Wednesday, December 02, 2020 | 02:34 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

राजकारण भवन
14-Oct-2020 04:05 PM

मुंबईतील राज्यपाल भवनाचे नामांतर करुन  राजकारण भवन किंवा भाजपा भवन करण्याची आता योग्य वेळ आली आहे.     कारण सध्याचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या भवनात मुक्कामास आल्यापासूनच घटनेचे पालक म्हणून नव्हे तर राष्ट्ीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व भाजपाचे रक्षणकर्ते म्हणून काम करण्याचा जणू विडाच उचलला होता. आता तर त्यांनी मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पञात तर तुम्ही हिंदुत्ववाद सोडलात का, असा थेट सवाल केला आहे. राज्यपालांची ही कृती म्हणजे घटनेचा अवमानच म्हटली पाहिजे. घटनेचे सर्व संकेत त्यांनी पायदळी तुडवले आहेत. भाजपाला सध्याची घटना बदलून देशात हिंदुत्ववाद आणावयाचा आहे व हा त्यांचा अजेंडा काही आता छुपा राहिललेला नाही. परंतु असे असले तरी देशाच्या संसदेने सध्याची घटना त्याग करुन अजून तरी हिंदुत्ववाद स्वीकारलेला नाही, याची जाण ठेवली पाहिजे. त्यामुळे आजही आपल्याकडे डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतील सर्वधर्मसमभाव मानला जात आहे. तुम्ही कोणत्याची विचाराने प्रभावित झालेले असलात तरी घटनात्मक काम करताना त्यातील तरतुदींचे पालन करण्याचे बंधंन पाळावे लागणार आहे. परंतु या कोश्यारी तात्यांना वयाच्या 78 व्या वर्षी देखील याचे भान नसावे याचे वाईट वाटते. ते हिंदुत्ववादी विचाराचे आहेत, संघाचे स्वयंसेवक आहेत, भाजपाचे कार्यकर्ते आहेत, याला आक्षेप असण्याचे कारण नाही. कारण त्यांनी कोणता विचार स्वीकारावा हा त्यांचा प्रश्‍न आहे. मात्र, ज्यावेळी राज्यपाल म्हणून राजभवनात तुम्ही प्रवेश करता त्यावेळी तुम्हाला तुमच्या राजकीय चपला राजभवनाच्या दाराशी काढूनच आतमध्ये घटनेचे रक्षणकर्ते म्हणून प्रवेश केला पाहिजे. परंतु कोश्यारी तात्यांच्या बाबतीत असे झालेले नाही. त्यांची आजवरची प्रत्येक चालही वादग्रस्त ठरली आहे. महाघाडीचे सरकार कसे सत्तेत येणार नाही यासाठी राजभवनातून सुत्रे  हलणे असे कधी घडलेले नाही, परंतु कोश्यारींच्या काळात हे घडले आहे. राज्यातील निकालानंतर भाजपा- शिवसेनेचे फाटल्यावर माजी मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणीविसांनी शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांना हातशी धरुन भल्या पहाटे सुर्योदयाच्या अगोदर शपथविधी राजभवनात उरकला. त्यांनी हा शपथविधी करण्याअगोदर सत्ता स्थापणार्‍याकडे बहुमत आहे किंवा नाही हे पहाणे आवश्यक होते. ज्याप्रकारे महाविकास आघाडीची ओळख परेड केली व नंतरच त्यांचा शपथविधी केला तसे फडणविसांना दुसर्‍यांना शपथ देताना ओळख परेड केली नाही. याचा अर्थच स्पष्ट आहे की, राज्यपालांनी दुजाभाव केला व घटनेनुसार काम केले नाही. त्यानंतर महाघाडीच्या प्रशासकीय कामातही ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली होती, परंतु सरकारने त्यांना चाप लावला. एवढेच कशाला मुंबईत पैसा कमवून त्याच शहराचा अवमान करणार्‍या कंगनाला राजभवनावर भेट दिली. मात्र तिने केलेल्या वक्तव्याचा कोश्यारींनी काही जाब विचारला नाही. कंगना रणावत ही अभिनेत्री भाजपाची सुपारी घेऊन वागत होती हे स्पष्ट दिसत असताना तिच्या या कार्याला राज्यपालांनी आशीर्वाद देणे हे घटनेचे संकेत पायदळी तुडवणारेच होते. आता तर मंदीर सुरु न केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हिदुत्ववादावर शंका घेणे हा तर कळसच झाला. त्यावर त्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेले सडेतोड उत्तर फार महत्वाचे आहे. आम्हाला हिंदुत्वाच्या तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही असा सणसणीत टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल व घटनेचा आदर करण्याच्या कृतीला सलामच केला पाहिजे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राात, तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे मान्य केले आहे. शपथ घेतल्यावर तुम्ही अयोध्येलाही गेला होतात,एकादशीला पंढरपुरात पुजा देखील केली,मंदीर बंद ठेवण्यासाठी तुम्हाला काही दैवी संकेत मिळाले आहेत का? ज्या सेक्युलर शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो सेक्युलर शब्द तुम्ही स्वीकारला आहे का? असे प्रश्‍न राज्यपाल घटनेचे पालन करताना कसे विचारु शकतात याचेच आश्‍चर्य वाटते. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सेक्युलर असणे हा काही गुन्हा नव्हे तो घटनेने दिलेला अधिकार आहे. देवाची पुजाअर्चा करणे व सेक्युलर असणे किंवा नसणे याचाही काही संबंध नाही. सेक्युलर असलेला माणूस हा नास्तिक असेलच असे नाही तो आपापल्या धर्माच्या रितीरिवाजानुसार देवाचे पुजन करु शकतो, तो त्याचा अधिकार आहे. शिवसेनेचा हिंदुत्ववाद हा वास्तववादी आहे. आज मुख्यमंत्र्यांनी त्या पदावर बसल्यावर घटनेचे पालन करताना त्यांनी सर्वधर्मसमभाव स्वीकारणे हे ओघाने आलेच. वाजपेयींनी देखील मोदी साहेबांना गुजरातचे मुख्यमंत्री असताना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी हा सल्ला जुमानला नाही तो भाग वेगळा. आज देखील कोश्यारी तात्यांनी आपला हिंदुत्ववाद घरी वैयक्तीक पातळीवर ठेवावा व राजभवनात घटनेचे पालन करावे. गोव्याच्या राज्यपालपदाचा चार्ज देखील कोश्यारी यांच्याकडे आहे. गोव्यातील मंदीरे बंद आहेत, मात्र तेथील मुख्यमंत्र्यांना मंदीरे उघडण्याचा सल्ला काही ते देत नाहीत. कारण गोव्यात भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्र्यांनी  राज्यपालांना सडेतोड उत्तर देऊन घटनेचे पालन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top