पुणे

    उद्धव ठाकरे सरकारला शुभेच्छा देणारे ट्विट करताना सिने अभिनेते व भाजपाचे माजी नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी शरद पवारांना चाणक्य तर संजय राऊत यांना हनुमान असे संबोधले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी या दोन्ही नेत्यांना समर्पक अशी उपमा दिली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करताना ज्या मुस्तद्दीपणाचे दर्शन घडवले त्याला तोड नाही. शरद पवार यांच्या चाणक्यनीतीमुळेच  भाजपला महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य गमवावे लागले. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यासारख्या दिग्गज नेत्यांना धोबीपछाड देत आपणच चाणक्य आहोत हे सिद्ध केले.

   महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामागे व उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यामागे शरद पवारांचाच मास्टर माईंड आहे. शरद पवार हे खऱ्या अर्थाने किंग मेकर आहेत.  संजय राऊत यांनीही शिवसेनेचा किल्ला एकहाती लढवला. कितीही टीका झाली तरी ते डगमगले नाहीत. स्वतः गंभीर आजारी असूनही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी सोडले नाहीत.   होणाऱ्या टिकेकडे दुर्लक्ष करीत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ते हनुमानाप्रमाणे ठामपणे उभे राहिले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा उचललेला विडा त्यांनी अखेर पूर्ण केला. 

अवश्य वाचा