कर्जत - दि.19

   कर्जत मध्ये बालदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्जत रोटरी क्लबने केली स्वप्नातल्याच या रंगीबेरंगी दुनियेची मुलांना अनोखी सफर.रोटरी क्लब ऑफ कर्जतच्यावतीने जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रम येथील निवासी वसतिगृहतील मुलांसाठी बालदिनाचे औचित्य साधून कर्जत जवळील वसंत हॉलिडेज फार्म हाऊस, येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मुलांनीही या कार्यक्रमाचा भरपूर आनंद लुटला. या मुलांसह रोटरीचे सर्व सदस्यही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सिनेमा, स्विमिंगपूलचा आनंद, लज्जतदार जेवण आणि बरंच काही जणू स्वप्नातल्याच या रंगीबेरंगी दुनियेची अनोखी सफर अनुभवली.

   वनवासी कल्याण आश्रम विद्यार्थी वसतीगृहात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील चिमुकल्यांनाही या जीवनशैलीचा आनंद अनुभवता यावा, त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलावे या हेतूने रोटरी क्लब ऑफ कर्जत च्या पुढाकाराने जांभिवली विद्यार्थी वसतीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अनोखी सफर घडविण्यात आली. यात येथील अनुभव ऐकताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शिवाय तिथे असलेल्या स्वीमिंग पुलातील पाण्यात मजा करताना मुलांना झालेला आनंद गगनात मावेनासा होता. मुलांना गमतीदार खेळ खेळताना तर धमालच आली.

   एका वेगळ्याच दुनियेत मुलं रमून गेली. हॉटेलच्या वतीने सर्व मुलांना दिलेले लज्जतदार जेवणावर तर सर्वजण खुश झाली.मुलांसह प्रत्येक खेळात रोटरीचे सदस्य मुलांसोबत सहभाग घेत होते. रोटरी क्लबच्या सदस्यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ कर्जत अध्यक्ष हुसैन जमाली, सचिव जितेंद्र ओसवाल, सुनिल सोनी, माधव भडसावळे, सुर्याजी ठाणगे, अशोक ओसवाल, मुफद्दल डाभिया, जितेंद्र परमार, विशाल शाह, डॉ. स्वपनिल पडते तसेच या  कार्यक्रमात व. क. आ. कोकण प्रांत अध्यक्षा ठमाताई पवार, अधिक्षक विनेश नवेज उपस्थित होते. यावेळी मुलांना दाखविण्यात आलेला ‘हिरकणी ' हा चित्रपट तर त्यांच्या स्वप्नांना नवे पंख देऊन गेला.

अवश्य वाचा