अलिबाग 

महामार्गावर दरोडेखोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीच्या 15 दिवसांत मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील वाहनांसह 45 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली असून, तीन जण अद्याप फरार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेल्या सहा दरोडेखोरांना पेण न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या टोळीने 14 सप्टेंबर रोजी पेण खोपोली मार्गावर गागोदे येथे दरोडा टाकला होता. नागोठणे येथील सुप्रीम कंपनीचा एक ट्रक प्लास्टीकचे दाणे भरलेल्या गोण्या घेऊन चेन्नईला निघाला होता, हा ट्रक या टोळीने गागोदे खिंडीत अडवला. ट्रकचा चालक आणि क्लिनरला मारहाण केली. त्यांचे अपहरण करून दोन तास फिरवले. मोबाईल फोन आणि रोख रक्कम काढून घेतली. नंतर डोळ्यावर पट्टीबांधून मुंबई-गोवा महामार्गावर इरवाडी गावाजवळ शेतात सोडून दिले. नंतर प्लास्टीकचे दाणे असलेल्या गोणी भरलेला ट्रक घेऊन फरार झाले.

याप्रकरणी ट्रक चालकाने पेण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार भादवी कलम 395, 363, 341, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधिक्षक संचिन गुंजाळ यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. तपासासाठी चार पोलीस पथकांची तात्काळ नेमणूक करण्यात आली. ही चार पथकं मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, औरंगाबादच्या दिशेने पाठविण्यात आली. तपासादरम्यान चोरी गेलेला ट्रक हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात बेवारस अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.व्ही.कदम यांनी स्थानिकांकडून माहिती काढण्यास सुरवात केली. तेव्हा गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या लाल रंगाच्या झायलोचा सुगावा लागला. ती गाडीही पोलीसांनी ताब्यात घेतली. यानंतर गुन्ह्याचे पैलू उलगडत गेले.

नाशिक येथून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सदानंद अमृतकर याला पोलीसांनी ताब्यात घेतले. नंतर शाहनशाह, उर्फ सेबु गुलहसन मुळ  राहणार इलाहबाद उत्तरप्रदेश यास कुर्ला येथून, महंमद जावीर शरीक शेख राणीगंड उत्तर प्रदेश, हंसराज उर्फ मन्नु मुनेश्‍वर भिकनापुर उत्तर प्रदेश, मंहमद जकीर महंमद इलियास याला अँन्टॉप हिल येथून, तर बंटी उर्फ रोशन सुभा खाबिया याला नाशिक येथून जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या टोळीतील तीन जण अद्यापही फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या सहा जणांना पेण न्यायदंडाधिकारी यांनी 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापुर्वी या टोळीने नागपूर येथे चहाची वाहतुक करणारा ट्रक लुटला असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

या तपासात पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, पोलीस निरीक्ष बी. एस जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंहेश कदम, पोलीस उप निरीक्षक नरेंद्र  पाटील, सहाय्यक फौजदार भास्कर पाटील, पोलीस हवालदार, पी. के दोरे, राजेंद्र भोनकर, सतिश महेतर, राकेश पवार, प्रतिक सावंत, संदिप देसाई, कैलास बेल्हेकर यांनी महत्वाची भुमिका बजावली.

तीन आरोपी फरार

या प्रकरणातील सहा आरोपींना आम्ही अटक केली आहे , अजून तीन जण फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच ते सापडतील, आणखी काही गुन्ह्यात त्यांचा सहभाग होता का? हेही तपासले जाईल. असे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी सांगितेल.

अवश्य वाचा