virat news

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
 
आगामी विश्‍वचषकासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारची रणनीति आखली जात आहे. यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन आतापर्यंतची हिट सलामीवीराची जोडी ठरली आहे. हीच जोडी देशासाठी सलामी देईल, असे बोलले जात आहे. 
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी जागतिक स्तरावर सर्वांत यशस्वी ठरली आहे. या दोघांनी आतापर्यंत 101 एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामी करून 4541 धावांची भागीदारी रचली आहे. गेल्या दहा वर्षातील सलामीवीरांच्या जोडीमधील हा एक विक्रम ठरला आहे. यामध्ये 15 शतकी आणि 13 अर्धशतकी भागीदारी करण्यात आली आहेत. 
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या गेल्या विश्‍वचषकातील आकड्यांचा विचार केला, तरी रोहित-शिखरची जोडी अव्वल ठरते. या जोडीने गेल्या विश्‍वचषकानंतर 60 एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामी केली. दोघांनी मिळून 2609 धावा कुटल्या. यामध्ये 8 शतकी आणि 7 अर्धशतकी भागीदारीचा समावेश आहे. सलामीच्या जोडीमध्ये रोहित शर्माने सर्वात जास्त धावा फटकावल्या आहेत. रोहितने 71 सामन्यांत 61.12 च्या सरासरीने 3790 धावा केल्या आहेत. यात 15 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहेत. तर, शिखर धवनने 67 सामने खेळले असून, 2848 धावा केल्या आहेत. 
विश्‍वचषकात खेळणार्‍या सर्व सलामीवरांच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास प्रथम ख्रिस गेलचा (9850) क्रमांक लागतो. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला (7880), बांगलादेशचा तमीम इकबाल (6636) आणि रोहित शर्माचा (6043) क्रमांक लागतो. मात्र, रोहित शर्माने 206 पैकी 103 सामने मधल्या फळीत फलंदाजी केली आहे.

अवश्य वाचा