Wednesday, December 02, 2020 | 03:06 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

आशेचा किरण
रायगड
19-Oct-2020 10:31 PM

रायगड

देशातील कोरोना येत्या फेब्रुवारीपर्यंत नियंत्रणात येईल असे तज्ज्ञाच्या समितीने अहवाल दिल्याने एक आशेचा किरण दिसू लागला आहे. आपल्याकडे कोरोनाग्रस्तांची संख्या आताच 75 लाखांच्यावर गेल्याने एकीकडे चिंता व्यक्त होत होती, मात्र, अजून सहा महिन्यांनी तरी कोरोनाला अटकाव बसेल असे हा अंदाज सांगतो. परंतु या अहवालामुळे निर्धास्त होण्याचे कारण नाही. कोरोनासाठी जी खबरदारी सध्या घेतली जात आहे ती कोरोना पूर्णपणे हद्दपार झाल्याशिवाय थांबविता येणार नाही. त्यामुळे सध्याचा काळ हा मोठा कसोटीचा आहे. आपल्याकडे प्रत्येक सणात कोरोना वाढतो असे चित्र आपल्यासमोर दिसते. त्यामुळे सण साजरे करताना आपल्याला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. आता सध्या सुरु असलेल्या नवरात्री व दसरा यात विशेष काळजी घ्यावी लागेल. गणपतीला आपल्याकडे सरकारने कितीही मार्गदर्शन तत्वे घालून दिली तरी लोकांनी उत्साहाच्या भरात गर्दी केली व त्याचा परिणाम म्हणून कोरोनाचे रुग्ण वाढले. तिकडे केरळातही असेच झाले. कोरोना सर्वात मर्यादित असलेले राज्य म्हणून केरळची सर्वांना ओळख झाली होती. तेथील आरोग्यमंत्री  के शैलजा यांनी सुरुवातीपासून कोरोना आटोक्यात ठेवण्यात चांगले नियोजन करुन त्याला यशही मिळाले होते. मात्र, तेथे ओणमच्या सणानंतर चित्र पालटले. गेल्या शनिवारी एकाच दिवशी तेथे नऊ हजारांच्यावर रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 3.3 लाखांवर गेली आहे. तर मृत्यू 1139 झाले आहेत. एखादा उत्सव कशा प्रकारे कोरोना पसरवून चित्र कसे पालटवतो तेच यातून दिसते. देशाचा विचार करता कोरोनाचे सध्या असलेले 75 लाख रुग्ण फेब्रुवारी 21 पर्यंत एक कोटींच्यावर जातील असा अंदाज आहे. कोरोना रुग्णांचा हा उच्चांक असेल व तेथूनच घसरण सुरु होईल असा अंदाज आहे. तज्ज्ञाच्या एका समितीने गणिती पध्दतीने हे सर्व आडाखे बांधले आहेत. हे जर खरे ठरले तर खरा दिलासा देशातील जनतेला अजून सहा महिन्यांनी मिळेल असे दिसते. कोरोनाची लस कधी येईल याचा नेमका अंदाज आता व्यक्त करणे कठीण असले तरीही त्याच्यासाठी किमान तीन महिने तरी वाट पहावी लागणार आहे. त्याचबरोबर ही लस किती प्रभावी ठरेल ते देखील सांगता येत नाही. अर्थात ही लस प्रत्येक नागरिकाला देण्यासाठी किती कालावधी लागेल याचे देखील नियोजन करावे लागेल. यासाठी किती कालावधी लागेल हे आता सांगता येत नाही. तरी 2021 वर्षही कोरोनात जाईल असे दिसते. कोरोनावर मात करणे शक्य आहे, मात्र  त्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. महाराष्टाचा विचार करता कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत हे वास्तव काही नाकारता येत नाही. मात्र, आता रुग्ण बरे होण्याचे राज्यातील प्रमाण वाढले आहे व मृत्यूचे प्रमाणही घटत चालले आहे ही सर्वात जमेची बाजू म्हटली पाहिजे. राज्याती रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर गेले आहे. राज्यात तपासणी झालेल्या प्रत्येक 100 जणांमागे 16 जण हे कोरोनाग्रस्त असल्याचे आढळते. गेल्या महिन्यात हे प्रमाण 22 टक्के होते. म्हणजे महिन्याभरात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण कमी होत चालल्याचे दिसते. राज्यातील रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण आता 100 दिवसांवर गेले आहे. एकूणची ही सर्व आकडेवारी सकारात्मक दिसत आहे. दुसरीकडे आता लॉकडाऊन उठविण्याची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली आहे. गेलो सहा महिने थंड झालेल्या अर्थव्यवस्थेला आता गती देण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे लोकांचा समाजातील वावर वाढणार असला तरीही नाईलाज आहे. कोरोनाच्या भितीने आपण फार काळ घरात बसू शकत नाही. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत तर अनेकांना पगार कपात स्वीकारावी लागली आहे. अशा स्थितीत अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता जूनपासून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता बर्‍यापैकी क्षेत्रे खुली झाली आहेत. मात्र मुंबईची लोकल आम जनतेसाठी खुली करण्याचे धाडस सरकार दाखविणार नाही व तसे करण्यामागे जनतेचेच हित आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर येणार नाही या वास्तवाची जनतेला कल्पना आहे. परंतु लोकल पूर्वी प्रमाणे गर्दी घेऊन सुरु झाली तर कोरोना किती प्रमाणात वाढेल त्याचा विचार केला जाऊ शकत नाही. त्यामुळे एकएक  धीम्योगतीने पण निश्‍चयाने पाऊल टाकण्याची आज गरज आहे. यात कोणतेही पाऊल घाईने उचलले तर कोरोना वाढण्याचा धोका आहे. सध्या जी काही सकारात्मक आकडेवारी दिसत आहे त्याला खीळ बसू शकतो. सरकारवर आज मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याबाबत जो विरोधकांकडून दबाव येत आहे त्याला सरकारने बळी पडू नये. जे आवश्यक आहे तेवढेच सुरु करण्याची गरज आहे. यंदा गरबा, दसरा व दिवळी आटोपल्यावर कोरोना वाढतो की नियंत्रणात राहतो त्यासंदर्भात पहावे लागेल. अर्थात हे सर्व जनतेच्या हातात आहे. त्यासाठी सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top