Monday, January 25, 2021 | 04:28 PM

संपादकीय

नव्या वर्षातली गुंतवणूकवाट

नवं वर्ष सुरू होत असताना बरेचजण काही ना काही संकल्प करतात

वाईट व चांगलीही बातमी
रायगड
11-Sep-2020 07:21 PM

रायगड

ब्रिटनमधील ऑक्सफर्डच्या सहाय्याने केल्या जाणार्‍या कोरोनावरील लसीच्या मानवी चाचण्या थांबविण्यास केंद्रीय औषध महानियंत्रकांनी सांगितल्याने एकच निराशा व्यक्त झाली आहे. अर्थात, यामुळे फार काही निराश होण्याचे कारण नाही. कारण, लस निर्मितीची ही प्रक्रिया अतिशय अवघड असते व त्यात अनेकदा चाचण्यांत काही दोष आढळल्यास त्या थांबविल्या जातात. पुन्हा त्यांचे विश्‍लेषण करुन या चाचण्या सुरु केल्या जातात. असे अनुभव जगभरात येतात. मात्र, त्यामुळे लस आता येणारच नाही, असे म्हणता येणार नाही. लसीची चाचणी थांबविली ही वाईट बातमी असली, तरी त्यात एक चांगली बातमी आहे व ती म्हणजे आता भविष्यात येणारी लस ही आणखी प्रभावी असेल. कारण, त्यांची चाचणी आणखी प्रभावी होऊन त्यातून चांगली प्रभावी लस तयार होऊ शकते. मुळातच लसनिर्मितीचा कालावधी हा जगात दहा ते पंधरा वर्षांचा असतो. सध्याची जागतिक पातळीवरील कोरोनाने आलेली आपत्ती लक्षात घेता ही लस लवकरात लवकर म्हणजे किमान एक वर्षात बाजारात आणण्याचा शास्त्रज्ञांना व औषध कंपन्यांचा संकल्प आहे. अर्थात, हे काम काही सोपे नाही. मुळात, लस तयार करणे व त्यांच्या चाचण्या करुन त्याचे विश्‍लेषण करणे, ही फार अवघड बाब असते. जागतिक पातळीवर त्याचे काही निकष आखून देण्यात आले आहेत. या निकषांची तंतोतंत पडताळणी लस बाजारात आणण्यापूर्वी केली जाते. शेवटी माणसाच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न ठरत असल्याने लस निर्मितीतील उत्पादनात अनेक कडक निकष ठेवण्यात आले आहेत. जगात बहुतांशी लस या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर बाजारात आणल्या आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती वेगळी असल्याने त्यातील काही नियमांना बगल देत ही लस तयार करुन त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. ब्रिटनमधील अस्ट्राझेनेका या कंपनीसोबत सहकार्य करार करुन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोरोनावरील लसीच्या चाचण्या सुरु केल्या होत्या. पुण्यात तसेच देशातील 17 केंद्रोवर या लसीच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या. या चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून, त्यातून रुग्णांवर होणार्‍या परिणामांचे विश्‍लेषण सुरु करण्यात आले आहे. या चाचण्यांचे विश्‍लेषण गुप्त ठेवले जातात. परंतु, हाती आलेल्या बातम्यांनुसार, या चाचण्यांदरम्यान एका महिलेला ही लस घेतल्यावर मणक्याच्या मज्जारज्जूंचा काही त्रास झाल्याचे आढळले. काही काळाने ही महिला बरी होऊन घरी गेलीदेखील; परंतु तिला हा रोग पूर्वीपासूनच होता, की ही लस घेतल्यावर उत्पन्न झाला, याचे निरीक्षण सध्या केले जात आहे. त्यामुळे या लसीच्या चाचण्या तातडीने बंद करण्याचे ठरविले. आता त्याविषयी योग्य विश्‍लेषण करुन नित्कर्ष काढले जातील व त्यानंतर त्यांना पुन्हा चाचण्या करण्यास परवानगी दिली जाईल. चाचण्या करताना काही लोकांना ही लस टोचली जाते, तर काही लोकांना लस टोचतोय असे सांगत प्रत्यक्षात साधे इंजेक्शन दिले जाते. या रुग्णांमागे याद्वारे काही मानसिक परिणाम होतो का, तेदेखील तपासले जाते. आता ज्या महिलेला ही लस देण्यात आली होती, तिला लस दिली होती की साधे इंजेक्शन हेदेखील उघड झालेले नाही. रशियानेदेखील जी लस तयार केल्याचा दावा केला आहे, तीदेखील प्रायोगिक तत्त्वावरील आहे. त्यांच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या अजूनही शिल्लक आहेत. मात्र, त्यांच्या पहिल्या दोन चाचण्या चांगल्या यशस्वी झाल्या आहेत, असा त्यांचा दावा आहे. लसनिर्मितीसाठी जगातील शास्त्रज्ञ सध्या एकत्र येऊन काम करीत आहेत. आजवर अशा प्रकारे जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञ एकत्र येऊन लस शोधत असल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. सध्या जगातील परिस्थितीच अभूतपूर्व अशीच आहे. त्यावर केवळ लस तयार करणे, हेच उत्तर आहे. त्यामुळे भारत, चीन, ब्रिटन, जपान, अमेरिका येथील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी जिवापाड प्रयत्न करीत आहेत. त्यात त्यांना यश नक्की येईल, यात काही शंका नाही. परंतु, हे यश किती काळात येईल, ते आत्ताच सांगता येत नाही. शास्त्रज्ञांना त्यांच्या गतीने काम करु देणे गरजेचे आहे. आजवर अनेक संसर्गजन्य रोगांवर जगाने लसी शोधून त्यावर मात केली आहे. आता शास्त्रज्ञांची सध्या कसोटी लागली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस हेच एक प्रभावी माध्यम ठरणार आहे, ही जगाने खूणगाठ बांधली आहे. मात्र, तोपर्यंत आपल्याला सावधानगिरी बाळगावी लागणार आहे. दोन व्यक्तींमधील पुरेसे अंतर राखणे, मास्कचा वापर करणे व सतत हात धुणे, हे उपाय केल्याशिवाय तरणोपाय नाही. गेल्या महिन्याभरात मुंबईतील कोरोना नियंत्रणात येतो आहे, असे चित्र होते. परंतु, गणपती उत्सव कितीही नियंत्रणात केला तरीही लोकांचा संपर्क वाढल्याने कोरोनाची लागण वाढली आहे. परिणामी, मुंबईतील कोरोना पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीवर गेला आहे. मुंबईत दहा दिवसांत रुग्णवाढीचा वेग 80 वरुन 61 दिवसांवर घसरला आहे. त्यामुळे आता आगामी काळातील नवरात्रींवर बंदी घालण्याची गरज आहे. लोकांना जरा काही सूट दिली, की लोक कोरोना विसरुन वावरु लागतात, असा अनुभव आहे. यात सरकार काही करु शकत नाही. प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. थोडेफार चढ-उतार झाले तरी कोरोनावरील लस येणार आहे. मात्र, तोपर्यंत सावधगिरी बाळणे आवश्यक आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top