चंद्रपूर 

करोना विषाणूचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नसल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरु करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चंद्रपूर महापालिकेने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा बंद, शिक्षण सुरु हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिकवत आहेत.

करोना टाळेबंदी 31 जुलैपर्यंत चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात जवळपास 300 शाळांमध्ये शिक्षण सुरू झाले. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर बहुतांश शाळांनी वर्ग बंद करून ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. तर इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामुळे त्यांच्याकडे स्मार्टफोन असेलच असे नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे कठीण आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता यावर उपाय म्हणून चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी नागेश नीत यांनी अतिशय कल्पकपणे ङ्गशाळा बंद, शिक्षण सुरूफ हा उपक्रम सुरू केला आहे. नीत यांच्या माहितीनुसार, करोना काळात शाळा बंद आहे. पालकाचाही शाळा बंद ठेवण्याचा आग्रह आहे. अशाही स्थितीत शिक्षण सुरू ठेवायचे आहे. महापालिकेच्या शाळेत सर्व गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. केवळ 10 टक्के विद्यार्थ्यांकडेच मोबाईल आहे. त्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.