पनवेल, दि.15

   तळोजा येथून रोहा येथे जाणार्‍या स्कुटीला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटीवर पाठिमागे बसलेला 24 वर्षीय तरुण ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार तर त्याचे वडील जखमी झाल्याची घटना कळंबोली येथे घडली. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.  या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव विशाल दत्तात्रय भोईर (24) असे असून तो रोहा येथील धाटाव भागात आई-वडील व भावंडासह रहाण्यास होता. विशालने नुकतीच बीएससीची परिक्षा पास केल्याने त्याला चांगली नोकरी मिळावी यासाठी त्याचे वडिल दत्तात्रय भोईर हे प्रयत्नशिल होते.

   त्यामुळे दत्तात्रय भोईर हे आपला मुलगा विशाल याच्यासह त्याची कागदपत्रे तळोजा एमआयडीसीतील कंपनीमध्ये देण्यासाठी आले होते. कागदपत्रे दिल्यानंतर दोघे पिता-पुत्र हेल्मेट घालून स्कुटीवरुन रोहा येथे जाण्यासाठी निघाले होते.  यावेळी त्यांची स्कुटी कळंबोली सर्कल येथील चौकात आल्यानंतर सिग्नल लागल्याने दत्तात्रय भोईर हे थांबले होते. सिग्नल सुटल्यानंतर ते आपली स्कुटी घेऊन निघाले असतानाच पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे पिता-पुत्र स्कुटीवरुन खाली पडले. यावेळी रस्त्यावर उजव्या बाजुला पडलेल्या विशालच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने तो काही वेळातच मरण पावला. या घटनेनंतर नागरिकांनी ट्रक चालक जगधारी बालरुप चौहाण याला पकडून कळंबोली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. 

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.