कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी उद्योगांचा ऑक्सिजन काढून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन ऑक्सिजन पुरवठादारांनी ऑक्सिजनचा भाव वीस रुपयांवरुन 60 रुपये घनमीटरपर्यंत वाढविला आहे. इतके पैसे मोजूनही ऑक्सिजन मिळत नसल्याने उद्योगातील कामे ठप्प झाली आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने उत्पादित होणार्‍या ऑक्सिजनपैकी 80 टक्के ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठी वापरण्याचे बंधन घातले आहे. अधिक ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास बाकीचा वीस टक्के ऑक्सिजनदेखील वैद्यकीय कारणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सात ऑगस्ट 2020 रोजी झाला. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच ऑक्सिजनच्या भावामध्ये 33 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर आता ऑक्सिजनचा भाव तिप्पट झाला आहे. मात्र, इतके पैसे मोजूनही ऑक्सिजन मिळत नाही. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने ऑक्सिजनची अधिक गरज भासणार हे मार्च-एप्रिलमध्येच स्पष्ट झाले होते. त्याच वेळी ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न का झाले नाहीत? प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्याची गरज होती. नियोजन चुकल्याचा फटका उद्योगांना बसत आहे.