जेएनपीटी दि१८ 

वाहतूक आणि त्यातून होणारे अपघात यामुळे सतत चर्चेत आणि अशांत असणाऱ्या उरण तालुक्यातील अवजड वाहतूकीचा फटका पोलिसांना देखिल बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उरण परिसरातील अनेक पोलिसांचे अवजड वाहतूकीमुळे अपघात झाले आहेत. रविवार दि१७रोजी कर्तव्यावर येत असलेल्या रमेश शंकर घुगरे (३५) या पोलिसाला अवजड वाहनांने दुचाकीवरून उडविले. या अपघातात रमेश घुगरे याच्या मांडीचे आणि पायाचे हाड मोडले असून तो जायबंदी झाला आहे. बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणाऱ्या बिर्जूदेव जग्गनाथ कुकडे या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

उरण तालुका हा अपघातांचा तालुका म्हणून ओळखला जातो. प्रचंड अवजड वाहतूकीमुळे येथे नेहमी अपघात घडत असतात. गेल्या काही वर्षात उरण तालुक्यातील रस्त्यांवर हजारो तरूणांचे अपघातात बळी गेले आहेत. अवजड वाहतूक बंद करावी किंवा या अपघातांवर नियंत्रण येईल अशी उपाययोजना करावी यासाठी सतत आंदोलने आणि मोर्चे सूरू असतात. मात्र पोलिस प्रशासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून अवैध पार्कींग आणि बेकायदेशीर वाहतूकीला प्रोत्साहन देते. त्यामुळे अनियंत्रीत वाहतूक वाढून अपघात होतात. अशा या अनियंत्रीत वाहतूकीमुळे नुकतेच दोन तरूणांचा अपघातात मृत्यू झाला होता. आत्ता तर या बेकायदेशीर अवजड वाहतूकीमुळे चक्क पोलिसाचाच अपघात झाल्यामुळे आत्तातरी पोलिस या बेकायदेशिर पार्कींग आणि अवजड वाहतूकदारांना रोखणार का असा प्रश्न नागरीक विचारू लागले आहेत.

अवजड वाहनांमुळे या भागात गेल्या काही दिवसांत अनेक अपघात झाले आहेत. या वाहतूकीला शिस्त लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कुठल्याही रस्त्यावर बेकायदेशिरपणे वाहन उभे करून ठेवल्यास त्याच्यावर मोठी दंडात्मक आणि कायदेशिर कारवाई केली जाईल.असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा