पाली/बेणसे 

सुधागड तालुक्यातील हातोंड गावचे सुपूत्र, विश्वभूषण मित्रमंडळ होतोंड चे सल्लागार , मार्गदर्शक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा सरचिटणीस सुरेशदादा  वाघमारे यांचे वयाच्या 54 व्या वर्षी सोमवार दि.(18) रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हृद्य विकाराच्या झटक्याने  दुःखद निधन झाले. सुरेश वाघमारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू, लढाऊ  व निष्ठावंत कार्यकर्ता हरपला असल्याची भावना रिपाइंचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. वाघमारे कुटुंबियांच्या दुःखात रिपाइं पक्ष सहभागी असल्याचे ना.आठवले यांनी याप्रसंगी बोलताना म्हटले. रिपाइं कोकण प्रदेशाध्यक्ष जगदिशभाई गायकवाड यांनी सुरेशदादा वाघमारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ, समाज , व पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याची भावना व्यक्त केली. रिपाइं रायगड जिल्हा संघटनेत त्यांचे स्थान महत्वाचे होते.पक्षाची भूमिका व निर्णयप्रक्रियेत ते नेहमीच एक पाऊल पुढे असायचे. अनेक लढे व आंदोलने यशस्वी करण्यात त्यांचे महत्व पूर्ण योगदान लाभले. समाजातील विविध प्रश्न हाती घेऊन त्यांनी प्रामाणिक व निस्वार्थीपणे न्याय देण्याचे काम केले. सुरेशदादा वाघमारे यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील असेही जगदीश भाई गायकवाड यावेळी म्हणाले.

सुरेशदादा वाघमारे यांच्या  निधनाची बातमी सर्वाना चटका लावून गेली.  अंत्ययात्रेस उपस्तीत कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींना अश्रूं अनावर झाले. परिवर्तनाच्या चळवळीत काम न करणारी माणसे जिवंत असून मेल्यासारखी असतात. तर परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारी माणसे मरून देखील जिवंत असतात. सुरेश वाघमारे हे विचार व कार्य आजही सर्वाना प्रेरणा देत राहतील.अशी प्रतिक्रिया कोकण नेते व्ही.के.जाधव यांनी व्यक्त केली. बुद्ध , कबीर, शिवराय, फुले, शाहू आंबेडकरी चळवळीला निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांची भूक आहे असे कार्यकर्ते घडविण्याचे काम सुरेशदादा वाघमारे यांनी केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले  शासनदरबारी त्यांचा दरारा होता.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना मंगेश वाघमारे यांनी व्यक्त केली. सुरेशदादा वाघमारे यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीतील एक तेजोमय तारा निखळला असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय म्हसुरकर यांनी दिली. रिपाइं युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सुरेशदादा वाघमारे यांच्या रूपाने चळवळीतील खंदा कार्यकर्ता व उत्तम मार्गदर्शक हरपला असल्याची भावना व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष मोहन अवसरमल यांनी वाघमारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ पोरकी झाली असून कधीही भरून न निघणारी चळवळीची हानी झाली आहे. अशा शब्दात आदरांजली वाहिली. सुरेशदादा वाघमारे यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळावू होता. समाजाच्या हितार्थ महत्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत त्यांचा विशेष सहभाग असायचा. कोणत्याही व्यक्तीच्या अडीअडचणीत मदतीचा हात देण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या रूपाने एक सच्चा मित्र हरपला असल्याची भावना निलेशभाऊ मंगले यांनी व्यक्त केली. 

सुरेशदादा वाघमारे यांचे आंबेडकरी व धम्म चळवळ गतिमान होणेकामी  महत्वपूर्ण योगदान लाभले. सामाजिक, जनहितार्थ चळवळीसह अनेक लढे व आंदोलनात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी नेहमीच दमदारपणे आवाज उठविला.त्यांच्या रूपाने  गोरगरीब, दिनदुबल्या, शोषित, वंचित घटकांचा आधार हरपला असल्याची भावना यावेळी उपस्तितांनी व्यक्त केली. सुरेशदादा वाघमारे यांनी आदिवासी, कातकरी, ठाकूर , धनगर बांधवांसह बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

अंत्ययात्रेस सामाजिक, राजकीय,शासकीय,  शैक्षणिक, धार्मिक,तसेच  बहुविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्तीत होते. त्यांच्या पछात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिणी, नातवंडे  असा मोठा परिवार आहे. दिवंगत सुरेशदादा वाघमारे यांचा जलदानविधी व शोकसभा काजूवाडी खोपोली या ठिकाणी शुक्रवार दि.(29) रोजी  सकाळी 11.00 वाजता पार पडणार आहे.

अवश्य वाचा