कोरोना साथरोगामुळे राज्यातील जैववैद्यकीय कचर्‍यामध्ये (बायो मेडिकल वेस्ट) पहिल्या तीन महिन्यांत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल ते मे या काळात दिवसाला 90 टन जैविक कचरा तयार झाला असून गेल्या वर्षी हे प्रमाण प्रतिदिन 62.2 टन होते, असे निरीक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये नोंदवले आहे. वाढलेल्या या कचर्‍याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला घाम फुटतो आहे.

एमपीसीबीने मकोव्हिड साथरोगाचा पर्यावरणाच्या विविध घटकांवर झालेला परिणामम हा सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. यामध्ये 21 मार्च ते 1 जून या कालावधीतील निरीक्षणे नोंदविण्यात आली आहे. सर्वेक्षणादरम्यान मंडळाने राज्यातील 60 हजार 410 आरोग्य केंद्रांमधून माहिती संकलित केली.

मार्चनंतर जैविक कचर्‍यामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली असून मे महिन्याच्या अखेरीस दिवसाला 90.6 टन कचरा तयार झाला. राज्यात 31 जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प असतानाही वाढलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे अवघड झाले आहे. या लॉकडाउनमध्ये शहरांमधील घन कचर्‍यामध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास आले. शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, कार्यालये, हॉटेल बंद असल्यामुळे हा कचरा कमी झाला; पण लॉकडाउन तीनमध्ये अनेक नियम शिथिल झाले. त्या वेळी होम डिलिव्हरीला परवानगी दिल्याने घरगुती कचर्‍यात अचानक वाढ झाल्याचे निदर्शनास आले.

पुण्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच जैववैद्यकीय कचर्‍याचे प्रमाण वाढत गेले. सुरुवातीला रुग्ण कमी होते; पण त्या वेळी कोरोना रुग्णांच्या उरलेल्या अन्नाचादेखील या कचर्‍यामध्ये समावेश केला होता. त्यामुळे आकडा मोठ्या प्रमाणात वाढला. जूनच्या मध्यानंतर प्रशासकीय नियमावलीत बदल झाल्यामुळे उरलेले अन्न यातून वगळण्यात आले. मात्र, या महिन्यानंतर करोना रुग्णांची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळे जैविक कचरा कमी झालेला नाही, अशी माहिती ऑल इंडिया असोसिएशन ऑफ कॉमन बायो मेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटील संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दंडवते यांनी दिली.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त