मुंबई

      महाराष्ट्रासह कर्नाटक व आसपासच्या राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा यंदा १२ डिसेंबर रोजी होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या भाविक-प्रवाशांना एस.टी महामंडळाकडून प्रासंगिक कराराचा दर  ५० रु, वरून ३४ रु, तर खोळंबा आकार ९८ रु, वरून केवळ १० रु, इतका नाममात्र करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

      दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे रेणुका देवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून हजारो भाविक मोठ्या श्रध्देने सौंदत्ती यात्रेसाठी जातात.

       ३ वर्षांपूवी खाजगी वाहतूक, व कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसला भाविक प्रवाशांकडून प्राधान्य दिले जात असे . परंतु   रेणुका भक्त मंडळाच्या शिष्टमंडळाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत एस.टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  श्री. रणजित सिंह देओल यांच्याकडे प्रासंगिक कराराचे दर  व खोळंबा आकार कमी करावा अशी मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्राच्या एस.टी बसेसचा प्रासंगिक कराराचा दर तब्बल ५० रु, वरून ३४ रु, व खोळंबा आकार ९८ रु, वरून केवळ १० रु, करण्याचे निर्देश श्री. देओल यांनी वाहतूक विभागाला दिले.

      त्यासंबंधीचे  परिपत्रक महामंडळाच्या मुख्यालयातून कोल्हापूर विभागाला पाठविण्यात आले असून, पुढील वर्षी माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सौंदत्ती यात्रेला देखील हि सवलत लागू राहील असे एस.टी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

अवश्य वाचा