22 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी  ऐतिहासिक दिवस ठरणार आहे कारण या दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू होणार आहे. याच दिवशी भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियम वर पहिला दिवस रात्र कसोटी सामना  रंगणार आहे. 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यान पहिला दिवस रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला तेंव्हा पासून आजवर 11 दिवस रात्र कसोटी सामने झाले आहेत. या सर्व सामन्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला  आहे.भारत बांगलादेश व अफगाणिस्तान वगळता सर्व देश  दिवस रात्र कसोटी सामने खेळले आहेत.भारताने दिवस रात्र कसोटी खेळावी अशी भारतातील क्रिकेट रसिकांची ईच्छा होती पण बीसीसीआयच्या अडेलतट्टूपणामुळे ती पूर्ण होत नव्हती. 

    2018-19 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिवस रात्र कसोटी सामना खेळण्याची ऑफर बीसीसीआयला दिली होती पण बीसीसीआयने ती फेटाळून लावली. बांगलादेश आणि न्यूझीलंड कडूनही अशाप्रकारची आलेली ऑफर बीसीसीआयने फेटाळली होती. त्यावेळी गुलाबी चेंडूवर खेळण्याची तयारी नसल्याचे कारण सांगण्यात आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलिया दरवर्षी दिवस रात्र कसोटीचे आयोजन करते. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा पूर्वीपासून दिवस रात्र कसोटीचा पुरस्कर्ता आहे. त्याने बीसीसीआयचे सूत्र हाती घेताच पहिला निर्णय घेतला तो दिवस रात्र कसोटी सामना खेळवण्याचा. कारण कसोटी क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. टी 20 च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेट मागे पडू लागले आहे.

    नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. मैदानावर प्रेक्षकांची उपस्थिती खूप कमी होती इतकेच काय तर टीव्ही वर देखील कसोटी सामन्यांना म्हणावा तसा टीआरपी मिळाला नाही. कसोटी क्रिकेटची ही घटती लोकप्रियता चिंतेची बाब आहे. कसोटी क्रिकेट पासून दूर गेलेल्या या प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये खेचून आणून कसोटी क्रिकेट वाचवणे ही काळाची गरज आहे त्यासाठी दिवस रात्र कसोटी हा चांगला पर्याय आहे. दिवस रात्र कसोटीमुळे प्रेक्षक पुन्हा कसोटीकडे वळतील आणि कसोटी क्रिकेटला पुन्हा अच्छे दिन येतील . कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे असेल तर जास्तीतजास्त दिवस रात्र कसोटी सामने व्हायला हवेत. दिवस रात्र कसोटी खेळताना काही अडचणी येतील, मुख्य अडचण असेल ती चेंडूची. दिवस रात्र कसोटी खेळताना गुलाबी चेंडूचा वापर केला जातो. गुलाबी चेंडूवर खेळण्याचा भारतीय खेळाडूंना जास्त अनुभव नाही.असे असले तरी देवधर करंडक स्पर्धेत झालेले सर्व सामने दिवस रात्र खेळवण्यात आले होते व त्यात गुलाबी चेंडूचाच वापर करण्यात आला होता. 

    भारतीय संघातील सर्व खेळाडू हे व्यावसायिक आणि प्रचंड अनुभवी आहेत त्यामुळे त्यांना गुलाबी चेंडूवर खेळताना कोणतीही अडचण येणार नाही. याआधीही क्रिकेट मध्ये अनेक बदल झाले आहेत. दिवसा खेळवण्यात येत असलेले एकदिवसीय सामने दिवस रात्र होऊ लागले. लाल चेंडूची जागा पांढऱ्या चेंडून घेतली तेंव्हाही काहींनी शंका उपस्थित केल्या होत्याच. आज मात्र दिवस रात्र होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांना प्रेक्षकांचा हाऊस फुल प्रतिसाद मिळतो. रात्री खेळल्या जाणाऱ्या टी 20 सामन्यांची लोकप्रियता तर वादादीत आहे.  केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर अनेक दिग्गज खेळाडूंनीही दिवस रात्र कसोटीचे स्वागत केले आहे. सचिन तेंडुलकर तर या कसोटीसाठी कमालीचा उत्सुक आहे. 22 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या या दिवस रात्र कसोटीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार यात शंका नाही आणि तसे झाले तर भारतातच नव्हे तर इतर देशांतही दिवस रात्र कसोटी सामने मोठ्या प्रमाणावर  आयोजित केले जातील त्यामुळे   कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळेल.

अवश्य वाचा