नागोठणे 

        येथील प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या प्रमाणपत्राप्रमाणे न्याय न दिल्याने प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम मात्र केले गेले आहे. गावांतील कंपनीच्या दलालांचे काहीतरी ऐकून माघार न घेता आता प्रत्येकाला सक्रिय सहभाग घेण्याची जरुरी असून आपला संघर्ष आता जिल्हाभरात पसरविण्याची वेळ आली आहे असे आवाहन लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे प्रदेश संघटक राजेंद्र गायकवाड यांनी केले. 

          नागोठणे ते चोळे या गावांतील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्त, गॅस नलिकाग्रस्त, ठेकेदारीतील कामगार तसेच बेरोजगार तरुणांची सभा शनिवारी सायंकाळी उशिरा वेलशेत येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात पार पडली, त्यावेळी मार्गदर्शनपर भाषणात गायकवाड बोलत होते. यावेळी संघटनेचे नागोठणे युनिट अध्यक्ष शशांक हिरे, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांचेसह मारुती कांबळे, सुजित शेलार, चेतन जाधव, सोमनाथ पारंगे, गणपत पाटील, प्रमोद चोरगे, सुरेश कोकाटे, बळीराम बडे, राजेंद्र लवटे, खांडेकर गुरुजी, दिनेश कातकरी, मनोहर माळी, गोरखनाथ पारंगे, प्रल्हाद पारंगे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते व यात  महिलांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती. या सभेत संघटनेचे अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील हे प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करणार होते. मात्र, सायंकाळी ते पनवेल येथे वाहतूक कोंडीत अडकल्याने सभेला खोळंबा होऊ नये, या हेतूने त्यांनी मोबाईलद्वारे सभेच्या ठिकाणी संपर्क साधून त्यांनी येथील प्रकल्पग्रस्तांशी जाहीरपणे संवाद साधला. गायकवाड यांनी पुढे केलेल्या भाषणात काही वक्त्यांनी आपल्या भाषणात स्थानिक आमदार तसेच खासदारांनी संघटनेला सहकार्य करणे गरजेचे आहे, याचा धागा पकडत ३६ वर्षात हे  लोकप्रतिनिधी आपला प्रश्न सोडवू शकले नसल्याने आता आपणच सक्रिय झालो असून आता यांची आपल्याला कोणतीही गरज नसल्याचे परखडपणे स्पष्ट केले.  काही निवडक प्रतिनिधींची सोमवारी कोळसे पाटील यांचे निवासस्थानी बैठक घेतली जाणार आहे. महिला आता सक्रिय होत आहेत ही आनंदाची बाब असून त्यांनी पदर खोचून कामाला लागावे असा सल्ला दिला. रोहे प्रांताधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी आता लवकरच निर्णय देणार असून हा निकाल अंतिम नसेल, तर आपल्याला आंदोलनाची दिशा बदलावी लागेल. हे जनतेचे आंदोलन असून या लढाईत सर्वांनी सक्रिय व्हावे असे आवाहन राजेंद्र गायकवाड यांनी विभागातील जनतेला केले. संघटनेचा आवाज दबविण्यासाठी मला निलंबित करण्याची धमकी सुद्धा दिली होती. मात्र, या धमकीला न घाबरता मी माझे संघटनेचे काम चालूच ठेवले आहे. आपला निर्णय आता अंतिम टप्प्यात आला आहे व या वरून हवा आपली गेली, का त्यांची गेली आहे, हे पाहावे असे शशांक हिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. आभारप्रदर्शन गंगाराम मिणमिणे यांनी केले. 

 

अवश्य वाचा