दिनांक ०१/१२/२०१९ रोजी जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग रायगड  व पी.एन.पी. कॉलेज वेश्वी अलिबाग यांच्या समन्वयाने पी.एन.पी. पुनावाला इंग्लिश मेडीयम स्कुल, नागांव येथे एच. आय.व्ही./एड्स जनजागृतीपर आयोजित करण्यात आलेल्या  रॅलीचे उदघाटन डॉ.अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड अलिबाग, डॉ. सुचिता गवळी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, अलिबाग रायगड, सौ. हर्षदा मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, नागांव ग्रामपंचायत  व श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

       यावेळी पी.एन.पी. कॉलेजच्या प्राचार्या श्री.  संजीवनी नाईक, श्री. रवींद्र पाटील, एन.एस.एस. समन्वयक तसेच  एन.एस.एस. विध्यार्थी विद्यार्थिनी वर्ग उपस्थित होता.  समाज कोणत्याही क्षेत्रात बदल घडवू शकतो या म्हणीनुसार लोक सहभागातून एड्स निर्मूलन हा एक सामाजिक कार्याचा भाग असून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन एड्स विरोधी लढा तीव्र केल्यास हा आजार व एचआयव्ही विषाणू हद्दपार होईल असे मनोगत  जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड अलिबाग यांनी व्यक्त केले. 

           या रॅलीच्या सुरुवातीला मा. तुकाराम मुंडे (भा.प्र.से), प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार  जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत आयोजित सेल्फी पॉईन्टचे उदघाटन वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. 

    रॅलीची सुरुवात  HIV/ AIDS विषयी शपथ घेऊन करण्यात आली.  रॅलीमध्ये उपस्थित युवक युवतींनी वचन पाळा, एड्स टाळा, HIV/ AIDS व्यक्तीबाबत सदभाव हवा, भेदभाव नको, स्त्री शक्तीचा एकच नारा,  HIV/ AIDS हद्दपार करा, आता युवकांनी ठरवायचे आहे, आता एड्सला हरवायचे आहे., माझे आरोग्य , माझा अधिकार, नरी शक्ती कारे पुकार  HIV/ AIDS  ला करू हद्दपार, जवा हू, नादान नही, नैतिकता पाळा, एड्स टाळा, एका क्षणाची मजा, आयुष्याची सजा, सुखी संसाराची मात्रा, एचआयव्ही तपासणी करून घे मित्रा अशा विविध घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती केली. या रॅलीमध्ये  पी.एन.पी. कॉलेज वेश्वी अलिबाग येथील शिक्षक,  एन.एस.एस. विध्यार्थी विद्यार्थिनी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.     

       रॅली संपल्यानंतर स्कुलच्या हॉलमध्ये  श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, रायगड यांनी एच.आय.व्ही. म्हणजे काय याची कारणे, लक्षणे, समज गैरसमज याविषयी शास्त्रीय माहिती देऊन  एच.आय.व्ही.चा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याचे सांगण्यात आले. युवा वर्ग हा  एच.आय.व्ही./एड्सच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा घटक असून हा घटक अतिजोखमीचा, अतिउत्साही, जोखीम पत्करणारा व जोशपूर्ण काम करणारा आहे. त्यामुळे त्यांना वेळोवेळी  एच.आय.व्ही./एड्सविषयी माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना वेळीच करणे गरजेचे आहे.  एच.आय.व्ही./एड्स हा आजार पूर्णपणे बरा होईल असे प्रभावी औषध शास्त्रज्ञांना अद्याप सापडलेले नसल्यामुळे सद्यस्थितीत एआरटी हि औषधोपचार प्रणाली  एच.आय.व्ही. संसर्गित असणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. याकरिता प्रतिबंधात्मक उपायांमध्ये लग्नापूर्वी ब्रम्हचर्य पाळा (लग्नापूर्वी हनुमान बना ) व लग्नानंतर श्रीराम बना हा महत्वाचा संदेश आपल्या व्याख्यानात देण्यात आला.

        यानंतर  जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.अजित गवळी यांनी संतुलित व्यायाम व संतुलित आहार याविषयी मार्गदर्शन करून भावी देशाची सज्ञान नागरिक म्हणून तयार व्हायचे असतील तर सद्गुणी व्यक्तीची संगत करून तसेच व्यसनापासून दूर राहून एच.आय.व्ही./एड्स या आजाराला प्रतिबंध करण्याचा आहे. तसेच आज घेतलेल्या शपथेनुसार आपल्या वर्तनात बदल करून आपल्याला मिळालेले ज्ञान हे आपल्या मित्रांना, घरच्यांना गावातील सर्व व्यक्तींना या विषयी माहिती देण्याची आहे. तसेच गावामध्ये  एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्ती असल्यास त्यांच्या सोबत भेदभाव न करता सामाजिक बांधिलकीतून प्रेमाची वागणूक देण्याची आहे. या कार्यक्रमाच्या वेळी देण्यात आलेल्या व्याख्यानाच्या प्रभावामुळे प्रभावित होऊन ८०  युवक युवतींनी स्वइच्छेने  एच.आय.व्ही  तपासणी करून घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आवश्यक ते सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन   श्री. रवींद्र पाटील, एन.एस.एस. समन्वयक,  पी.एन.पी. कॉलेज वेश्वी अलिबाग यांनी केले. सदरचा कार्यक्रम  यशस्वी होण्यासाठी श्री. अनिल खंडाळे, समुपदेशक,  गणेश सुतार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वाहनचालक  किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

अवश्य वाचा