पुणे  

शहरात ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत असताना एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यासाठी अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पुणे शहरासह जिल्ह्यातील गंभीर रुग्णांसाठी 82 रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट मडायल 108फ सेवेशी संपर्क साधताच रुग्णाला तत्काळ रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात पत्रकार पांडुरंग रायकर; तसेच अन्य रुग्णांना कार्डिअ‍ॅक किंवा अद्ययावत रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मडायल 108 द्वारे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निश्‍चित करण्यात आले. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद म्हणाले, करोनाचा एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याच्या नातेवाइकांनी तत्काळ 108 वर संपर्क साधावा. त्यानंतर अ‍ॅम्बुलन्स रुग्णालय अथवा संबंधित केंद्रावर पोहोचेल आणि रुग्णाला इच्छितस्थळी नेईल

डायल 108 रुग्णवाहिकेच्या सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके म्हणाले, 24 रुग्णवाहिका अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट म्हणजेच अद्ययावत सोयीसुविधांसह सज्ज असतील. 58 रुग्णवाहिकांत मूलभूत सोयी देण्यात आल्या आहेत. कोव्हिड केअर सेंटर वरून रुग्णाला घेऊन रुग्णाच्या नातेवाइकांच्या सूचनेनुसार खासगी अथवा सरकारी रुग्णालयात पोहोचविण्यात येईल.