पिंपरी  

 हिताची मनी स्पॉट एटीएम मशीनचा खालचा भाग गॅस कटरच्या साह्याने कापून त्यातील साडेनऊ लाखांची रोकड लंपास करण्यात आली. चिंबळी येथे रविवारी   मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. एटीएम मशीनमधून पैसे चोरण्याचा अशा घटना पुन्हा घडू लागल्याने चिंता वाढली आहे.

चिंबळी गावापासून 100 मीटर अंतरावर हिताची मनी स्पॉट एटीएम सेंटर असून, या एटीएम सेंटरचा खालचा भाग गॅस कटरच्या साह्याने कापला. त्यानंतर चोरट्यांनी या एटीएम मशीनमधून रोकड लंपास केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत मशीनचा भाग कापून, रोकड लंपास केली आहे. या एटीएम सेंटरबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. एटीएम मशीनला असणार्‍या कॅमेर्‍यावर चोरट्यांनी रंगाचा स्प्रे मारला. त्यामुळे त्यामध्ये चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नाहीत.

गेल्या अनेक महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम सेंटर फोडून चोरी करण्याचे प्रकार पूर्णपणे थांबले होते. त्यानंतर पुन्हा एटीएम चोरी करणार्‍या टोळीने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. याबाबत रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी संबंधित बँक किंवा हिताची मनी स्पॉट कंपनीकडून कोणीही पोलीस ठाण्यात आले नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस तपास करीत आहेत.