लखनौ,

1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी ( 30 सप्टेंबर) निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं. तसंच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगण्यात आलं. निकाल सुनावला जात असताना 26 आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती.

 सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितलं की, विश्‍व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचं निदर्शनात आल्याचं न्यायालयाने यावेळी सांगितलं. या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी 16 सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

351 साक्षीदार

 या प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. 48 जणांविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी 16 जण खटला सुरु असताना मरण पावले. 16 व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.

 न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण 26 आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.

 उमा भारती सध्या उत्तराखंड येथील रुग्णालयात उपचार घेत असून भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी आपल्याला दोषी ठरवण्यात आल्यास जामीनासाठी अर्ज करणार नाही असं सांगितलं होतं. लालकृष्ण अडवाणी यांनी 24 जुलैला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष सीबीआय कोर्टात आपला जबाब नोंदवला होता. यावेळी त्यांना न्यायाधीशांकडून एकूण 100 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. 

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपाचा विश्‍वास आणि वचनबद्धता सिद्ध होते.

लालकृष्ण अडवाणी,भाजप नेते

आमचं आंदोलन कोणत्याही षडयंत्र नव्हतं हे सिद्ध झालं. आम्हाला खुप आनंद झाला आहे. न्यायालयानं आता हा निर्णय दिला असून हा वाद संपला पाहिजे. संपूर्ण देशाला राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला लागलं पाहिजे,

मुरली मनोहर जोशी,भाजप नेते

या आरोपींची निर्दोष मुक्तता

  भाजप नेते  लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम ंद्र खत्री, संतोष दुबे, ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर

 या आरोपींचं झालं आहे निधन

 शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल,  आचार्य गिरीराज किशोर,  विष्णु हरी डालमिया,  महंत अवैद्यनाथ, महंत परमहंस दास, महामंडलेश्‍वर जगदीश मुनि, बैकुंठ लाल शर्मा प्रेम, डॉ सतीश नागर , मोरेश्‍वर साळवे (शिवसेना नेता) , डीवी रे (तत्कालीन एसपी), विनोद कुमार वत्स, रामनारायण दास, हरगोबिंद सिंह, लक्ष्मी नारायण दास महात्यागी, रमेश प्रताप सिंह, विजयराजे सिंधिया.

ओवेसींकडून निकालाचा निषेध

  बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील  न्यायालयाच्या याच निकालावर संतप्त प्रतिक्रिया देत एमआयएमचे खासदार  अससुद्दीन ओवेसी यांनी  या निकालाचा निषेध केला. हा निकाल म्हणजे भारतीय इतिहासातील काळा दिवस, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं 9  नोव्हेंबरला जो निर्णय दिला होता, त्यात नियमांचं उल्लंघन करत सार्वजनिक धार्मिक स्थळाची संघटीत प्रयत्नांनी नासधूस करण्यात आली होती असं स्पष्ट म्हणण्यात आल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. शिवाय आता सर्वोच्च न्यायालयच असं म्हणत असताना आज त्याविरोधातील निर्णय येणं ही बाब निराशाजनक असल्याचं स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडलं. मशिद काय जादूनं पडली होती का, असा सवाल त्यांनी केला. 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त