावर अत्यंत अभ्यासूपणे ताशेरे ओढले आणि विरोधकांन बरोबरच सरकारचे लक्ष वेधून घेतले आणि इथूनच दत्ता पाटील यांच्या आक्रमक नेतृत्वाला महाराष्ट्र विधानसभेत मान मिळू लागला. आणि विरोधी पक्ष नेता म्हणून असतानाही दत्ता पाटील यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना विधानसभेत वेळोवेळी धारेवर धरून स्वतःची कामे मार्गी लावत होते.

1976 च्या आणिबाणीनंतर ज्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यामध्ये दत्ता पाटील यांच्या विरोधात काँग्रेसला वाटत होते की, दत्ता पाटील हे आगरी असल्यामुळेच त्यांना मते मिळतात. म्हणून काँग्रेसने आगरी जातीच्या मधु पाटील नावाच्या प्राध्यापकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, परंतु दत्ता पाटीलांसमोर त्यांना सपशेल हार पत्करावी लागली. याचाच अर्थ दादांना केवळ आगरी समाजच मतदार नव्हता, तर ते सर्व समाजाचे लोकनेते होते.

नारायण नागू पाटील आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेती कसणार्‍या कुळांसाठी शेतकरी-सावकार संघर्षातून निर्णय केलेल्या ‘कुळकायद्या’ची संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी यासाठी  दादांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शेती कसणार्‍या बेदखल कुळांना जमिनीचे मालकी हक्क मिळावे यासाठी कलेक्टर, तहसिलदारांच्या विरोधात शेतकर्‍यांना एकत्र करून आंदोलने केली. जशी वाघाला स्वतःची वाघ जात सिद्ध करण्याची गरज नसते, तो कोणत्याही जंगलात गेला तरी तो वाघच असतो. तशीच दादांनी सुद्धा शेतकर्‍यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा नेता, अशी स्वतःची ओळख संपूर्ण देशासमोर ठेवली.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कान्होजी आंग्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दादांनी गुरू मानले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘मुक्ती कोन पथे?’ या पुस्तकांने दादांच्या जीवनावर चांगली छाप पडली होती.

फुले जन्मशताब्दी काळात ‘सोबत’ नावाच्या साप्ताहिकांमध्ये बाळ गांगल नावाच्या भटवादी लेखकांने महात्मा फुलेंच्या विरोधात ‘हा कसला महात्मा, ही तर फुले नावाची दुर्गंधी’ असा लेख लिहिला. त्या विरोधात दादांनी नागपुरची विधानसभा हादरून सोडली. आणि बाळ गांगलला भर विधानसभेत सपशेल नाक घासायला लावले. तसे न केल्यास जेलची हवा खायला लावण्याची वेळ दादांनी आणली. महात्मा फुल्यांची, या शेतकरी गुरूंची आठवण विसरलेल्या ओबीसी नेत्यांना दादांचे हे वैचारिक मोठेपण येणार्‍या काळात योग्य मार्गदर्शन दाखविल, यात शंका नाही.

रेवदंडा साळाव येथील मे. वेलस्पन नावांच्या कंपनीने 330 मेगावॉटच्या कोळसा जाळून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार होता. त्यामुळे कोळी बांधवांचा मत्स्यव्यवसाय, शेती, नारळाच्या बागा, फळांची शेती उद्धवस्त होणार होती. त्या विरोधात आमच्या आगरी समाज शेतकरी प्रबोधिनेनेे पुकारलेल्या एल्गाराला दत्ता पाटील यांची साथ लाभली आणि तो  330 मेगावॉटचा प्रकल्प रद्द करण्यात आला.

जर आज दादा असते, तर त्यांच्यामुळेच कार्येकर्तांमध्ये वेगळी स्फुर्ती असते. आदरणीय दत्ता पाटील यांच्यामुळेच कोकणातील तळागाळातील मुलांना उच्चशिक्षणाची कवाडे मोकळी झाली. आदरणीय दादांची जनतेविषयी असलेली तळमळ आणि त्यांचा त्याग पाहता दादांचे कार्य आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ‘दिपस्तंभ’ म्हणून मार्गदर्शक ठरले. दादांच्या रुपाने उभ्या असलेल्या शैक्षणिक,सामाजिक संस्था या त्यांच्या कार्याची निश्‍चितच स्फूर्ती देणार्‍या ठरल्या आहेत.ज्या ज्यावेळी रायगडात राजकीय,सामाजिक संघर्ष निर्माण होतो त्यावेळी प्रत्येकाला आज दत्ता पाटील हवे होते असे म्हणण्याची वेळ येते.त्यातच दादांचे मोठेपण दिसून येते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top