पुणे

पुढच्या महिन्याचा पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळंच कोविड योद्धे व त्यांच्याशी संबंधित विभागातील कर्मचारी वगळता अन्य सर्व विभागातील कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करावी लागेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.

पुनर्वसन विभागाच्या बैठकीसाठी पुण्यात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. सरकारच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. पुढच्या महिन्याचा पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मदत-पुनर्वसन, आरोग्य व अन्य दोन असे चार विभाग वगळून इतर सर्व विभागातील सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.  कोरोनाच्या लढाईत आघाडीवर राहून लढणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारात कुठलीही कपात केली जाणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी केली.