पनवेल दि. 01

   सेंट्रल कस्टम एक्साईझमध्ये वेगवेगळ्या पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका भामट्याने तब्बल 140 बेरोजगार तरुण तरुणींकडून सुमारे 48 लाख रुपये उकळून त्यांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या भामट्याने नोकरीचे अमिष दाखविलेल्या बेरोजगार तरुण तरुणींना नोकरी लागल्याबाबतचे बनावट नियुक्तीपत्र,सर्व्हीस बुक, मेडीकल कार्ड दिल्याचे देखील आढळुन आले आहे. संतोष मारुती पाटील असे या भामट्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणूकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या भामट्याचा शोध सुरु केला आहे.या प्रकरणातील आरोपी संतोष पाटील हा भामटा फेब्रुवारी-2018मध्ये खारघर सेक्टर-15 मध्ये रहाणार्‍या योगिता कडु यांच्या घरी त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगून गेला होता. त्यावेळी त्याने सेंट्रल कस्टम अ‍ॅन्ड सेंट्रल एक्साईजचा मोठा अधिकारी असल्याचे सांगून त्याने गरजु लोकांना कस्टममध्ये वेगवेगळ्या पदावर नोकरी लावून देण्याचे काम करत असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांच्या नातेवाईकांमध्ये,मित्र मंडळीमध्ये नोकरीसाठी जे इच्छुक असतील अशा सगळ्यांना नोकरीला लावणार असल्याचे त्याने सांगितले होते.

   भामट्या संतोष पाटील याने कस्टम विभागात नोकरीला असल्याचे भासविण्या साठी त्या पद्धतीचा पेहराव केला असल्याने योगिता कडू व त्यांच्या कुटुंबियांना त्याच्यावर विश्‍वास बसला. त्यामुळे योगिता कडू यांनी आपल्या नात्यातील व मित्रमंडळीतील गरजवंत तरुण-तरुणींना नोकरी मिळेल या आशेने त्यांनी अनेक तरुण तरुणींचे कागदपत्र व पैसे घेऊन ते भामट्या संतोष पाटील याला दिले होते. फेब्रुवारी ते ऑगस्ट-2018 या सात महिन्याच्या कालावधीत योगीता कडू व इतरांनी भामट्या संतोष पाटील याला नोकरीसाठी 140 लोकांकडून सुमारे 48 लाखाची रक्कम जमा करुन ती त्याला दिली होती. त्यामुळे भामट्या संतोष पाटील याने शिपाई, सिक्युरिटी गार्डसाठी खाकी व पांढर्‍या रंगाचा कपडा,कॅप स्टार, नेम प्लेट,बुट बेल्ट, युनिफॉर्मचे साहित्य आणून ते योगिता कडू व इतरांना देऊन ते युनिफॉर्म शिवून घेण्यास तसेच प्रत्येकाला युनिफॉर्ममध्ये फोटो काढून घेण्यास सांगितले होते.

   सर्व तरुण-तरुणींनी युनिफॉर्म मध्ये फोटो काढल्यानंतर त्यांची सर्व यादी भामट्या संतोष पाटील याने सोबत नेऊन सगळ्यांचे आयकार्ड बनवून दिले. तसेच सगळ्यांना वेगवेगळ्या पदावर निवड केल्याचे बनावट नियुुक्ती पत्र, सर्व्हीस बुक व मेडीकल कार्ड आदी कागदपत्रे दिली. त्यानंतर थोड्याच दिवसात सगळ्यांना बसमध्ये बसवून न्हावाशेवा, ठाणे, दिघी, नागोठाणे, नाशिक, देवळाली आदी ठिकाणी कामावर रुजु करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने गत जानेवारी महिन्यामध्ये सर्वांचे रिव्हॉल्वरचे लायसन्स काढण्याचे कारण सांगून प्रत्येकाकडून आणखी 15 हजार रुपयांची मागणी केली.

   त्यानंतर भामटा संतोष पाटील हा आपली फसवणुक करत असल्याचा संशय योगिता कडू यांना आला. दरम्यानच्या काळात योगिता कडू यांनी संतोष पाटील याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे पाचही मोबाईल नंबर बंद असल्याचे आढळुन आले. त्यामुळे योगिता कडू आणि नोकरीसाठी पैसे देणार्‍या इतरांनी संतोष पाटील याने त्यांना दिलेल्या कागदपत्रांची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे आढळुन आले. त्यानंतर योगिता कडू व त्यांच्या सोबत फसवणुक झालेल्या सर्वांनी खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी भामट्या संतोष पाटील याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

अवश्य वाचा